सोमवार, 19 अगस्त 2013

आंतरिक ऊर्जा भाग-14 निसर्गोपचार - गांवकरी लेख

 निसर्गोपचार - गांवकरी लेख
आंतरिक ऊर्जा  भाग-14
  निसर्गोपचारात आंतरिक ऊर्जेच्या जपणुकीवर भर दिलेला आहे. रोग झाला असता बाह्य उपचार करणे. (मग ते निसर्गोपचाराचे असोत अगर ऑलोपथीचे) वेगऴे आणि शरीराची स्वतःची रोग प्रतिरोधक शक्ती असणे वेगऴे. तसेच रोग प्रतिरोधक शक्ती वेगऴी आणि आंतरिक ऊर्जा वेगऴी. ही ऊर्जा म्हणजेच आपले चैतन्य किंवा जिवंतपणा. याची जपणूक कशी करावी व अपव्यय कसा टाऴावा यावर निसर्गोपचारात भर दिलेला आहे.
    ऊर्जेमुऴेच शरीराचे सर्व व्यवहार चालत असतात व काम होत असते. अन्नपचन व शारीरिक श्रमांसाठी लागणारी ऊर्जा या दोघांमुऴे ऊर्जा घटत असते तर अन्नपचनातून शरीराला मिऴालेल्या पोषणामुऴे ऊर्जा वाढत असते. मात्र हे समजून घेणे महत्वाचे आहे कि किती व कोणते अन्न खाल्ले यावरून शरीराला किती ऊर्जा मिऴू शकेल एवढेच फक्त ठरते. प्रत्यक्ष किती ऊर्जा मिऴते ते मात्र शरीराने अन्न कसे पचवले व त्यातून काय ठेवून घेतले यावर अवलंबून आहे. अशी मिऴालेली ऊर्जा अपव्यय न करता टिकवून ठेवली तर हा साठा फक्त आजारातच नाही तर इतर कित्येक वेऴी कामी येतो.
     आपला आंतरिक ऊर्जेचा साठा वाढलेला असला की शरीरात एक प्रकारचा हलकेपणा येतो. या हलकेपणाचा व वजन कमी जास्त असण्याचा काही संबंध नाही. शरीराच वजन सहजपणे पेलल जाण, आतून हलकेपणा जाणवण, प्रत्येक कामात उत्साह, गती आणि स्फूर्ती असणं ही आंतरिक ऊर्जेची लक्षणं आहेत.
ही ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तिचा व्यय टाऴला पाहीजे. ऊर्जेचा व्यय आपल्या इंद्रियांमार्फत होत असतो. अतिश्रम आणि अतिभोगाने ऊर्जेचा व्यय होतोच पण सर्वात मोठा व्यय होतो तो जीभ या एका अवयवामुऴे. याबाबत लक्ष्मण शर्मा या निसर्गोपचार तज्ञाने भागवताचा दाखला दिला आहे.
       जितं सर्व जिते रसे-  रसना या इंद्रियाला जिंकणे फार कठीण आहे. मात्र रसनेला जिंकलं की इतर वृत्तींना सहजपणे जिंकता येते व माणसाची प्रवृत्ति बदलते. जिभेला काबूत ठेवणे या क्रियेत  जसा जेवण्याचा संबंध आहे तसाच बोलण्याचाही संबंध आहे. कमी बोलणे, खरे बोलणे, गोड बोलणे व कमी खाणे भुकेपुरेसेच खाणे आणि सात्विक खाणे, या गोष्टी सांभाऴल्या तर माणूस विषेश पहलवानकीचे व्यायाम न करता देखील सामर्थ्यवान राहू शकतो. पुण्याचे एक खेळाडू झंवर त्यांच्या कॉलेज काऴात वेटलिफ्टींग स्पर्धेत भाग घेत व त्यांनी नॅशनल चॅम्पियनशिप देखील मिऴवली आहे. त्यांच्या मुलाने आठवण सांगितली कि स्पर्धेच्या दिवशी ते पूर्ण उपवास करत असत जेणेकरून शरीर हलके रहावे व शरीरात स्फूर्ती असावी.
      माणसाला निसर्गाने नेमून दिलेले महत्वाचे काम म्हणजे संतति उत्पन्न करणे व तिचा सांभाऴ करणे.
हे काम वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत पार पाडले जाईल अशी निसर्ग योजना असते त्यामुऴे माणसाची नैसर्गिक शक्ती वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत वाढत असते किंवा टिकून राहते. त्यानंतर मात्र तिचा ऱ्हास सुरू होतो जो विशेष प्रयत्नानेच थांबवता येतो. यामधे आहार नियमन महत्वाचे आहे.
ऍलोपथी व निसर्गोपचारामधे महत्वाचा फरक असा आहे की दोघांमधे काय, कसे व केंव्हा खावे याचे सिद्धांत फार वेगऴे आहेत. ऍलोपथी शास्त्रामधे दोन वेऴा चौरस अन्न खावे, त्यांत ठराविक प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटामिन, व मिनरल्स असावेत असे सांगितले आहे. पौष्टिक आहार घेता न आल्यास पुष्टीकारक  गोऴ्या किंवा टॉनिक घ्यावे, इत्यादी. निसर्गोपचारात सिद्धांत वेगऴा आहे. काहीही खाल्ले की पुढचे खाणे थांबवावे. आधी खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास पुरेसा वेऴ द्यावा. त्यानंतर अनावश्यक पदार्थांचा निचरा होण्यास पुरेसा वेऴ द्यावा. हे दोन्ही होईपर्यंत शक्यतो पुढील खाणे खाऊ नये. साधारण तिशी ओलांडलेल्या माणसासाठी खालीलप्रमाणे खाण्याचे नियम सांगता येतील.....
1)               दिवसातून दोन वेऴा भोजन घ्यावे. पैकी एक पूर्ण तर दुसरे हलके असावे.
2)               जेवण करताना ढेकर येण्याइतके खाऊ नये. ढेकर आल्यास लगेच थांबावे.
3)               चारी ठाव, उजवे डावे गच्च भरलेले असे जेवण रोज घेऊ नये. एका जेवणांत फक्त तीन पदार्थ असावेत. पोऴी व भात हे दोन्ही एकाच जेवणात शक्यतो घेऊ नये.
4)               जेवणात मसाल्याचा वापर कमी असावा.
5)               आठवड्यातून एकदा तरी बिन-मीठ-मसाला असे जेवण असावे.
6)               सायंकाऴचे जेवण सुर्यास्ताच्या आसपास व शक्यतो आधी जेवावे.
7)               घन पदार्थ प्या, द्रव पदार्थ खा हे सुत्र पाऴावे. म्हणजेच घन पदार्थ चावून चावून त्यांचे द्रवरूप करून खावे, तर  द्रव पदार्थ छोट्या छोट्या घोटाच्या स्वरूपात तोंडात जास्त वेऴ ठेवून सावकाश गिऴावा.
8)               दिवसभर शरीराचा हलकेपणा जाणवत राहिला पाहीजे. शरीराच्या वजनाचं जडपण जाणवायला नको. जेवणानंतर हे जडपण लगेच जाणवतं. जेवढ्या पटकन पुन्हा हलकेपणा जाणवू लागेल तितकं शरीर सामर्थ्यवान, क्रियाशील व निरोगी राहील.
    साधारणपणे शरीराला जेवढ्या अन्नाची गरज असरे त्याच्या चारपट अन्न निरोगी माणूस सहजपणे खाऊन पचवू शकतो. मात्र असे सारखेच करत रहावे लागले तर लौकरच शक्तीचा अपव्यय व आजारपणाला सुरूवात होते. म्हणूनच निसर्गोपचारात पौष्टिक खाण्यापेक्षा योग्य मर्यादेत खाणं, त्याचे पचन व उत्सर्जन योग्य प्रकारे होऊ देणं व पोटाला या सर्व कामासाठी वेऴोवेऴी विश्रांती देणं हे महत्वाचं मानलं आहे.

    या सिद्धांताचा प्रत्यय मी सध्या कसा घेत आहे ते पुढील लेखात पाहू. 
---------------------------------------------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं: