मंगलवार, 12 जून 2018

आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान


|| रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

आपण आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या दोन भिन्न प्रवृत्तींच्या विज्ञानाची सांगड कशी घालता येईल याबद्दल चर्चा करीत आहोत. हे काम सोपे नाही. त्यात अनेक ज्ञानशास्त्रीय (epistemological) पेच दडले आहेत. कारण आयुर्वेद हे एकात्मिक विज्ञान आहे, तर आधुनिक विज्ञानाचे स्वरूप विश्लेषणात्मक आहे. आधुनिक विज्ञान पुराव्यांवर अधिष्ठित आहे, तर आयुर्वेद अनुभवाधारित आहे. आधुनिक आरोग्यविज्ञानात शुद्ध रसायनांचा वापर केला जातो, तर आयुर्वेदात नसर्गिक, प्रामुख्याने वनस्पतीज स्रोतांचा उपयोग होतो. आधुनिक विज्ञानाने वनस्पतींचा वापर केला तरी त्याचा भर त्यांतील सक्रिय घटक वेगळे करून प्रत्येक घटक त्यांच्या रासायनिक शुद्ध स्वरूपात वापरण्यावर असतो, तर आयुर्वेदात अनेक वनस्पतींचा वापर एकाच वेळी केला जातो. म्हणजेच आयुर्वेदिक औषध हे ‘अनेकविध सक्रिय रासायनिक रेणूंचे मिश्रण’ असते. आधुनिक वैज्ञानिक संशोधनात प्रामुख्याने रेषीय तर्कशास्त्राचा व एकास-एक सहसंबंधाचा (one – to – one correlation) उपयोग केला जातो; मात्र अनेक आयुर्वेदीय संकल्पनांच्या बाबतीत असा वापर अप्रस्तुत ठरतो. एखाद्या रोगावर दिले जाणारे आधुनिक औषध त्या रोगाने ग्रस्त असणाऱ्या सर्व रोग्यांना लागू पडेल, असे अ‍ॅलोपॅथीत मानले जाते. याउलट आयुर्वेदाच्या दृष्टीने औषध हे प्रत्येकाच्या ‘प्रकृतीनुसारच दिले गेले पाहिजे’. याशिवाय औषधी वनस्पतीतील औषधी घटकांचे प्रमाण हे ऋतुमान, जमीन, भूगोल अशा अनेक घटकांनुसार बदलते. अशा परिस्थितीत या दोन्ही शास्त्रांचा समन्वय साधणे अशक्य नाही, तरी अवघड बनते. ते यशस्वी करण्यासाठी आपल्या परंपरेची शक्ती व मर्यादा यांचे अचूक भान, योग्य शास्त्रीय निकषांची निवड, दुसऱ्या शास्त्राविषयी समुचित आदर, लवचीक दृष्टिकोन व विवेकवाद या सर्वाची गरज असते. शिवाय असा विचार एकटय़ादुकटय़ा वैज्ञानिकाने करून चालत नाही. असे अनेक वैज्ञानिक चमू उभे राहावे लागतात, त्यांचे प्रशिक्षण करावे लागते, त्यांच्या संशोधनासाठी आवश्यक ती संसाधने उपलब्ध करून द्यावी लागतात.. मुख्य म्हणजे हे घडण्यासाठी त्या क्षेत्रातील व सरकारातील अधिकारी व्यक्तींना एका खुल्या वैचारिक पातळीवर येऊन अशा प्रयत्नांसाठी अवकाश खुले करण्याचा ‘राजकीय’ निर्णय घ्यावा लागतो. असे घडू शकते, याचा वस्तुपाठ चीनने घालून दिला आहे. आपण थोडक्यात त्याचा परामर्श घेऊ.

चिनी पारंपरिक वैद्यकाची घोडदौड

तीन-चार दशकांपूर्वी चिनी पारंपरिक विज्ञानाची स्थिती भारताहून फारशी वेगळी नव्हती. वैद्यकाचाच विचार करायचा झाला तर आयुर्वेदाप्रमाणे त्यांच्याकडेही संचित ज्ञानाचा मोठा साठा होता, पण त्यातील कोणते औषध कोणत्या परिस्थितीत कोणाला लागू पडते, याविषयी गोंधळाची परिस्थिती होती. आधुनिकतेची कास धरलेल्या पिढीचा पारंपरिक वैद्यकावर विश्वास नव्हता. आज पारंपरिक चिनी औषध उद्योगाचे मूल्य १२,१०० कोटी डॉलर इतके आहे. चीनमधील औषध उद्योगातील ३० टक्के भाग या पारंपरिक औषध उद्योगाने व्यापला आहे. गेल्या २० वर्षांत या उद्योगाची वाढ तब्बल ३० पटींनी झाली आहे. हे यश सहजासहजी मिळालेले नाही. त्यामागे पारंपरिक चिनी औषधतज्ज्ञांची संशोधन साधना आहे. दर वर्षी हे संशोधक उच्च दर्जाच्या संशोधन पत्रिकांमधून ३,००० पेपर्स प्रकाशित करतात. व्हिएतनाममध्ये १९६०च्या दशकात मलेरियामुळे हजारो माणसे मृत्युमुखी पडली. तेथील सरकारने चीनचे तत्कालीन सर्वेसर्वा माओ यांना त्यावर त्वरित उपाय शोधून देण्याची विनंती केली. माओंनी पारंपरिक चिनी औषधांच्या ज्ञानसाठय़ाचा शोध घेऊन त्यातून नवे औषध निर्मिण्याची जबाबदारी एका संशोधक चमूवर टाकली. त्यांनी त्या कामात ‘इन्स्टिटय़ूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिका’ या संस्थेच्या प्रोफेसर यूयू टू यांना सहभागी करून घेतले. प्रोफेसर टू व त्यांच्या चमूने युद्धपातळीवर काम करून मलेरिया किंवा तापावर वापरल्या जाणाऱ्या दोन हजार पारंपरिक औषधांच्या संग्रहातून चाचण्यांच्या आधारावर ६४० औषधांची निवड केली. विविध शास्त्रीय चाळण्या लावल्यावर अखेरीस ‘आर्टेमिशिया अ‍ॅन्युआ’ (Artemisia annua) या वनस्पतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या वनस्पतीतून ‘आर्टेमिसिनीन’ हा औषधी घटक विलग करण्यात आला..

..गेली कित्येक दशके जगातील कोटय़वधी माणसे मलेरियावरील उपचारासाठी आर्टेमिसिनीन व त्याच्या रासायनिक भाऊबंदांचा उपयोग करीत आहेत. ‘या एका औषधामुळे किमान १३ कोटी लोकांचे जीव वाचले’ असा वैज्ञानिकांचा अदमास आहे. पारंपरिक औषधांच्या गुणवत्तेबद्दल साशंक असणाऱ्या पाश्चात्त्य जगाने आर्टेमिसिनीनचा शोध लागल्यावर सुमारे ४५ वर्षांनी त्याची दखल घेऊन प्रोफेसर टू यांना २०१५ साली वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषक देऊन त्यांचा गौरव केला. आज जागतिक पटलावर चिनी औषधांनी आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. अतिसारापासून मधुमेह, कर्करोग, अवसाद, उच्च रक्तदाबापर्यंत अनेक व्याधींवर चिनी पारंपरिक औषधे किंवा त्यांपासून निर्माण केलेली आधुनिक औषधे जागतिक बाजारावर प्रभाव टाकत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ आता या विषयात रुची घेऊन आपल्या संशोधनाच्या कक्षा वाढवीत आहेत. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषक विजेते इस्रायली वैज्ञानिक आरॉन सिचानोव्हर यांच्या मते ‘एक दिवस असा येईल जेव्हा पारंपरिक चिनी वैद्यक व आधुनिक वैद्यक यांच्या सीमारेषा पुसट झाल्या असतील.’

आयुर्वेद : आपण तयार आहोत?

या पाश्र्वभूमीवर आयुर्वेदाचा विचार केल्यावर काय चित्र दिसते? केवळ रोगनिवारणासाठी नव्हे, तर साकल्याने आरोग्यपूर्ण जगण्यासाठी आयुर्वेद मौल्यवान मार्गदर्शन करू शकते, यात शंका नाही. एका जीनसँगच्या बळावर चीनने हजारो कोटी डॉलर्सचे साम्राज्य स्थापन केले आहे. आयुर्वेदात तर अशा प्रकारच्या डझनभर तरी औषधी आहेत. आधुनिक विज्ञानाला ज्याचे गुह्य़ आता उलगडू लागले आहे, अशी भस्मासारखी मात्रारूपे आहेत. ‘विपरीतगती औषधक्रियाशास्त्रा’सारख्या गुरुकिल्लीने नवे औषध शोधण्याचा कालावधी व खर्च झपाटय़ाने कमी होण्याची शक्यता आहे. पण हे सारे घडण्यासाठी ज्या अनेक गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी आपण सर्व – आयुर्वेदतज्ज्ञ, आयुर्वेद शिक्षण देणाऱ्या संस्था, सरकारी यंत्रणा, सीएसआयआर व आयुषसारख्या नियामक संस्था, आधुनिक विज्ञान व आधुनिक आयुर्विज्ञान या क्षेत्रातील संशोधक व परंपरेचा अभिमान असण्याचा दावा करणारे राजकीय नेते – तयार आहोत का, हा कळीचा प्रश्न आहे. प्रश्न आहे आंतरविद्याशाखीय संशोधन करण्यासाठी हजारो अभ्यासकांना तयार करण्याचा, त्यांना संसाधने पुरविण्याचा, आपल्या शैक्षणिक संस्था व प्रयोगशाळा यांमध्ये संशोधनाला पूरक वातावरण निर्मिण्याचा. जुन्या पोथ्या, पिढय़ान्पिढय़ा जपलेली वैद्यांची कागदपत्रे आणि रेकॉर्ड्स यांचा चिकाटीने अभ्यास करण्याचा. आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात कालानुरूप बदल घडविण्याचा व जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांचा नव्याने वेध घेण्याचा. वैद्य-शास्त्रींच्या जागी संस्कृत, आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या तिन्ही विषयांत पारंगत असणारे वैद्य-शास्त्रज्ञ निर्माण करण्याचा. आयुर्वेदाची पदवी घेऊन अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची आकांक्षा बाळगण्याऐवजी आधुनिक विज्ञानाशी नाते जोडून त्याला चार गोष्टी शिकविण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण करण्याचा.

नास्य चिकित्सेतून अर्धशिशी बरी होऊ शकते. हळदीतून काढलेल्या घटकद्रव्यांच्या मदतीने तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरवर मात करता येते. गुडूची, एलादि वटी व अन्य वनस्पतिजन्य औषधींच्या साह्य़ाने केमोथेरपीच्या विपरीत परिणामांपासून मुक्तता मिळविता येते. निशा-अमलकी, अर्जुनारिष्ट या औषधी ‘टाइप टू डायबेटिस’वर उपयुक्त ठरल्या आहेत. आतापर्यंतच्या संशोधनातून अशी असंख्य ‘लीड्स’ (संशोधनपूर्व तथ्ये) सापडली आहेत; गरज आहे ती त्यांचा पद्धतशीर पाठपुरावा करण्याची, हे संशोधन पूर्णत्वाला नेण्याची. त्यासाठी सर्व जगाला मान्य होतील अशा पद्धतींचा वापर करण्याची. गरज पडेल तिथे आधुनिक विज्ञानाचे निकष नाकारून, प्राचीन ग्रंथात दिलेल्या निकषांची वैज्ञानिकता सिद्ध करण्याची.

आव्हाने असंख्य आहेत, शक्याशक्यता असंख्य. आपण त्यांना भिडण्यासाठी आज कृती केली नाही, तर जग नावाच्या या वैश्विक खेडय़ातील अन्य लोक ती नक्कीच करतील. आजच्या पंचवीस वर्षांनी आयुर्वेदावर आधारित संशोधनाला नोबेल पारितोषिक नक्कीच मिळू शकेल. पण ते संशोधन व त्याला आधारभूत आयुर्वेदाच्या पोथ्या तेव्हा भारतात असतील की युरोप-अमेरिकेत, हा मोठा कठीण प्रश्न आहे.
---------------------------------------------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं: