शुक्रवार, 17 सितंबर 2021

सोमवार, 13 सितंबर 2021

 *वैश्विक गणेश यात्रा / १* 


*उगवत्या सूर्याच्या देशात...*

वैश्विक गणेश

जपान. उगवत्या सूर्याचा देश. प्राचीन सांस्कृतिक परंपरा असलेला समृध्द आणि सुसंस्कृत देश. 


अश्या ह्या जपान मध्ये आपल्या विघ्नहर्त्या गजाननाची एकूण २४३ मंदिरं आहेत. ही सर्व मंदिरं सुमारे चारशे ते चौदाशे वर्षांपूर्वी बांधलेली आहेत. जपान्यांचं कौतुक असं, की त्यांनी ही सर्व मंदिरं नुसती जपलीच नाहीत, तर ती नांदती ठेवली. या सर्व मंदिरांमध्ये रोजची पूजा-अर्चा व्यवस्थित होईल, अशी एक पध्दती विकसित केली. त्यामुळे टोकियो मधील ‘असाकुसा’ चे ‘मात्सूचियामा शोदन मंदिर’, जे सन ६०१ मध्ये बांधल्या गेलं होतं, ते आजही तसंच आहे. यातील श्री गणेशाची मूर्ती ही १४२० वर्ष जूनी आहे. 


जपान मध्ये गणपती ला साधारण पणे ३ – ४ नावांनी ओळखतात. ‘बिनायक-तेन’ हे त्यातील एक नाव. जपानीत ‘तेन’ म्हणजे देव, ईश्वर. ‘गनबाची’, ‘गनवा’, ‘गणहत्ती’ ही नावं सुध्दा चालतात. पण जपान मध्ये गणपती साठी सर्वात प्रचलित असलेलं नाव आहे – ‘कांगितेन’. जपान मध्ये गणेशाचं आगमन झालं ते प्रामुख्याने बौध्द भिक्षुंच्या माध्यमातून. ओडिशा च्या बौध्द भिक्षुन्नी ‘तांत्रिक बौध्द धर्मात’ गती घेतली होती. ते प्रथम चीन मध्ये गेले आणि नंतर तेथून जपान मध्ये. साधारण दीड हजार वर्षांपूर्वी, जपानी लोकांना, ‘गणपति’ ह्या देवतेची ओळख झाली. 


आपल्या भारता सारखंच, जपान मध्ये सुध्दा गणेशाला ‘विघ्नहर्ता’ समजलं जातं. पण यात थोडा फरक आहे. जपानी मान्यतेनुसार गणपती ही देवता, पहिले एखाद्या कामात अडथळे निर्माण करते आणि मग मात्र पूर्ण ताकतीनिशी, ह्या सर्व अडथळ्यांचं निवारण करून मांगल्य निर्माण करते. 


ऐतिहासिक हिरोशिमा शहाराजवळ ‘इत्सुकूशिमा’ द्वीपावर गणेशाचे एक अत्यंत प्राचीन मंदिर आहे – ‘दाईशो – इन’. असं म्हणतात, हे मंदिर सन ८०६ मध्ये बांधण्यात आलं. पण हे त्या ही पेक्षा जुनं असावं. गंमत म्हणजे, आपल्या गणेशाचा जपानी अवतार, ‘मोदक’ फारसा खात नाही. त्याची आवडती गोष्ट म्हणजे ‘मुळा’. होय. मुळा... अनेक प्राचीन मूर्तींमध्ये गणेशाच्या हातात, शस्त्रांसोबत ‘मुळा’ दाखविलेला आहे. मात्र मोदकाचेही एक विशिष्ट स्थान जपान मध्ये आहे. भारतीय मोदकाचा अवतार, ‘कांगिदन’ या नावाने जपान मध्ये प्रचलित आहे. ह्या गोड ‘ब्लिस बन’ चा नैवेद्य, गणपती ला दाखवला जातो. 


असं म्हणतात, जपान मध्ये ‘इदो (तोकुगावा) काळात, म्हणजे सतराव्या शतकापासून, एकोणीसाव्या शतकाच्या काळात, ‘कांगितेन’ ची हजारो मंदिरं होती. भक्तगण मोठ्या संख्येने गणेशाच्या जपानी अवताराची पूजा करायला यायचे. सध्या मात्र २४३ मंदिरं सुस्थितीत आहेत. 


जपान मध्ये दोन तोंडांच्या गणपतीचे सुध्दा प्रचलन आहे. त्याला ‘सशीन कांगितेन’ म्हटलं जातं. आपल्या पुराणात जी ‘नंदिकेश्वराची’ कल्पना आहे, तीच ही देवता. जुन्या मूर्तींवर, चित्रांवर, वस्तूंवर ह्या ‘सशीन कांगितेन’ चा ठसा आहे. दक्षिण जपान च्या ओसाका शहराच्या बाहेर असलेलं, गणेशाचं ‘होझांजी मंदिर’ हे जपान मधील श्री गणेशाच्या, सर्वाधिक भक्त संख्या असलेल्या मंदिरांपैकी एक आहे. तुलनेने अलिकडच्या, म्हणजेच सतराव्या शतकात बांधलेल्या ह्या मंदिरा बद्दल, जपान्यांच्या मनात प्रचंड श्रध्दा आहे. 


जपान मध्ये गणेशाची काही मंदिरं अगदी अलीकडे, म्हणजे गेल्या पन्नास वर्षात बांधलेली आहेत. त्यातील चिबा शहराच्या साकुरा भागात असलेलं ‘गणेश मंदिर’, प्रसिध्द असून याच नावाने ओळखलं जातं. 


एकुणात काय, तर सूर्याचं सर्वप्रथम दर्शन घेणार्‍या ह्या देशात, गणेश भक्तीची परंपरा फार प्राचीन आणि सनातन आहे. आणि आता तर गणेश भक्तांची संख्याही वाढते आहे. 

*- प्रशांत पोळ* 

*#वैश्विक_गणेश  #GlobalGanesh*

गुरुवार, 9 सितंबर 2021

तुळजापूरची भवानीमाता

 *आई तुळजाभवानी*

( तुळजापूर परिपूर्ण माहिती ) 


तुळजापूरची भवानीमाता हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. वर्षांतून एकदा तरी तुळजापूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरांमध्ये आजही नेमाने सुरू आहे.


मात्र तुळजापूरला जाऊन देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्यांना तुळजापूरमधील कित्येक प्रथा-परंपरांबद्दल माहिती नसते.

म्हणूनच तुळजाभवानीच्या विविध प्रथा-परंपरांचा हा परिचय-


श्री श्रेत्र तुळजापूर हे आई तुळजाभवानीचे शक्ती पीठ! वर्षभर भक्तांचा लोंढा तुळजापूरच्या दिशेने येत असतो.

बाहेरून येणाऱ्या भक्तांना फक्त तुळजाभवानीचे मंदिर व परिसर अशा काही ठरावीक गोष्टीच माहीत असतात.

परंतु यापलीकडे जाऊन पाहिल्यास तुळजापूरकरांनी अनेक अशा प्रथा- परंपरा जपलेल्या आहेत,

त्या ऐकल्यानंतर नवीन माणसाला त्याविषयी नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.


साडेतीन शक्ती पीठांपैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढय़ाच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते.

त्यामुळे वर्षांतून तीन वेळा म्हणजे भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपविले जाते.

ज्याला देवीचा निद्राकाल म्हटले जाते.

घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढय़ाच परंपरेने जोपासला जातो.

अन्य कुठल्याही देवाला या प्रकारे सहजपणे उचलून झोपविण्याची पद्धत नाही.

श्री तुळजाभवानीचे पहाटेचे चरणतीर्थ, सकाळ व सायंकाळची महापूजा तसेच रात्रीची प्रक्षाळपूजा व इतर प्रत्यक्षात ज्या पूजा होत असतात,

त्या वेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अधिकार मात्र फक्त पानेरी मठाचे महंत व सोळाआणे कदम पुजारी या घराण्यातील स्त्री- पुरुषांना असून आजही ती परंपरा कायम आहे.

यांच्या व्यतिरिक्त कुणीही असलातरी तो देवीच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेऊ शकत नाही.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान वरचे असून छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्यासह अनेकांची ती कुलदेवता आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही चल मूर्ती असून काळ्याभोर गंडकी पाषाणातून बनविलेली ही मूर्ती साधारणपणे २x३.१५ इंच आकाराची अष्टभूजा मूर्ती असून मंदिरातील गाभाऱ्यात सिंहासनावरील एका खाचेत बसविली जाते.

मूर्तीला सिंहासनावरील खाचीत बसविण्याकरिता दीड फूट लांबीचा क्रुस मूर्तीच्या खालच्या बाजूला असून मूर्ती घट्ट बसावी म्हणून मेण बसविले जाते. याकरिता मूर्तीच्या खालच्या बाजूला ६’’ लांबीचा क्रूस ठेवलेला आहे. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती बाहेर काढून प्रत्यक्ष विधीकरिता वापरली जाते. कदाचित ही अनोखी प्रथा असावी.

यात विशेष बाब म्हणजे मंदिर संस्थानकडे सर्व आर्थिक कारभार असतानाही मेण पुरविण्याची जबाबदारी परंपरेनेयेथील पाणेरी मठाच्या महंताकडे आहे.

साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूर प्रथा-परंपरा, पूजाअर्चा याबाबतीतच नव्हे तर देवीची मूर्ती अशा सर्वच बाबतीतली भिन्नता आहे. माहूरला मूर्तीऐवजी तांदळा आहे तर वणीला एका मोठय़ा दगडावर देवी प्रतिमा शिल्पांकन करण्यात आलेली आहे.

मूर्तिशास्त्रानुसार कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मूर्तीत काही प्रमाणात साम्य असले तरी तुळजाभवानीची मूर्ती पूर्णत: चलमूर्ती म्हणजे उत्सवाला बाहेर काढून परत त्याच ठिकाणी बसविली जाते.

वीरांची देवता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूरची श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्ण पीठं तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे.

पैकी तुळजाभवानी ही महिषमर्दिनी असल्याने तिला वीरांची देवता म्हटलं जातं. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाची ती कुलदेवता असल्याने तुळजाभवानीला विशेष महत्त्व प्राप्त झालं.

म्हणूनच कदाचित कोल्हापूर, माहूर आणि वणीच्या मंदिरात तुळजाभवानीचं मंदिर आहे.

त्याप्रमाणे तुळजाभवानी मंदिर परिसरात इतर तीन शक्तिपीठांचा समावेश करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील बहुतेकांची ती कुलदेवता असल्याने वर्षभर भक्तांचा महापूर इथं सुरू असतो.

बालाघाट डोंगररांगातील प्राचीनकाळातील यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर या ठिकाणी एका दरीत तुळजाभवानीचं ठाणं आहे. तुळजाभवानी म्हणजे भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारी ती त्वरिता! त्वरितावरूनच तुळजापूर नामाभिधान तयार झालं.

तुळजाभवानीचं शारदीय आणि शाकंभरी असे दोन नवरात्र महोत्सव असून या उत्सवापूर्वी देवाला मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपविलं जातं. याला देवीचा निद्राकाल म्हणतात.

त्यानुसार भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीजींचा निद्राकाल असून त्याला अनुक्रमे घोरनिद्रा, श्रमनिद्राआणि सुखनिद्रा म्हटलं जातं. देवीच्या निद्राकालाची परंपरा शतकानुशतकं आजही कायमआहे.

एवढंच नाही तर दसऱ्याचं सीमोल्लंघन साजरं करण्याकरिता देवीला एका विशिष्ट पालखीत बसवून मिरविलं जातं.

वर्षांतून तीन वेळा तुळजाभवानीची मूर्ती निद्राकाळाकरिता एका विशिष्ट पलंगावर झोपविली जाते.

तर सीमोल्लंघना करिता मूळ मूर्ती पालखीत घालून मिरविली जाते. तुळजाभवानीची पूजाअर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखी आणण्याचा मान नगरजवळील भिंगारच्या भगत घराण्याकडे आहे.

तर परंपरेने पालखीच्या पुढच्या खांद्यांचा मान बार्शी तालुक्यातील आगळगांव गोर माळय़ाच्या लोकांचा आहे.

याचबरोबर देवीला ज्या पालखीतून मिरविली जाते ती आणण्याचा मान नगरजवळील जनकोजी तेली (भगत) घराण्याकडे आहे. मध्ययुगीन कालखंडात भिंगारचा जनकोजी तेली तुळजापूरला येताना आपल्या घराला आग लावून निघाला. तुळजापूरला येत असताना रस्त्यातच त्याचं निधन झालं. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने दरवर्षी तेल्याच्या पालखीत बसून सीमोल्लंघन खेळण्याकरिता जाण्याची प्रथा आजही कायम आहे. जनकोजीची अकरावी पिढी ही सेवा अविरतपणे बजावते. जनकोजी तेल्याच्या घराण्याचा मान म्हणून पालखी तर आहेच, शिवाय देवीला सीमोल्लंघनाकरिता सिहासनावरून हलविण्यापूर्वी तेल्याचे वंशज आपल्या करंगळीच्या रक्ताचा टिळा देवीच्या चरणाला लावण्याची प्रथा होती.तुळजाभवानीची पालखी आणण्याचा मान भिंगारला असला तरी प्रत्यक्षात पालखी तयार करण्याचा सन्मान मात्र राहुरीकरांना लाभतो. पालखी तयार करताना सर्व समाजातील लोकांना त्यात सामावून घेतलेले आहे. पालखीचे सुतारकाम, लोहारकाम आणि रंगरंगोटीचे काम राहुरी येथे पूर्ण केले जाते.निद्राकालावधीत देवी ज्या पलंगावर झोपतात तो पलंग अहमदनगरमधील पलंगे नावाच्या तेली घराण्याकडून दिला जातो. तर पलंग तयार करण्याचं काम आंबे गाव-घोडेगावमधील ठाकूर घराने पार पाडते. दसऱ्यापूर्वी एक महिना अगोदर हा पलंग धुणं अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून मिरवत तुळजापूरला येत असतो. यातही विशेष बाब म्हणजे तुळजाभवानीचा पलंग जुन्नरला गेल्यानंतर शिवनेरी किल्ल्यासमोर विश्रांतीसाठी ठेवला जातो.

छत्रपती शिवरायांच्या भक्तीत तुळजाभवानीचा अग्रक्रम आहे. त्याचा हा योगायोगच. कुठल्याही मंदिरामध्ये पलंग आणि पालखी या वस्तू पवित्र असल्याने त्याचं जतन करून ठेवलंजातं.

याउलट तुळजाभवानी मंदिरातील पलंग आणि पालखी एकाच वेळी वापरून त्या होमात टाकून नष्ट केल्या जातात. हे वेगळेपण आहे.देवीच्या शिरावर मुकुट बसविण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पानाची चुंबळ करावी लागते.

ते पान पुरविण्याची जबाबदारी एका तांबोळी नामक मुस्लिम घराची आहे. हे तांबोळी घराणे नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने घटस्थापनासुद्धा करते. त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्याकडे अखंडपणे चालत आलेली आहेत. अल्पशामोबदल्यात ही मंडळी देवीची सेवा म्हणून दिवसरात्र राबतात.

त्यामध्ये जाधव घराणे नगारा वाजविण्याचे काम करते. कदम घराण्यातील घरे घंटी वाजवितात. पलंगे देवीच्या पलंगाची सेवा करतात, न्हावी समाजाकडे सनई-चौघडा वाजविण्याचे काम आहे. याप्रमाणे हरेक जाती-धर्माला इथं परंपरेनं सेवा बजाविण्याचा अधिकार आहे.लाखोचे दान देणारी तुळजाभवानी पहिला नैवेद्य भाजीभाकरीचा पसंत करते. तो उपरकर घराण्याकडूनयेतो.

देवीची प्रक्षाळ, सिंहासन यांसारख्या पूजेदरम्यान हाताखाली मदत करण्याचे काम पवेकर करतात. भक्ताने सिंहासनपूजा केल्यानंतर देवीजींच्या अंगावरील चिन्हे दाखविण्याचे काम हवालदार करायचा.

सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन वेळा दूधखिरीचा नैवेद्य हा कोल्हापूर संस्थानच्या वतीने दिला जातो. त्यासोबत पानाचा एक विडाही दिला जातो.तुळजाभवानीच्या सेवेत खंड पडू नये म्हणून अनेक सेवेकरी रात्रंदिवस झटत असतात. त्यातही एक विशेष सेवा म्हणजे तुळजाभवानीला उन्हाळय़ात उकाडा लागू नये म्हणून पलंगे सलग तीन महिने देवीजींना वारा घालतात. सिंहासनारूढ देवीजींना वारा घालण्याकरिता पलंगे हातात पंखा घेऊन आपली चाकरी बजावत असतातच यासोबतच चैत्रशुद्ध बलिप्रतिपदेपासून ते मृगाच्या आगमनापर्यंत दररोज दुपारी देवीला नैवेद्यात सरबत दिले जाते. हे लिंबू सरबत पुरविण्याचेकाम वंशपरंपरेने भिसे आणि दीक्षित घराण्याकडेच आहे. विनामोबदला ही मंडळी आपले काम चोखपणे करत असतात.मूळ नाव चिंचपूरतुळजापूरचं मूळ नाव चिंचपूर. यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर भागातील एका दरीत तुळजाभवानीचं ठाणं असून मंदिराची मूळ बांधणी किल्लेवजा असून मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे. प्राचीन काळी तुळजापुरात मोठय़ा प्रमाणावर चिंचेची झाडं असल्याचा संदर्भ सापडत असला तरी आज तेथे हे झाड दिसणं दुर्मीळ झालं आहे.निजाम राजवटीपासून तुळजाभवानी मंदिराचा कारभार हाकण्याकरिता संस्थानची निर्मिती झाली असून उस्मानाबाद जिल्ह्याचे कलेक्टरत्याचे प्रमुख आहेत. मंदिराचा कारभार सरकारी यंत्रणेकडे असला तरी प्रत्यक्ष देवीची पूजाअर्चा कदम घराण्यातील १६ घरांकडे आहे.

यांना भोपे पुजारी तर अन्य घराणी जे देवीचा नवस-सायास पार पाडतात त्यांना पाळीकर पुजारी म्हणतात. त्यांच्यासोबत पानेरी मठाचे महंत देवीच्या सेवेकरिता अहोरात्र मंदिर परिसरातील आपल्या मठात राहतात. महंत आणि वरील दोन्ही प्रकारचे पुजारी यांच्यात मानापमानावरून वरचेवरमतभेद वाढत गेल्याने हैद्राबाद संस्थानमधील धार्मिक विभागाने १९१९ साली ‘देऊळ-ए-कवायत’ नावाचा कायदावजा करार केला.

त्यानुसार संस्थानसह पुजारी आणि मानकऱ्यांनी कोणत्या प्रकारच्या सेवा बजावाव्यात तसेच त्यांचे अधिकार आणि उत्पन्न स्पष्ट करण्यात आले असल्याने आजही मंदिराचा कारभार ‘देऊळ-ए-कवायत’ नुसारच चालविला जातो.

तुळजापुरातील पुजाऱ्यांचे वैशिष्टय़ म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची ते लेखी नोंद ठेवतात.

त्यामुळे वंशपरंपरेने आपल्या कुलदेवतेचा पुजारी हा ठरलेला आहे.

साहजिकच आपल्या वंशजांना इतिहास जाणून घेण्याकरिता पुजाऱ्यांचे बाड उपयोगी ठरते.

देवीचे पुजारी हे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची राहण्याखाण्याची व्यवस्था स्वत:च्या घरीच करतात हे वेगळेपणआहे.

भक्ताला लाखोने देणारी देवी स्वत: मात्र पहिला नैवेद्य भाजी भाकरीचा स्वीकारते. गेल्या अनेक दशकांपासून उपरकर हा नैवेद्य देतात. याप्रमाणे पवेकर, हवालदार, दिवटे, जाधव, लांडगे यांसारखे अनेक सेवेकरी अखंडपणे सेवा बजावतात.

देवीच्या सेवेत तुळजापुरातील पानेरी, मळेकरी, दशावतार आणि भारतीबुवाचे मठ कार्यरत आहेत.

शेकडो वर्षांपासून या मठाचे मठाधिपती दिवसरात्र सेवा करतात.

पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या मठाधिपतींना देवीच्या सेवेत राहावे लागते.

दशावतार मठाची जागा देवी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असली तरी या मठाच्या महंतांना आश्विन अमावास्ये शिवाय वर्षभर कधीच मंदिरात प्रवेश करण्याचा हक्क नाही. त्यामुळे हे महंत वर्षभर हा दिवस सोडून कधीच पूर्वेकडे असणारा आपल्या मठाचा दरवाजा ओलांडत नाहीत.

तुळजापुरात देवीच्या सेवेत सर्व जातीधर्माना स्थान आहे. देवीला टोपासाठी लागणारी पानं पुरविणारे तांबोळी मुस्लीम असले तरी देवीची माळ, पोत, परडी तर पाळतातच शिवाय घटस्थापनाही करतात. देवीच्या नैवेद्यात मांसाहार, तर येथील काळभैरवाला नैवेद्यानंतर गांजाची चिलीम तोंडात दिली जाते. याशिवाय अख्खेगावही अनेक परंपरा पाळते. त्यानुसार नवरात्रीत गादी पलंगाचा त्याग करतात. चप्पल घालतनाहीत. इतरही अनेक प्रथा आहेत. त्यानुसार कुंभाराचे चाक, तेलाचा घाणा गावात चालवत नाहीत.तुळजाभवानी म्हणजे शाक्त संप्रदायाशी निगडित असल्याने तिच्या प्रथापरंपराही काही वेगळय़ाच असणार! त्यानुसार देवीच्या नावाने गोंधळ घालणे आलेच. एका भक्ताच्या घराण्याची प्रथा तर अशी आहे की, चक्क बोंबलतजाऊन दर्शन घ्यावे लागते. एक दंतकथा अशी सांगितली जाते की मौजे रांजणी ता. घनसांगवी जि. जालना येथील तुकाराम नावाचा भक्त शेकडो वर्षांपूर्वी देवीच्या दर्शनासाठी आला असता रात्रीच्या समयी त्याला भूकंप झाल्याचा दृष्टांत होऊन भीतीने तो ओरडतच घराबाहेर पडला. त्याच्या आवाजाने सर्व जण घराबाहेर पडल्याने अनेकांचे प्राण वाचले. परंतु याच भक्ताला रस्त्यात काही जणांनी लुटले म्हणून तो देवीला साकडे घालण्याकरिता माझे काय चुकले म्हणत बोंब ठोकतच गेला. देवीला साकडे घालण्यासाठी बोंबलतच जाण्याची परंपरा निर्माण झाली. त्यानुसार दत्त जयंतीला त्याचे वंशज तुळजापुरात प्रवेश केल्यानंतर देवीच्या गाभाऱ्यापर्यंत चक्क बोंबलत जाऊन दर्शन घेतात. त्यामुळे या घराण्याला नाव पडले बोंबले! विशेष म्हणजे देवीच्या भक्तीत गढून गेलेल्या तुकारामाचा अंत तुळजापुरात व्हावा हा पण योगायोगच. त्यामुळे शहरात या तुका बोंबल्याची समाधीसुद्धा आहे. अशा अनेक चित्रविचित्र परंपरा तुळजापूरवासीयांनी जपल्या आहेत.

देवीच्या परंपरेत काळभैरवाचा भेंडोळी उत्सवही महत्त्वाचा आहे. एका काठीला पलिते बांधून ती पेटवून निघालेली ती भव्य ज्वालायात्रा पाहताना थरकाप उडतो.

देवांचे रक्षण करणारा कालभैरव म्हणजे या परिसराचा कोतवालच. त्याच्या अक्राळविक्राळ रूपाला अनुसरून त्याला रोजचा नैवेद्यही मांसाहाराचा असतो.

शिवाय त्याच्या तोंडात गांजाची चिलीम पेटवून दिली जाते.

ही परंपरा आजही जोपासली जाते.

काळभैरव रखवालदार आहे. तो वर्षांतून एकदाअश्विन अमावस्येला तुळजाभवानी परिसराची पाहणी करायला निघतो.

त्याचे फिरणे हे रात्रीचे असते. त्याला उजेड हवा म्हणून हा भेंडोळी उत्सव आला असावा.

भैरोबाच्या नावानं चांगभलं आणि तुळजाभवानीचा उदो उदो करत तरुणांनी भेंडोळी अंगावर घेतलेली असते.

ही भेंडोळी घेऊन ते अरुंद गल्लीबोळातून जातात. पणया भेंडोळीमुळे त्यांना कधीही इजा झाल्याचे उदाहरण नाही. काळभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते.

त्याची ठाणी भारतात सर्वत्र असली तरी भेंडोळी उत्सव उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथेच फक्त साजरा होतो.

मंदिरात आल्यावर देवीला पदस्पर्श करून ही भेंडोळी वेशीबोहर जाऊन विझवली जातात.

अश्विन अमावस्येला भेंडोळी बरोबरच महत्त्वाचा समारंभ म्हणजे दशावतार मठाचे महंत या दिवशी वाजतगाजत देवीच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी देवीला पांढरी साडी नेसवण्याची प्रथा आहे. ही साडी हा दशावतार मठाचा आहेर असतो.

ते वैराग्याचे प्रतीक समजले जाते.

या दिवशी दशावतार मठाचे महंत आणि काळभैरवाचे पुजारी यांना पेहराव देऊन त्यांचा सत्कार केला जातो. त्यात त्यांना जो फेटा बांधला जातो,

तो देवीच्या साडीचा असतो. काही प्रथापरंपरा अगदी समाजानेही जपल्या आहेत. अद्यापही तुळजापुरात तेल्याचा घाणा, कुंभाराचे चाक, कातडी कमावण्याचा उद्योग इथं चालविला जात नाही.

हेच काय तर तुळजापुरात भिंतीवर पाल कधी चुकचुकत नाही अशी या लोकांची श्रद्धा आहे.

श्री तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी त्यामुळे ज्याप्रमाणे आई सर्वाना सामावून घेते त्याप्रमाणे देवीच्या दरबारात गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी असे सर्वच सण साजरे होतात.

एवढेच नव्हे तर वैष्णवपंथाचा गोपाळकालाही आषाढी एकादशीला इथं साजरा होतो.

गुढीसोबतच सर्व राष्ट्रीय सणाला मंदिरावर राष्ट्रध्वजही फडकविण्याची परंपरा इथं कायम आहे.

या प्रमाण परंपरेला प्राचीन इतिहास आहे.

बदलत्या जगात आजही त्याचे मनोभावे पालन केले जाते.

तुळजाभवानीच्या दरबारातील प्रथापरंपरा अगदी निर्विघ्न पणेपुढे चालू आहेत.

म्हणूनच तिच्या दरबारात पाऊल ठेवताच लहानथोर एकच जयघोष करतात.

‘ *आई राजा उदोऽऽ उदोऽऽ!*’