शुक्रवार, 24 अप्रैल 2009

निसर्गोपचाराची सैध्दान्तिक बैठक ( लेखांक 10 perhaps)

भाग-? निसर्गोपचाराची सैध्दान्तिक बैठक

निसर्गोपचाराचे कांही मुख्य सिध्दान्त आहेत व ते ऍलोपथीपेक्षा बरेच वेगळे आहेत. हे आयुर्वेद, होमियोपथी या शास्त्रांना जास्त जवळचे आहेत.

निसर्गोपचाराचा पहिला सिध्दान्त हा कि रोग होतो तो शरीराच्या एखाद्या अवयवाला होत नसून संपूर्ण शरीराला समग्रपणे रोग होत असतो. म्हणूनच रोगाचा उपचार करतांना संपूर्ण शरीराचा विचार झाला पाहिजे. इतकेच नाही तर रोग्याच्या मानसिक व भावनिक स्थितीचा देखील विचार झाला पाहिजे.

रोगाचे प्रकटन व प्रदर्शन हे शरीराच्या एखाद्या अवयवातून होत असते. याचा अर्थ तो अवयव आजारी आहे असा नसून आजार हा पूर्ण शरीराचाच असतो. फक्त रोग प्रकट होण्याचे निमित्त व जागा वेगवेगळ्या असू शकतात. म्हणूनच रोगावर उपाय करतांना संपूर्ण शरीर हे एक युनिट आहे असं मानून उपाय करावा लागतो. अवयवाच्या दुखण्यावर केलेला उपाय हा ताप्तुरता इलाज असतो. तो तेवढाच मर्यादित ठेवला व इतर दीर्घकालीन उपाय केले नाहीत असे चालत नाही. त्याचप्रमाणे उपाय देखील एकत्रितपणे संपूर्ण शरीरावर करायचा असल्याने कित्येक आजारपणांना एकच उपाय आहे असेही दिसून येते. संधिवात किंवा स्पॉण्डिलायटिस असेल तर मातीची पट्टी किंवा चादर स्नान हाच उपाय आणी डायबिटिसला देखील तोच उपाय, तेच पथ्य, तोच व्यायाम असं कसं हे आश्चर्य कांहींना वाटत असतं, त्याचं उत्तर यामधे आहे.

निसर्गोपचारातील दुसरा विचार म्हणजे रोग कसा होतो ? आयुर्वेदाप्रमाणे रोग या शब्दाची उत्पत्ती रूक्‌ या धातुपासून झाली आहे. रूक्‌ म्हणजे जाणीव करून देणे. तेंव्हा आपल्या शरीरामधे बिघाड झाल्याची जाणीव करून देतो तो रोग. हा रोग शरीरात सूक्ष्म किंवा स्थूल रूपात कचरा साठून राहिल्याने होतो. आपल्या शरीराच्या आंत जे जे कांही प्रवेश करते त्यामुळे कचरा साठू शकतो. या व्याख्येमधे फक्त अन्न व पाणी एवढेच घटक मोडतात असे नाही. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे भूमि, आप (पाणी), तेज, वायु, आकाश याचबरोबर मन, बुध्दि आणि अहंकार अशी आठ घटक तत्त्वे मिळून माणूस तयार होतो.
भूमिरापोsनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च।
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा।।
म्हणून आपण कांय खात पितो, तसच आपलं मन कसं वागत, बुध्दि व अहंकार कसे वागतात, आपण चिडतो, त्रागा करतो, ईर्ष्या, द्वेष, लालसा, मोह, मिथ्यावाणी, अहंमन्यता, काम, क्रोध, दुर्बुध्दि, काळजी, चिंता, संशय इत्यादि सर्वांचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. रोगाच्या माध्यमातून शरीर आपल्याला सांगत असते की शरीरात कांही तरी अवांछित असे साठून रहात आहे. ते काढून टाकण्याची काळजी घ्या. म्हणूनच रोगाला शत्रू मानू नये किंवा घाबरू नये.

तिसरा विचार असा आहे कि ऍलोपथी किंवा आयुर्वेदातील दमन चिकित्सेमधे रोगाच्या लक्षणांवरून तत्काळ दाबून टाकणारे औषध आधी दिले जाते. याचा अर्थ शरीराला जो कचरा बाहेर काढायचा होता तो निघण्याचा मार्ग आपण तात्पुरता थांबवला. ही झाली इमर्जन्सी मॅनेजमेंट. कित्येकदा ही गरजेची असते जेणेकरून शरीराला शॉक बसू नयेत. तरी पण ती तशी करण्याची गरज आहे का हे जाणीवपूर्वक ठरवायला हवे. यासाठी रोगी व डॉक्टर यांच्यामध्ये सुसंवादही हवा. मात्र लक्षणे थांबवून आपण रोग बरा झाला अशी समजूत करून घेतली आणी शरीरात दाबून टाकलेला कचरा निघून जाण्यासाठी पुढे कांहीच केले नाही, व शरीरालाही ते नैसर्गिक प्रक्रियेतून जमले नाही, तर हे दाबून ठेवलेले रोग पुढे इतर उग्र रोगात बदलतात. यासाठी आणी दमन चिकित्सेतील उग्र औषंधाचे इतर दुष्परिणाम कमी करण्यासाठी आयुर्वेदात पथ्य योजना करावी लागते. म्हणजे पुन: ती चिकित्सा किचकट व सामांन्याच्या आवाक्याबाहेरची ठरते. तरी पण पथ्य न करण्यापेक्षां ते बरे.

शरीरात साठलेल्या कच-यातून टॉक्सिसिटी किंवा सूक्ष्म कच-याची निर्मिती होऊन दीर्घकालीन आजार उदाहरणार्थ संधिवात, स्पाण्डिलायटिस, दमा, डायबेटिस इत्यादि होतात असा निसर्गोपचाराचा सिध्दान्त आहे. तर मग हा साठलेला सूक्ष्म कचरा केमिकल ऍनॅलिसिस करून दाखवा किंवा जसा टप्प्याटप्प्याने हा साठत गेला त्याच्या मधल्या स्टेजचे केमिकल ऍनॅलिसिस करून दाखवा असा प्रश्न विचारला तर असले कांही प्रयोग कुणी निसर्गोपचारक करून दाखवू शकणार नाही. मात्र कचरा काढायचे उपाय करते राहिल्याने हे रोग बरे होतात असा निष्कर्ष कित्येक ब-या केलेल्या रोग्यांच्या आधारे निघू शकतो. त्यामुळे मी वर वर्णन केलेल्या एकूण सैध्दान्तिक विवेचनाच्या जोडीला रोग्याबाबतची केस हिस्टरी ठेऊन व शास्त्रशुध्द रीतीने प्रयोग करून कांय निष्कर्ष निघतात ते तपासण्याची गरज आहे. असे शास्त्रशुध्द प्रयोग करणे, त्यांची हिस्टरी ठेवणे, त्यांच्या निष्कर्षांची चर्चा व देवाण-घेवाण करणे, थोडक्यात ज्याला रिसर्च मेथोडॉलॉजीचे शास्त्र म्हणतात ते शास्त्र शिकून घेणे हेही आयुर्वेद किंवा निसर्गोपचाराच्या दृष्टिने गरजेचे आहे.
देहशुध्दिसाठी निसर्गोपचारांत प्रत्यक्ष केले जाणारे उपाय आयुर्वेदाचे चिकित्सक कधीच वापरून बघत नाहीत. फक्त त्यांच्या ग्रंथांत या उपायांची माहिती किती चांगली, किती सुसूत्र व किती प्रदीर्घ मांडली आहे ते उतारे वाचून दाखवतात. त्यामुळे आयुर्वेद व निसर्गोपचार यात नेमका फरक माझ्या मते असा की,

निसर्गोपचार = स्वस्थवृत्त व शमन, चिकित्सेपैकी थोडक्याच उपायांचे पुस्तकी ज्ञान पण प्रत्यक्ष वापर ‘शंभर टक्के’.

आयुर्वेद = स्वस्थवृत्त व शमन चिकित्सेचे भरपूर पुस्तकी ज्ञान पण प्रत्यक्ष वापर आणि अनुभवसिद्धी शून्य. त्याऐवजी दमन चिकित्सेवर भर.

आयुर्वेदातील फक्त शमन चिकित्सेचा शास्त्रोक्त वापर अतिशय कौशल्याने करणारे सुमारे 200 खाटांचे पंचकर्म चिकित्सालय पुदुकोट्टई (केरळ) येथे आहे. ते मात्र मेडिकलच्या सर्वच शाखांच्या जिज्ञासूंनी पहाण्यासारखे आहे.
निसर्गोपचार सांगतो की रोग झाल्यास सर्वप्रथम शरीराची एकूण कचरा विसर्जनाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करा. पूर्वी सर्वच डॉक्टर आजारी माणसास अगोदर पोट साफ होण्यासाठी औषध देत असत. कित्येक लहान मुलांमधे आपल्याला ही नैसर्गिक प्रक्रिया पहायला मिळते की ताप आल्यावर त्यांना एक-दोन वेळा उलटी होऊन आराम पडतो. मला स्वत:ला ताप आल्यास मी दिवस भर घोट-घोट पाणी पीत राहणे हे तंत्र वापरते. शिवाय सर्दी होण्याच्या सुरूवातीला नाडीशुध्दी प्राणायामाचा उपाय हमखास लागू पडतो. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी व मधले बोट आणि अनामिका यांनी डावी नाकपुडी बंद करायची. नंतर मनात सारखे आकडे मोजून आधी डाव्या नाकपुडीने चार पर्यंत आकडे मोजत श्वास घ्यायचा, मग उजव्या नाकपुडीने चार पर्यंत आकडे मोजत श्वास सोडायचा, नंतर लगेच तेवढेच आकडे मोजत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा व तेवढेच आकडे मोजत तो डाव्या नाकपुडीने सोडायचा. आकड्यांची संख्या चार वरून वाढवत दहा - पंधरा पर्यंत नेता येते. सकाळ, संध्याकाळच्या संधी-प्रहरात तसेच दुपारी व मध्यरात्री सुमारे एक तास आपला श्वास दोन्हीं नाकपुड्यांतून चालू असतो याला समश्वास म्हणतात. एरवी तो फक्त एकाच नाकपुडीतून चालतो. समश्वासाच्या काळात नाडीशुध्दि जास्त लाभकारी ठरते. एरवी नाकाची स्वाभाविक गति एकाच नाकपुडीतून असल्यामुळे नाडीशुध्दि करतांना त्रास होऊ लागला तर करू नये. सवयीने समश्वासाचा काळही वाढवता येतो.
शरीरातील कचरा जेंव्हा मल मूत्र, घाम व उच्छ्वास या वाटे कार्यक्षमतेने निघून जात नाही तेंव्हा कांय होते? ते पुढल्या लेखांत पाहू. शरीर स्वत:च जाणीवपूर्वक कांही वेगळे उपाय शोधू लागते. यामुळे अनुक्रमे जुलाब व उलटी, ताप येणे, त्चचेचे रोग, श्वासाचे रोग इत्यादि होऊ लागतात. अशा प्रक्रियेला थांबवण्याचा किंवा दमन करायचा प्रयत्न करण्याऐवजी वेगळे पर्याय आहेत. होमियापथीचा पर्याय असा की शरीराने देहशुध्दिचा निवडलेला नवा मार्ग बरोबर असून त्याच मार्गाने पूर्ण निचरा होऊन जाऊ द्या. यासाठी जे औषध देण्यात येते त्याने सुरूवातीला मूळ रोगाची लक्षणे वाढू लागतात व मगच थांबतात असे आपण बघतो. आयुर्वेदातील शमन चिकित्सेत लक्षणाविरूध्द अतिशय सौम्य व बहुधा आपल्या मसाल्यातील गोष्टी किंवा घराभोवतालच्या वनस्पतींचा वापर केला जातो.
{निसर्गोपचारात देखील लक्षण विरोधी करण्याचा प्रयत्न केला जातो. Sameer, something wrong. Pl sp}










--- XXX ---

गुरुवार, 23 अप्रैल 2009

भाग-? कांही अनुभव व ठोकताळे (लेखांक 5 perhaps)

भाग-? कांही अनुभव व ठोकताळे
बरेचदा आजारपण असतांना एखाद्या पुस्तकी उपायाऐवजी मी वेळोवेळी अनुभव घेतलेले कांही सोपे सोपे उपाय करते. हे उपाय करून बघतांना मी एक तंत्र वापरते ते असे - आपल्याला नेमकं कांय होतय हे आधी चांगल्या डॉक्टर कडून समजून घ्यायचे. त्यात पुढील दोन दिवसात काय काय कॉम्प्लीकेशन होणार आहेत. दोन दिवसात रोग कमी झाला नाही तर काय करायचे हे सर्व डॉक्टर बरोबर आधी बोलून ठेवायचे. मग सुरूवातीचा थोडासा त्रास सोसायची मनाची तयारी ठेवायची आणि हे असले सोपे-सोपे उपाय करून बघायचे.
यातून अनुभव जसा जसा वाढत जातो तशी तुमची औषधांची गरज कमी होऊन तुम्ही आपल्या रोगाला हँडल करू शकता. अस छोट्या छोट्या अनुभवातून निसर्गोपचाराचे ज्ञान समृध्द करता येतं. मिळालेल्या थोड्या थोड्या ज्ञानाचा वापर करता येतो. एम्‌.बी.बी.एस्‌ सारखं चार साडेचार - पाच वर्ष थांबून रहावा लागत नाही. मात्र डिग्रीपण मिळत नाही. पण स्वत:ला बरं करण्यासाठी डिग्री कशाला लागते ? हे आपलं माझं माझ्यापुरतं तत्वज्ञान.
एकदा मला खूप खोकला होऊन घसा खूप दुखू लागला. थंडीचे दिवस - मी दिल्लीत रेस्ट हाऊस मधे - आणि जवळ औषध काही नाही. मग गरम पाण्यात टॉवेल बुडवून गळ्याभोवती लपेटला आणि त्यावर दोन कोरडे टॉवेल लपटले. दहा पंधरा मिनिटात आराम पडला. हेच तीन चार तासांनी करत राहिल्यावर दुस-या रात्री पर्यंत खोकलाच थांबला होता.
सर्दी पडस्‌ किंवा ताप आल्यावर तर हटकून मी एक करते. दर पांच दहा मिनिटांनी घोट घोट पाणी पीत रहाणे. एरवी औषध न घेतले तर सात दिवसांत आणि औषध घेतल तर एकाच आठवड्यांत बरी होणारी सर्दी माझी दोन दिवसांत बरी होते. शिवाय वारंवार सर्दी होण्याची फ्रिक्वेन्सी कमी होते ते वेगळेच. किरकोळ तापात देखील मला याच्या पलीकडे जास्त औषध घ्यावं लागत नाही की रजा काढावी लागत नाही.
आपल्या खाण्यांत कांही उलट सुलट झालं किंवा कधी परक्या गांवी जाऊन पाणी बदलल की आपल्याला डिसेंट्री होते. अशावेळी मी भरपूर पाणी पिते. फारच त्रास असेल तर भरपूर बडीशोप पण खाते. हे मी पंधरा वीस वर्षे अनुभवले. आता तर डिसेंट्रीत मीठ-साखर-पाणी घ्या, पाण्याचा इनटेक वाढवा, अस नेहमीच सांगितलेलं आपण ऐकतो.
--- XXX ---
दै. गांवकरी नाशिक,
मंगळवार दि. ???