सोमवार, 28 जुलाई 2008

(छोटा) भाग-12 आपल्या आरोग्यासाठी केवळ पाच मिनिटं...

भाग-? आपल्या आरोग्यासाठी केवळ पाच मिनिटं...गांवकरीतील लेख

कळते पण कळत नाही ही उक्ती ब-याच जणांना लागू होते. त्याचे एक उदाहरण म्हणजे आरोग्याबाबत आपण दाखवतो तो आळशीपणा. रोज आसने करावीत, व्यायाम करावा, फिरायला जावे वगैरे आपण वाचतो, मनाशी ठरवतो पण त्याप्रमाणे वागत मात्र नाही. माझा स्वत:चा याबाबतचा अनुभव अतिशय वाईट आहे. नियमित अर्धा तास व्यायाम करायला मला जमत नाही. मग माझ्यासारख्या माणसांना ‘गती’ काय?
यावर मी स्वत:साठी जे काही उपाय करते ते इतर कित्येकांना उपयोगी पडतील असे वाटते. यात मी असे गृहित धरले आहे की, मला दिवसाकाठी फक्त पाचच मिनिटे मिळणार व तीही तुटकपणे सलग नाही, पण आशा सोडायची नाही, म्हणून एक मिनिट मिळाला तर काय आणि दहा - पंधरा मिनिटे मिळाली तर काय हे दोन्ही कार्यक्रम मनाशी आाखून ठेवले आहेत.
घराच्या दर्शनी भिंतीवर एक वर्षभराचे कॅलेंडर मी चिकटवून ठेवते, अशी इयर प्लॅनर्स बाजारात मिळतात. नाही तर आपले साधे मासिक कॅलेंडर असतेच. पाच मिनिटे - व्यायाम केला तर त्या दिवसावर खुण करायची. अशा त-हेने किमान एक चतुर्थांश तरी कॅलेंडर रंगलं तर ते वर्ष ‘यशस्वी’ म्हणायचं. (मात्र अयशस्वी वर्षाबद्दल निराशा बाळगायची नाही हा पहिला नियम) कॅलेंडरवरील खुणांमुळे फक्त एक ‘संख्याशास्त्र’ म्हणून बघायचे ! त्यामुळे आपण चांगले की वाईट अशी नीतीमूल्य त्याला चिकटवायची नाहीत !
सर्व आसनापैकी ताडासन हे मला खूप उपयुक्त वाटते. आहोत त्याच जागेवर उभ्यानेच हे आसन करायचे असते. यामध्ये हातपाय व संपूर्ण शरीर ताणले जाऊन सर्व अवयवांचा शीण जातो. याचा सर्वात जास्त फायदा पाठीच्या मणक्यांना होतो व आपल्या मेरूदंडामध्ये नाड्यांची वेगवेगळी जाळी व केंद्र असल्याने त्या सर्वांना फायदा होतो. लहान वयात उंची वाढवण्यासाठी व उतार वयात पाठीत व गुडघ्यात येणारा बाक न यावा म्हणून हे आसन खूप उपयोगी आहे.

आसन करताना वेळ मोजण्याआधी मी घड्याळ वापरत नाही. त्याऐवजी स्वत:च्या श्र्वासोच्छवास मोजायचा. आपले दहा श्र्वास अशी सुरूवात करून ते पन्नास ते शंभरपर्यंत वाढवत न्यायचे. याचे पण खूप फायदे आहेत. आपल्या शरीराचे सर्व व्यवहार त्यांच्या लयीने पार पडत असतात. हृदयाची लय वेगळी, पोटाची लय वेगळी, मेंदूची लय वेगळी. आपल्या सभोवतालच्या वातावरणाची लयसुद्घा वेगळी असते. या सर्वांना एकत्र आणणारा दुवा म्हणजे आपल्या श्र्वासांची लय. आसने करताना झलकही यातून मिळते. साधारणपणे आपण मिनिटाला पंधरा वेळा श्र्वास घेतो. यावरून वेळेचा अंदाज येतोच.
जागच्या जागी कदमताल किंवा स्टॅटिक जॉगिंग किंवा दोरीवरच्या उड्या हा मी निवडलेला दुसरा प्रकार. पोट गच्च भरलेले असल्याची वेळ सोडून इतर वेळा कधीही शंभर उड्या मारायला दोन मिनिटे पुरतात. शिवाय कोणतीही पूर्व तयारी, साधने इत्यादी जुळवावी लागत नाहीत. फक्त मनाची तयारी असली की पुरे. ऍरोवॉटिक्सचे कोणीही शिक्षक म्हणतील की अशा जॉगिंगचा काही उपयोग नाही. त्याने शरीरातील कॅलरीज बर्न व्हायला सुरूवातसुद्घा होत नाही. मात्र आपणं जसं एखादं वाहन वापरायचं नसेल तेव्हा त्याला पाच मिनिटे रनिंग देऊन आणतो. जेणे करून बॅटरी, टायर्स, इंजिन हे वॉर्मअप होऊन सुस्थितीत राहतात. त्यासाठी माझं जॉगिंगचं तंत्र मला उपयोगी पडतं.
डोळ्यांसाठी मी तीन प्रकारच्या व्यायामाची निवड केली आहे. सुर्योदय किंवा सूर्यास्त समयी सूर्याचे बिंब लालसर असताना तो प्रकाश डोळ्यांवर घेणे. तसेच डोळ्यांची बाहुली संथ गोलाकार गतीने एकदा उजवीकडून डावीकडे तर एकदा डावीकडून उजवीकडे फिरवणे असे सर्व व्यायाम जमेल तसे करता येतात. डोळ्यांचा तिसरा व्यायाम म्हणजे पामिंग. तळहात डोळ्यांवर अशा त-हेने ठेवायचे की त्यातील मध्यभागाचा स्पर्श पापण्यांना व्हावा. हातावरील इतर सर्व उंचवट्यांचा दबाव डोळ्यांच्या अवतीभवती पडत असतो. उदाहरणार्थ गालफडांवर खालचे उंचवटे किंवा भुवयांवर वरील उंचवटे ! तळहातांच्या दोन्ही कडा देखील घट्ट ठेवायच्या जेणे करून बाहेरचा उजेड ज्यात येऊ नये. पापण्यांवर मात्र दाब पडू द्यायचा नाही. त्यांना फक्त तळहाताची ऊब द्यायची. आपली पापणी उघडता येणार नाही पण उभी आडवी फिरवता येईल अशी ही अवस्था असते. याही व्यायामासाठी 1-2 मिनिटे पुरतात. वेळ मोजायला पुन्हा श्र्वासाचे घड्याळ आहेच.

याशिवाय डोळ्यांच्या स्वास्थासाठी चांदीच्या भांड्यातील पाण्याने डोळे धुणे आणि योग्य प्रकारे आहार नियमन हे उपाय करणे चांगले ठरते.
ऑफिसात ज्यांना फक्त बैठं काम करावं लागतं त्यांना स्पॉण्डिलायटिसचा त्रास सुरू होतो. लांबचे दौरे करतांना गर्दीतून दुचाकी वाहन चालवताना खांदा, पाठ, मान आणि कंबर अशा ठिकाणी अनुक्रमे सुया टोचल्यासारखा त्रास होऊ लागतो. कार्यालयात एअर कंडिशनर असेल किंवा फार जोराने चालणारे पंखे असतील तरीही हा त्रास होतो. अशा वेळी किंवा हे होऊ नये म्हणून मानेचा एक चांगला व्यायाम आहे. हनुवटीला मानेच्या खड्डयात अडकवून 5-10 वेळा दीर्घ श्र्वसन करावे हा जालंधर बंधाच्या हा एकूण प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग आहे. या नंतर मान व खालचे धड यांचा संपर्क न तुटू देता मान हळूहळू उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे फिरवून पुन्हा समोर आणायची. अशी 3-4 चक्रे पूर्ण झाल्यावर हीच क्रिया उलट्या दिशेने 3-4 वेळा करायची. यामध्ये आपली मान अनुक्रमे समोरील मानेचा खड्डा, नंतर उजवे कॉलर बोन, उजवा खांदा, पाठीचे उजवीकडील त्रिकोणी हाड, पाठीवरील कॉलरची जागा, डावीकडील त्रिकोणी हाड, डावा खांदा, डावे कॉलर बोन व पुन: समोरील मानेचा खड्डा असा प्रवास करीत असते. इडली पात्रातील वरवंठ्याचा दगड फिरताना जसा त्याचा व दगडी पातेल्याचा संपर्क तुटत नाही. तसेच मानेचा संपर्क तुटता कामा नये. हाही एक मिनिटात स्पाण्डिलायटिसच्या सुरूवातीला तोंड देऊ शकणारा व्यायाम आहे.
अर्धा ते एक मिनिट नळाच्या थंड पाण्याखाली डोक्याला हातांनी मालशि करणे. तसेच गरम पाण्याची आंघोळी असली तरीही शरीरावर अर्धा मिनिटं नळाचं थंड पाणी घेणे हा उत्साह व तरतरी टिकवण्याचा एक प्रत्ययकारी उपाय आहे. एक दोन मिनिटांच्या आवश्यक व्यायामांचे प्रकार इथेच संपत नाहीत. अशाच काही इतर आवश्यक व्यायामांची माहिती आपण पुढल्या लेखात पाहू या.

--- XXX ---

कोई टिप्पणी नहीं: