शुक्रवार, 22 अगस्त 2014

लोकसंस्कृतिबाबत

लोकसंस्कृतिबाबत

Sandhya Soman -- फेसबुकवर

दहीहंडीवर त्यांचे ठणठणून आणि आपले तणतणून झाले नुकतेच.
पण महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई-कोकण भागामध्ये हा दहीहंडीचा उत्सव आला कुठून?
तर 'आभीरायण' ह्या पुस्तकानुसार त्रैकूटकांच्या भागवत धर्माच्या श्रद्धेतून हा उगम संभवतो.
आता हे त्रैकूटक कोण? 
नाशिकच्या आभीर साम्राज्याचा अंत साधारण इ.स. ४१४ च्या आसपास झाला. त्यांचाच नातेवाईक आणि मांडलिक किंवा प्रांताधिकारी असलेला इंद्रदत्त. हा त्रैकूटकांच्या या घराण्याचा मूळ पुरुष.(इ.स. ४१४ ते ४४०)
अनिरुध्दपूर हे त्रैकूटकांच्या राजधानीचे ठिकाण. हे म्हणजे आत्ताची आपली अंधेरी म्हणे.
त्रैकूटक राजे स्वतःला सामर्थ्यवान असे अपरांताचे स्वामी मानतात. अपरांतातील दुर्ग, नगरे आणि समुद्र यांचे ते संरक्षक आहेत असे सांगतात.
हा पहिला इंद्रदत्त त्याच्या नृत्यसंगीताच्या आवडीने कोकणच्या जनमानसात,लोकगीतात स्थान मिळवून आहे असे लेखक गंगाधर पारोळेकर म्हणतात.
'आंबा पिकतो..रस गळतो..कोकणचा राजा झिम्मा खेळतो" यातील कोकणाचा राजा म्हणजेच हा इंद्रदत्त. आभीर पार आधीपासूनच आपला आनंद नृत्यातून प्रकट करत असत. हा राजाही असा लोकगीतात रस भरून गेला.
मला आनंद हा की ह्या झिम्म्याच्या गाण्याचा उगम मिळाला.
-------------------------------------------------------------------------------
मेधा वाडदेकर -- फेसबुकवर

श्रावण महिना सुरु आहे, श्रावणातल्या पारंपारिक पद्धती पैकी एक म्हणजे, सवाष्णीना आणि मुलं बाळं असलेल्या सवाष्णीना (उदा. मंगळागौरी, शुक्रवाराच्या जीवन्तीची पूजा इ. ) बोलावणे... ह्या सगळ्या पद्धती लहानपणापासून बघितल्या आहेत आणि माहिती झाल्या आहेत.. पण खरं सांगायचं तर कधीही विचार नाही केला त्यावर.. आता अचानक विचार आला आणि.... 
सवाष्ण जेवायला घालायचं तर्कशास्त्र काही केल्या कळत नाहीये. पारंपरिक चौकटीत राहून विचार केला तर एक सवाष्ण- जिचा पालनपोषण करणारा नवरा जिवंत आहे,तिला जेवायला बोलावून ‘पुण्य’ मिळविण्याचा हा उफराटा प्रकार कुठला? त्यापेक्षा नवऱ्यामागे हिमतीने जगून मुलांना वाढविणाऱ्या एकाकी विधवेला मान देऊनही पुण्य मिळवता येणार नाही का? आणि विधवाच कशाला, एकाकी जीवन जगणाऱ्या परित्यक्ता, प्रौढ अविवाहिता किंवा घटस्फोटिता यांना यात सहभागी करून घेतलं, त्यांची सुखदु:खं जाणून घेतली, तर चालण्यासारखं नाही का? मुळात स्त्रीच्या वैवाहिक स्थितीनुसार तिची ‘प्रत’ ठरविण्याचा अट्टहास आता कालबाह्य झालाय असं कुणालाच वाटत नाहीये का? ती सधवा आहे की विधवा आहे, की अविवाहित आहे, यापलीकडे जाऊन- ती माणूस म्हणून कशी आहे, याला काही महत्त्वच नाही का? हेकेखोर, मत्सरी आणि वाईट मनाच्या (पण मुलंबाळं असलेल्या) सवाष्णीला मान देऊन पुण्य मिळतं; आणि मनानं चांगल्या असलेल्या, पण या वर्गात न बसणाऱ्या स्त्रीला यात सहभागी करून घेतलं तर पुण्य जोडलं जात नाही, हा विचार अवास्तव नाही का?
मेधा आपल्या समाजात विधवा किंवा एकाकी पडलेल्या स्त्रियांसाठी कोणतीही सामाजिक सपोर्ट सिस्टम नसणे ही चूकच. ती निर्माण करण्याचा प्रयत्नही मोठ्या प्रमाणात केला जातो परंतु तो चिरंतन ठरलेला नाही तर त्यावर अजून जास्त विचारपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र वरील सवाष्ण पद्धतीचा एक फायदा असावा असे मला वाटते. आपल्याकडे आयुर्वादाच्या ज्ञानाचे अतीव विकेंद्रीकरण करण्याची पद्धत होती व माझ्या मते त्यामुळेच तो इतका टिकला. ज्ञानाचे छोट्या छोट्या प्रमाणांत विभाजन करायचे आणि तेवढा वाटा जतन करण्यासाठी कोणाकडे तरी सोपवून द्यायचा. नवीन लग्न झालेल्या मुलीने मुले-बाळे असलेल्या स्त्रीचे अनुभव जाणून घेण्याची ती एक सुयोग्य व्यवस्था होती कदाचित. प्रत्येक गोष्टीचे जस्टिफिकेशन करायचेच असा माझा विचार नाही. उलट खोलवर विचार करून त्यातले ज्ञान समजून घेण्यात आपली आजची पिढी मागे पडू नये हा तो विचार आहे कारण तसे झाले तर आपला ज्ञानाचा साठा व झरा आटेल ज्याची आज जगासमोर आपल्याला गरज आहे. तो असा काळ होता जेंव्हा ऑबस्ट्रेटिक्स आणि गायनॉकॉलॉजी कॉलेज मधे शिकण्याची परंपरा नव्हती. अशा वेळी नवीन लग्नाच्या मुलीला थोडके पण अत्यावश्यक ज्ञान मिळण्याची ती एक चांगली संधि असू शकते. थोडा हा ही विचार करू या, कारण तुमचा सामाजिक विचार करण्याचा मंच आहे. आयुर्वेदाचे थोडे थोडे ज्ञान आजीच्या बटव्याच्या रुपाने स्त्रीकडे असणे हा तिच्या एमपॉवरमेंटचा एक मोठा स्रोत होता असे मला वाटते. कदाचित तुमचा मंच या विषयावर एखादी वक्तृत्व स्पर्धा घेऊ शकेल.

कोई टिप्पणी नहीं: