गुरुवार, 4 अक्टूबर 2018

डेंगी: रुग्णांची लूट डॉ. अनंत फडके

डेंगी: रुग्णांची लूट
डॉ. अनंत फडके
पुण्या-मुंबईसह अनेक भागात डेंगीची साथ पसरून तापाचे रुग्ण व त्यांचे आप्तेष्ट यांच्यात घबराट पसरली आहे. काही डॉक्टर्स त्याचा गैरफायदा घेऊन रुग्णांची फसवणूक, लूट करत आहेत. म्हणून हा लेख.
डेंगी हा विशिष्ट प्रकारच्या (एडीस इजिप्ताय) डासामार्फत पसरणारा एक प्रकारचा विषाणू-ताप आहे. त्याचे दोन उप-प्रकार आहेत. साधा डेंगी व ‘गुंतागुंतीचा डेंगी’. साध्या डेंगीचा ताप इतर विषाणू-तापापेक्षा सहसा वेगळा करता येत नाही. मात्र तीव्र डोकेदुखी, कंबरदुखी, खूप थकवा, पुरळ अशी डेंगीची खास लक्षणे काही जणांमध्ये असतात. साध्या डेंगीचे अनेकदा निदान होत नाही. पण त्याने बिघडत नाही; हे रुग्ण ५-७ दिवसात आपोआप बरे होतात. तोपर्यंत ताप, डोकेदुखी, अंगदुखी यावर पॅरासिटॅमॉलची एक ते दीड गोळी दिवसातून ३-४ वेळा गरजेप्रमाणे देणे व विश्रांती एव्हढेच सहसा पुरे असते.
अशा व्यक्तीला परत डेंगी झाला तर मात्र गुंतागुंत होते. डेंगीच्या पहिल्या अॅटॅक मुळे शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडिज (प्रतिपिंडे) व या दुस-या डेंगीचे विषाणू यांच्यातील संयोगामुळे अपाय होतो. रक्तातील प्लाझमा केशवाहिन्यातून पाझरून रक्तदाब कमी होणे, पोटात, छातीत पाणी होणे; रक्तातील प्लेटलेट्सचा (बिंबाणू) मोठया प्रमाणावर नाश होऊन रक्तस्त्राव होणे (मेंदू इ नाजूक जागी थोडा रक्तस्त्राव झाला तरी धोकेदायक असते); यकृत, मूत्रपिंड इ. ना इजा अशी गुंतागुंत सुमारे दहा टक्के रुग्णांमध्ये होते. अशा रूग्णांमध्ये केश-वाहिन्यातून जास्त स्त्राव पाझरला किंवा प्लेटलेट्सचे प्रमाण  १०,००० च्या खाली जाऊन (निरोगी व्यक्तींमध्ये ते दर घनमिली-लिटर मागे ते दीड ते चार लाख असते) रक्तस्त्राव झाला तर इस्पितळात दाखल करून खास उपचार करावे लागतात. उरलेल्यांमध्ये विश्रांती, भरपूर पाणी, द्रव पदार्थ घेणे आणि  ताप, डोकेदुखी-अंगदुखी यावर पॅरासिटॅमॉलची एक ते दीड गोळी दिवसातून ३-४ वेळा गरजेप्रमाणे देणे एव्हढेच सहसा पुरे असते. पॅरासिटॅमॉल सोडून दुसरे कोणतेही वेदनाशामक घेऊ नये. (त्याने रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते.) मळमळ, उलटया, जुलाब इ. झाल्यास त्यावरही उपाय करावे लागतात. गुंतागुंतीचा डेंगी झालेले बहुसंख्य रुग्ण ८-१० दिवसात बरे होतात.
अनेकांना प्रचंड अशक्तपणा येतो. तो काही दिवसांनी आपोआप जातो. सलाईन म्हणजे केवळ निर्जंतुक मिठाचे पाणी असल्याने त्याने अशक्तपणा जात नाही. (पण अज्ञानी, वजनदार आप्तेष्टांचा दबाव, विमा-कंपन्यांचा कारभार यामुळे शास्त्रीय पद्धतीने उपचार करणा-या डॉक्टरांनाही या ‘इतर कारणांमुळे’ कधी-कधी अकारण सलाईन द्यावे लागते.) उलट्यांमुळे पोटात पाणीही रहात नसेल, रक्तदाब कमी झाला अशासारख्या परिस्थितीतच सलाईनची  गरज असते. पण रुग्ण खात-पीत असतानाही सलाईन लावले आहे असे विनोदी चित्र अनेकदा दिसते.  
डेंगीच्या धोक्यापासून वाचण्यासाठी रुग्णाला ‘गुंतागुंतीचा डेंगी’ झाला आहे का ते शोधायला हवे. हिमोग्राम ही साधी रक्त-चाचणी करायला हवी. त्यातील ‘प्लेटलेट-काऊंट’ दीड लाखच्या खाली आहे असे आढळले तर ‘गुंतागुंतीचा डेंगी’ आहे असे समजून दोन-तीन दिवसानी परत ‘प्लेटलेट-काऊंट’ (पूर्ण ‘हिमोग्राम’ ची गरज नाही) करायला हवा. प्लेटलेट-काऊंट पहिल्याच तपासणीत १ लाखाच्या खाली आढळला किंवा फार वेगाने खाली येत असला तर रोज प्लेटलेट-काऊंट  करायला हवा. प्लेटलेट-काऊंट ४०,००० च्या खाली घसरला, कातडीवर छोटे डाग दिसले तर रुग्णावर लक्ष ठेवावे लागते; १०,००० च्या खाली गेला तर नीलेमार्फत प्लेटलेट्स द्याव्या लागतात. शास्त्रीय पद्धतीनेच उपचार करायचे असे पथ्य पाळणा-या एका तज्ञ डॉक्टरने सांगितले की त्यांच्या डेंगीच्या ५०० रुग्णांपैकी फक्त ५० जणांना सलाईन लावावे लागले. पैकी २५ जणांबाबत वर निर्देशिलेल्या ‘इतर’ कारणामुळे सलाईन दिले! फक्त सात जणांना प्लेटलेट्स द्याव्या लागल्या व एकही रुग्ण दगावला नाही.
‘डेंगी एन.एस.वन’ या रक्त-चाचणीतून पहिल्या पाच दिवसात डेंगीचे नेमके निदान होते. पाचव्या दिवसानंतर दुस-या दोन रक्त-तपासण्यातूनही  डेंगीचे नेमके निदान होते. या तपासण्यांसाठी प्रत्येकी सुमारे सहाशे रु. खर्च येतो. त्यांचा निष्कर्ष काहीही आला तरी उपचार बदलत नाहीत. उपचार फक्त हिमोग्राम (सुमारे दीडशे रु.) व रुग्णात दिसणारी लक्षणे यावर अवलंबून असतात. त्यामुळे सरसकट या चाचण्या करण्यात अर्थ नाही. पोटात, छातीत पाणी, मूत्रपिंड, यकृत यांना इजा हे ओळखण्यासाठीच्या तपासण्या आहेत. पण ‘गुंतागुंतीचा डेंगी’ झालेल्या फक्त काही जणांमध्येच त्यांची खरी गरज असते.
डेंगीचे विषाणू मारायला औषध नाही. ते शरीरच मारते. तोपर्यंत लक्षणांवर उपचार करणे व प्लेटलेट-काऊंटमध्ये गंभीर घसरण व इतर गुंतागुंत होते आहे का यावर लक्ष ठेवणे एव्हढेच बहुसंख्य रुग्णांच्या बाबतीत आवश्यक असते.
वरील सर्व शास्त्र गुंडाळून अनेक ठिकाणी अकारण तपासण्या, अकारण उपचार याचा मारा चालू आहे. निदान रुग्णांनी, आप्तेष्टांनी त्याची मागणी करू नये.
झाडी-झुडुपे, गवत, कचरा यात डास तयार होत नाहीत तर साचलेल्या पाण्यात होतात. डेंगीच्या डासांचे वैशिष्टय म्हणजे ते साचलेल्या स्वच्छः पाण्यात जन्मतात व घरांमध्ये राहतात. फुलदाणी, कुंड्या, फ्रीजच्या खालील ट्रे, एअर-कंडीशनर, तसेच उघड्यावरील टायर, फुटके डबे, कौले, करवंट्या इत्यादीत पाणी साठल्यास तिथे डेंगीचे डास होतात. तसेच पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे राहिल्यानेही डास होतात. हे सर्व टाळायला हवे. घरातील पाणी साठवणुकीची पिपे इ. आठवड्यातून एकदा पालथी करून पूर्ण रिकामी करून धुवायला हवी. एकंदरितच डेंगीच्या डासांचा  बंदोबस्त नागरिकांनीच करायला हवा. डेंगीचे डास झाल्याबद्दल पालिकेचे कर्मचारी, अधिकारी यांना दोष देणे चुकीचे आहे. पालिकेने योग्य आरोग्य-शिक्षण जोरदार करायला हवे व डेंगी झालेल्या वस्तीत डास नाशकाची घरांमध्ये फवारणी करायला हवी. डेंगीचे डास घरात असल्याने घराबाहेर फॉगिंग करणे निरर्थक आहे

कोई टिप्पणी नहीं: