*वैश्विक गणेश यात्रा / १*
*उगवत्या सूर्याच्या देशात...*
वैश्विक गणेश
जपान. उगवत्या सूर्याचा देश. प्राचीन सांस्कृतिक परंपरा असलेला समृध्द आणि सुसंस्कृत देश.
अश्या ह्या जपान मध्ये आपल्या विघ्नहर्त्या गजाननाची एकूण २४३ मंदिरं आहेत. ही सर्व मंदिरं सुमारे चारशे ते चौदाशे वर्षांपूर्वी बांधलेली आहेत. जपान्यांचं कौतुक असं, की त्यांनी ही सर्व मंदिरं नुसती जपलीच नाहीत, तर ती नांदती ठेवली. या सर्व मंदिरांमध्ये रोजची पूजा-अर्चा व्यवस्थित होईल, अशी एक पध्दती विकसित केली. त्यामुळे टोकियो मधील ‘असाकुसा’ चे ‘मात्सूचियामा शोदन मंदिर’, जे सन ६०१ मध्ये बांधल्या गेलं होतं, ते आजही तसंच आहे. यातील श्री गणेशाची मूर्ती ही १४२० वर्ष जूनी आहे.
जपान मध्ये गणपती ला साधारण पणे ३ – ४ नावांनी ओळखतात. ‘बिनायक-तेन’ हे त्यातील एक नाव. जपानीत ‘तेन’ म्हणजे देव, ईश्वर. ‘गनबाची’, ‘गनवा’, ‘गणहत्ती’ ही नावं सुध्दा चालतात. पण जपान मध्ये गणपती साठी सर्वात प्रचलित असलेलं नाव आहे – ‘कांगितेन’. जपान मध्ये गणेशाचं आगमन झालं ते प्रामुख्याने बौध्द भिक्षुंच्या माध्यमातून. ओडिशा च्या बौध्द भिक्षुन्नी ‘तांत्रिक बौध्द धर्मात’ गती घेतली होती. ते प्रथम चीन मध्ये गेले आणि नंतर तेथून जपान मध्ये. साधारण दीड हजार वर्षांपूर्वी, जपानी लोकांना, ‘गणपति’ ह्या देवतेची ओळख झाली.
आपल्या भारता सारखंच, जपान मध्ये सुध्दा गणेशाला ‘विघ्नहर्ता’ समजलं जातं. पण यात थोडा फरक आहे. जपानी मान्यतेनुसार गणपती ही देवता, पहिले एखाद्या कामात अडथळे निर्माण करते आणि मग मात्र पूर्ण ताकतीनिशी, ह्या सर्व अडथळ्यांचं निवारण करून मांगल्य निर्माण करते.
ऐतिहासिक हिरोशिमा शहाराजवळ ‘इत्सुकूशिमा’ द्वीपावर गणेशाचे एक अत्यंत प्राचीन मंदिर आहे – ‘दाईशो – इन’. असं म्हणतात, हे मंदिर सन ८०६ मध्ये बांधण्यात आलं. पण हे त्या ही पेक्षा जुनं असावं. गंमत म्हणजे, आपल्या गणेशाचा जपानी अवतार, ‘मोदक’ फारसा खात नाही. त्याची आवडती गोष्ट म्हणजे ‘मुळा’. होय. मुळा... अनेक प्राचीन मूर्तींमध्ये गणेशाच्या हातात, शस्त्रांसोबत ‘मुळा’ दाखविलेला आहे. मात्र मोदकाचेही एक विशिष्ट स्थान जपान मध्ये आहे. भारतीय मोदकाचा अवतार, ‘कांगिदन’ या नावाने जपान मध्ये प्रचलित आहे. ह्या गोड ‘ब्लिस बन’ चा नैवेद्य, गणपती ला दाखवला जातो.
असं म्हणतात, जपान मध्ये ‘इदो (तोकुगावा) काळात, म्हणजे सतराव्या शतकापासून, एकोणीसाव्या शतकाच्या काळात, ‘कांगितेन’ ची हजारो मंदिरं होती. भक्तगण मोठ्या संख्येने गणेशाच्या जपानी अवताराची पूजा करायला यायचे. सध्या मात्र २४३ मंदिरं सुस्थितीत आहेत.
जपान मध्ये दोन तोंडांच्या गणपतीचे सुध्दा प्रचलन आहे. त्याला ‘सशीन कांगितेन’ म्हटलं जातं. आपल्या पुराणात जी ‘नंदिकेश्वराची’ कल्पना आहे, तीच ही देवता. जुन्या मूर्तींवर, चित्रांवर, वस्तूंवर ह्या ‘सशीन कांगितेन’ चा ठसा आहे. दक्षिण जपान च्या ओसाका शहराच्या बाहेर असलेलं, गणेशाचं ‘होझांजी मंदिर’ हे जपान मधील श्री गणेशाच्या, सर्वाधिक भक्त संख्या असलेल्या मंदिरांपैकी एक आहे. तुलनेने अलिकडच्या, म्हणजेच सतराव्या शतकात बांधलेल्या ह्या मंदिरा बद्दल, जपान्यांच्या मनात प्रचंड श्रध्दा आहे.
जपान मध्ये गणेशाची काही मंदिरं अगदी अलीकडे, म्हणजे गेल्या पन्नास वर्षात बांधलेली आहेत. त्यातील चिबा शहराच्या साकुरा भागात असलेलं ‘गणेश मंदिर’, प्रसिध्द असून याच नावाने ओळखलं जातं.
एकुणात काय, तर सूर्याचं सर्वप्रथम दर्शन घेणार्या ह्या देशात, गणेश भक्तीची परंपरा फार प्राचीन आणि सनातन आहे. आणि आता तर गणेश भक्तांची संख्याही वाढते आहे.
*- प्रशांत पोळ*
*#वैश्विक_गणेश #GlobalGanesh*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें