शनिवार, 21 मार्च 2009

19 -- मातीचा वापर basics of Mud therapy

अनुभवातील निसर्गोपचार
भाग - 19
मातीचा वापर
kept on son_denare_pakshi
निसर्गोपचारात मातीचा वापर मुबलकपणाने करतात. माती म्हणजे पृथ्वी तत्त्व. शरीर मातीतून बनलेले असते व मातीतच मिळणार असते. शरीराला मातीचा उपयोग उत्तम प्रकारे होतो. अशी निसर्गोपचाराची मान्यता आहे.

निसर्गोपचारासाठी माती कशी असावी ? ती शक्य तो नदी काठची व सुमारे 1 ते 2 फूट खड्डा खणून मग त्या खड्यातील खालची माती घेतलेली असावी. ही माती मोठ्या चाळणीने चांगली चाळून घेऊन सूर्याच्या उन्हांत तापवून घ्यायची. वापरण्याच्या आदल्या रात्री साधारणपणे आपण कणीक भिजवतो तेवढी पातळ भिजवून एखाद्या पातळ कापडात गुंडाळून शरीरावर पट्टीच्या स्वरूपात वापरतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा वापर म्हणजे पोटावर मातीची पट्टी ठेवणे. यासाठी सुमारे 6 इंच लांब व 4 इंच रूंद पातळ कापडावर मातीचा थर ठेऊन ते कापड पोटावर ठेवतात व वरून जाड टॉवेलची पट्टी गुंडळतात. काही वेळा पोटावरच सरळ मातीचा लेप देऊन वरून टॉवेल गुंडाळण्यात येतो. या शिवाय छोट्या पातळ रूमालात वरील प्रकारेच पाण्यात कालवलेली व फुलवलेली माती गुंडाळून त्या पट्टया डोळ्यांवर सुमारे अर्धा तास ठेवल्याने डोळ्यांना थंडावा व आराम मिळतो. या शिवाय तोंडाला मातीचा पातळ लेप सुमारे अर्धा तास दिल्याने त्वचा नितळ व मुलायम होते. तसेच शरीरातील लोमकूप स्वच्छ राहवेत व त्यावाटे घाम बाहेर पडण्याची प्रक्रिया जास्त कार्यक्षमतेने व्हावी यासाठी महिन्यातून एकदा संपूर्ण शरीरावर 2 ते 3 तास मातीचा लेप देण्यात येतो. असा मातीचा लेप दिलेल्या व्यक्तिला उन्हांत बसवल्याने माती स्नान व सूर्य स्नान या दोघांचेही फायदे मिळतात.

कित्येक तत्कालिक उपचारांकरिता, विशेषत: त्वचेच्या उपचारांकरिता माती चांगल्या त-हेने वापरली जाते. कुठल्याही प्राण्याचा दंश झाल्यास त्यावर मातीचा लेप देणे ही तत्काळ करता येण्यासारखी उपाय योजना आहे. गांधील माशी, मध माशी, सुरवंट या सारखे प्राणी चावल्याने मोठी दाह व पित्ताच्या गाठी तयार होतात. त्यावेळी कुंडीतील ओली माती, झाडाच्या बुंध्याखालील ओली माती किंवा जमिनीतून खणून काढलेली ओली माती पटकन उपयोगी पडते.
माझ्या लहानपणी एकदा वडीलांच्या हाताने एक मोठा विषारी कोळी चिरडला गेला. त्याने संपूर्ण डाव्या हातावर मोठ्या प्रमाणात फोड येऊन अतिशय आग होऊ लागली. ते सर्व
पांढ-या जाड तंतूंनी विणलेल्या कोळ्याच्या जाळ्यासारखे दिसू लागले. हाताची किंवा बोटाची हालचाल देखील थांबली. त्यावेळी दोन तीन परिचित डॉक्टरांना एकदमच बोलावले होते. त्यापैकी एका डॉक्टरांनी तात्काळ अंगणातील केळीच्या बुंध्यातील माती उकरून काढली व केळीच्या बुंध्याचे सुपट सोलून त्याच्या आत साचलेल्या पाण्यातच ती माती कालवली व संपूर्ण हातावर लेप दिला. या प्रयोगाने फार लवकर माझ्या वडीलांना आराम पडला. असे म्हणायला हरकत नाही की माझे निसर्गोपचाराचे शिक्षण त्या घटनेपासूनच सुरू झाले. त्यानंतर कित्येकदा सुरवंटाचे केस, गांधील माशी, भुंगे व प्रसंगी विंचू दंश अशाही वेळी आमच्या घरी व नातेवाईकांवर मातीचा उतारा देण्यात आलेला आहे.

माती मध्ये कित्येक प्रकार असतात. काळी माती, चिकण माती, लाल माती, पिवळी माती, नदीतील गाळाची माती, पांढरी माती, मुलतानी माती इत्यादी. या सर्व त-हेच्या मातीचे वेगवेगळे वापर करून चेह-यावर लेप दिला जातो. पाश्च्यात्य देशात आता हे एक वेगळे तंत्र तयार होऊ लागले आहे.

लहान मुलांना उघड्या अंगाने मातीत खेळू देणे अत्यंत गरजेचे आहे. फक्त अशा वेळी कोणी तरी मोठी व्यक्ती शेजारी राहून मुलाला मुंगी वगैरे कांही चावत नाहीना एवढे पहायला हवे.

--- XXX ---

2 टिप्‍पणियां:

HAREKRISHNAJI ने कहा…

या उपचारपद्दती बद्द्ल खुप चांगली माहिती लिहिली आहे. मी याचा माझ्या पोटाच्या विकारावर वापर केला आहे. यानी खुप आराम मिळतो.

Unknown ने कहा…

माती पट्टी fungal infection काम करते का