सोमवार, 28 जुलाई 2008

07- आहाराचे वेळापत्रक --Timetable for proper food habits

आहाराचे वेळापत्रक
मंगळवार दि. 11 मार्च, 1997 गावकरी लेखांक 7.
आपल्याला स्वत:पुरते प्राकृतिक आहाराचे प्रयोग करायचे असतील तेव्हा आहाराबाबत काही वेळापत्रक आखून आपण प्रचिती घेऊ शकतो. विशेषत: अजून आजार प्रत्यक्ष क्षालेला नाही त्याच वेळी प्राकृतिक आहाराचा दहा ते पंधरा दिवसांचा एखादा कोर्स करायचा असे ठरवून वेळापत्रक आखणे चांगले.

असा कोर्स कराताना त्याचे उद्देश लक्षात घेतले पाहिजे. आपल्या शरीरात रोज नव्याने जमा होणारा कचरा रोजच्या रोज बाहेर टाकायची सोय असली तरी प्रत्यक्षात तसे घडत नाही. रोजच्या कच-यापैकी काही कचरा शरीरात तसाच साठून राहतो व कुजून आणखी सुक्ष्म पण जास्त घातक स्वरुपात शरीर व्यापून राहतो. आपल्याला पंधरा दिवसांच्या प्रयोगामध्ये हा कचरा बाहेर काढायचा आहे. तो टप्प्या-टप्प्याने निघणारा उपाय सुरु केल्यानंतर कचरा आधी एकदम बाहेर निघून जाणार, उदाहरण द्यायचे तर ज्याप्रमाणे झाइूने आधी ऐंशी-नव्वद टक्के कचरा आपण साफ करतो व राहिलेला कचरा फडक्याने किंवा पाण्याने पुसून काढतो, तसा हा प्रकार आहे. यासाठी झाडूचे काम करतात उकडल्‌ेल्या भाज्या.

म्हणून दहा दिवसाच्या आहार-नियमन प्रयोगासाठी साखर व मसाले पूर्ण वर्ज्य करावेत. मीठही स्वयंपाकात न टाकता पानात वेगळे घेऊन ठेवावे, पण खाण्याचं शक्यतो टाळावे. मोड आलेले कडधान्य, साधे पातळ मुगाचे वरण, फुलके, उकडलेल्या भाज्या, लिंबू, अत्यंत पातळ ताक, काही कच्च्या भाजांची कोशिंबीर व साखरेची पूर्तता करण्यासाठी केळी, गुळ, खजूर, मध, मणुका किंवा जर्दाळू यांचा वापर करावा, ओला नारळ, शहाळयाचे पाणी, पालेभाज्यांचे सूप इत्यादी खाण्यात असावेत. तेलाऐवजी तूप वापरावे व म्हशीच्या दुधाऐवजी गाईच्या दुधातून केलेले तूप केव्हाही श्रेष्ठ. पण तेही माफकच असावे. ऋतुमानाप्रमाणे मिळणारी फळे असावीत. चहा, कॉफी, सिगरेट, तंबाखू वर्ज्य करावी. सकाळी सुमारे अकरा व सायंकाळी पाच वाजता आहार घ्यावा. सकाळी व दुपारी लिंबूपाणी (साखर-मीठ न घालता व तसेच झेपल्यास गूळ घालून) किंवा साधे पातळ केलेले ताक घ्यावे. याप्रमाणे तीन दिवस करून पुढील तीन दिवस फक्त उकडलेल्या भाज्या किंवा मोंड आणून उकडलेले भाज्या किंवा मोड आणून उकडलेले कडधान्य , तसेच मोड आणून उकडलेली मेथाी (दोन-तीन चमचे) घ्यावी. पुढील तीन दिवस उपास व नंतर तीन दिवय फलाहार घ्यावा. उपास झेपल्यास फक्त फलाहार घ्यावा. शेवटचे तीन दिवस पुन: पहिल्या तीन दिवसांप्रमाणे आहार घ्यावा.

एकूण पंधरा दिवसात आहार कमीत कमी ठेवावा. या काळात कोठा साफ राहावा म्हणून रात्री झोपतांना पोटावर ओल्या मातीची किंवा ओल्या पाण्याची घडी ठेवणे, अति सौम्य रोचक उदा. त्रिफळा चूर्ण घेणे सकाळी चूळ न भरताच दोन-तीन पेले सावकाशीने पिणे, थोडा वेळ आसने करणे इत्यादी पूरक उपाय केल्याने चांगला फायदा होतो. वरीलप्रमाणे आहार घेत असताना प्रत्येक घासाची चव कशी लागते त्याची जास्तीत जास्त संवेदना जाणवली पाहिजे, असा प्रयत्न करावा. साधे पाणी पितांना देखील त्याची चव कशी लागते, ही संवेदना तीव्र करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या जिभेवर हजारोंच्या संख्येने चव ओळखणारे टेस्टबड्स्‌ असतात. त्यांना चवीची जाण किंवा संवेदना जितकी चांगली होईल तितकी त्यांची कार्यक्षमता वाढेल. त्यांनी चवीबद्दलचा रिपोर्ट मेंदूकडे पाठवल्यानंतर मेंदूच्य आदेशावरून तोंडाच्य लाळग्रंथीत किंवा पोटात पाचक रस बनतात व त्यांनीच अन्नपचन होते. अन्नपचन जितके चांगले तितकी शरीराची गरज चांगली भागते व कचरा विसर्जनाचा
बोझाही कमी होतो. म्हणून चवीने जेवावे असे आपल्यात म्हणतात. पण त्याचा अर्थ मसालेदार जेवणे जेवावे असा नसून चव समजून घेत जेवावे असा आहे.

आपण खूपदा खूपसे पदार्थ किंवा चवी एकत्र करून खातो. तसेच भरपून मसाले वापरतो. त्यामुळे टेस्टब्डुसना आपले अन्न नेमके काय आहे हे ओळखायला व त्याप्रमाणे रस निर्मितीचे आदेश देण्याला त्रास होतो. परिणामी अन्न पचन अकार्यक्षम होते.

वरील प्रकारचे आहार नियोजन आपल्या घरीच करणे शक्य असते व त्यातूनही बराच फायदा होतो. मात्र यापेक्षा जास्त काटेकोरपणे, जास्त दिवस उपास इत्यादी करायचा असेल तर तत्काळ सल्ल्यासाठी एखादा तरी निसर्गोपचार तज्ज्ञ ओळखीचा असावा व उपलब्ध व्हावा. हे आहार नियोजन दोन महिन्यातून एकदा करून चालते व चांगला फायदा देऊन जाते.

कोई टिप्पणी नहीं: