सोमवार, 28 जुलाई 2008

03- शाकाहाराचं महत्त्व.-- Merits of being vegetarian..

शाकाहाराचं महत्त्व...
मंगळवार दि. 11 फेब्रुवारी, 1997 गावकरी, लेखांक 3.

निसर्गोपचार असा शब्द आयुर्वेदात कोठेही वापरलेला नाही. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी ऍलोपथी पण आजच्या इतकी प्रगत नव्हती. ऍलोपथीला मेडिसिन्स सायन्स्‌ म्हणत असत. त्या काळात जर्मनीत ऍलोपॅथीतील औषधांना वैतागलेल्या ब-याच लोकांनी याशिवाय काही उपाय आहे का या प्रश्नातून सुरूवात केली. त्यांनी जे उपाय शोधले त्यात सर्वात प्रसिद्घ झाले लुई कुन्हे यांचे जलचिकित्सेचे प्रयोग. शिवाय इलेक्ट्रोपॅथी चुंबकचिकित्सा, माती चिकित्सा, सूर्यस्नान चिकित्सा याही गोष्टी प्रचलित झाल्या. आहारशास्त्रातही नवीन प्रयोग सुरू झाले. त्यामध्ये मांसाहाराचे दुष्पपरिणाम लक्षात आलेल्यांनी शाकाहाराची मोहीम सुरू केली. शाकाहाराची फार मोठी परंपरा भारतातही आहे व जगातील शाकाहारी लोकांची जास्तीत जास्त टक्केवारी भारतात आहे. पण त्याचा उगम नेमका कुठे ते सापडत नाही. आयुर्वेदात मांसाहार हा ठराविक रोगांनाच वर्ज्य सांगितला आहे. पण म्हणून त्याचा सरसकट प्रचार कुणी सुरू केला असेल तर तशी नोंद माझ्या माहितीत नाही. पण पुराण काळातले चार दाखले मला माहीत आहेत.
एकदा पृथ्वीवर खूप दुष्काळ पडला असता प्रजेने पार्वताची आळवणी केल्यावर तिने प्रसन्न होऊन असे सांगितले की, तुम्ही मांसाहार सोडावा. त्याऐवजी मी तुमच्यासाठी भरपूर शाकभाज्यांची निर्मिती करते ती तुम्ही खावी. हाच शाकंभरी देवीचा अवतार. तिथून पुढे शेतीला व शाकभाज्यांच्या उत्पादनला सुरूवात झाली, असे देवी भागवत सांगते. दुसरा दाखला आहे, पातंजली योगसूत्रांचा - त्यामध्ये योगाभ्यासाच्या सुरूवातीला जे पाच यम पाळायला सांगितले - म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि असंग्रह ज्ञ् त्यात अहिंसा सर्वप्रथम आहे. त्यामुळे परमयोगी म्हटलेल्या कृष्णाच्या भक्तीतून सुरू झालेला वैष्णव सांप्रदाय हा शाकाहारी ! या कथेखेरीज दुस-या कथांमधील गणपती हा गजवदन असल्याने शाकाहारी तर दत्तात्रेय हाही शाकाहारी अशा प्रकारे विविध धार्मिक सांप्रदायातून शाकाहाराची परंपरा आली. भगवान महावीर व भगवान बुद्घ यांनी पण अहिंसा व करूणेचा महिमा गात यज्ञातून चाललेली बळीची प्रथा बंद केली. यापैकी जैनांनी पूर्णपणे तर बुद्घधर्मियांनी पण मोठ्या प्रमाणावर मांसाहार वर्ज्य केला. या पुराणकथांखेरीज थोड्या आधुनिक काळात खास पर्यावरण रक्षणासाठी, निदान हरीण, मोर यासारख्या प्राण्यांच्या रक्षणासाठी पिढ्यान पिढ्या मांसाहार न करण्यासाठी प्रतिज्ञा घेतलेल्या बिशनोईसारख्या काही पोटजाती राजस्थान, हरियाणा प्रांतात आढळतात. चातुर्मासात मांसाहार न करण्याची पद्घत देशात खूप ठिकाणी आहे. तसेच पंढरपूरची माळ घेतली तरी लोक मांसाहार सोडतात, ही वारकरी परंपरा सात-आठशे वर्षापूर्वीची आहे.
एकूण काय तर शाकाहाराची परंपरा निर्माण होण्यामध्ये धर्म, पर्यावरण व आरोग्य शास्त्र या तीनही विचारांनी हातभार लावलेला आहे इथे थोडे विषयांतर करून सांगायला हरकत नाही की लिओ टॉलस्टाय यांनी मानवधर्माचा एक आवश्यक सिद्घांत म्हणून म्हणजेच पुन्हा करूणा या मुद्दातून शाकाहाराचा विचार रशियात मोठ्या प्रमाणावर मांडला. निसर्गोपचारामध्ये तर शाकाहार हा मस्ट मानला गेला आहे. त्यासाठी डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा दाखलाही आहे. जर माणसाचे पूर्वज माकड हे शाकाहारी आहे तर प्रकृतीने माणसालासुद्घा शाकाहारी केले असावे. शिवाय शरीरशास्त्राचा दाखला आहे - आपल्या संपूर्ण अन्नमार्गाची म्हणजे तोंडापासून तर मोठ्या आतडीच्या शेवटच्या टोकापर्यंत लांबी मोेजली व तिची रचना पाहिली तर ती शाकाहाराच्या पचनाला उपयुक्त आहे, पण मांसाहाराच्या पचनाला उपयुक्त नाही. यावरूनही माणसाने शाकाहारी असले पाहिजे. मांसाहार केल्यास शरीराला अन्न म्हणून कमी उपयोगाचा पण कचरा म्हणून जास्त त्रासाचा ठरतो आणि तो कचरा काढून टाकण्यासाठी शरीराला जास्त परिश्रम घ्यावे लागतात, इत्यादी बरीच कारणे निसर्गोपचारात सांगितली आहेत.
सुमारे दीडशे वर्षापूर्वी जर्मनीतल्याच जुस्ट या माणसाचे रिटर्न टू नेचर हेही पुस्तक खूप गाजले. त्यातूनच पुढे नेचरोपॅथी हा शब्द उदयाला आला. त्यात त्यांनी पाणी, माती, ऊन निसर्गात मुक्त संचार व आहारातील संयम या उपायांवर भर दिला व कृत्रिम अन्नाचा वापर तसेच औषधांचा वापर का वा कसा टाळता येईल त्याबाबतचे मत मांडले. म्हणून आज असे म्हणता येईल की, जर्मनीमधला निसर्गोपचार म्हणजे पाणी, माती, सूर्य व आहार नियमन या उपायांनी केलेला उपचार.
जर्मनीतील हे उपचार अमेरिकेत गेले तेव्हा दोन गट पडले. एका गटाने संपूर्णपणे आहार नियमनावरच भर दिला. ते स्वत:ची शैली हीच प्युअर नँचरोपॅथी असे मानतात. याउलट काहींनी आहार, माती, पाणी, ऊन, चुंबक, इलेक्ट्रो, ऍक्युप्रेशर, ऍक्युपक्चर, फेथहिलिंग रेकी वगैरे सर्व बाबींचा त्यात समावेश केला. मात्र आयुर्वेद व होमिओपॅथी सोडून आयुर्वेद त्यांना माहीत नव्हते, म्हणून तर होमिओपॅथीमध्ये औषध देतात.
जर्मन पुस्तकातील हे आधुनिक विचार भारतात आले, ते लक्ष्मण शर्मा, महात्मा गांधी इत्यादींच्या प्रयत्नातून भारतातून आल्याबरोबर या विचारांना आयुर्वेदातील कित्येक, विचार व परंपरा जोडता येणे शक्य आहे हे ब-याच जणांना कळून आले, तसा दोन्ही शास्त्रांची सांगड घालून वापरही होऊ लागला. अशी सांगड घातलेलं एक अप्रतिम पुस्तक म्हणजे धन्वंतरी या आयुर्वेदिक मासिकाने सन 1966 मध्ये गंगाप्रसाद नाहर गौड या लेखकाचा प्राकृतिक चिकित्सा नावाने प्रसिद्घ केलेला अंक !
मात्र दुदैवाने आजून एक गोष्ट घडली ही परदेशातून आलेली नेचरोपॅथी शिकून प्रॅक्टिस करू पाहणा-या लोकांकडे वैद्यकशास्त्र डिग्री नसल्याने आयुर्वेद व ऍलोपॅथी दोन्हीतील डॉक्टर त्यांना मान्यता किंवा सन्मान देईनात. पैकी ऍलोपॅथी डॉक्टरांनी दाखविलेली उपेक्षा कोणी फारशी मनावर घेतली नाही, कारण त्या प्रवृत्तीशी लढा भारताबाहेर जर्मनी, इंग्लंड, अमेरिकेमध्येही चालला आहेच. पण ऍलोपॅथीने उपेक्षा केलेल्या वैद्यांनीही आपल्याला मान्यता देऊ नये याचे मोठे वैषम्य वाटू लागले. त्यामुळे आम्ही जे उपचार करतो ते आयुर्वेदापेक्षा किती वेगळे आहेत हे सिद्घ करण्यातच त्यांची शक्ती वाया जाऊ लागली. तिकडे आयुर्वेदाबाबत बोलायचे झाले तर त्यात सांगितलेल्या पंचकर्म वगैरे पद्घती किंवा शमन चिकित्सेतील इतर सिद्घांत पद्घतशीरपणे किंवा नेमकेपणाने वापरून फक्त त्यातूनच रोग बरा करू शकणारा वैद्य आयुर्वेदात नाही. वैद्य म्हटला की तो दमन चिकित्सेचा वापर हमखास करणारच. एवढेच नाही तर ही दमन चिकित्सा शास्त्रोक्त पद्घतीने न शिकलेल्या निसर्गोपचारकांची तो उपेक्षा करणार. अशा प्रकारे आयुर्वेद विरूद्घ निसर्गोपचार या वादांमुळे दोन्ही पद्घतीचे नुकसान होत आहे.
तसे पाहिले तर आपल्याकडे डॉक्टरी पेशातील प्रत्येक शाखेतीलच ही वृत्ती बळावली आहे की माझे ज्ञान श्रेष्ठ व तुझे चांगले असले तरी मी ते शिकणार नाही व माझ्या रोग्यांसाठी तर वापरणारच नाहीच नाही, या वृत्तीमुळे आपल्याकडील खरे तर कोणताच डॉक्टर होत नाही, तो चांगले रिसर्च देखील करू शकत नाही. केंद्र शासनाने प्रत्येक शाखेत एक एक रिसर्च इन्स्टिट्यूट निर्माण केली आहे. ऍलोपथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार, युनानी व योग अशा सहा शाखांमधल्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत. मात्र जयपूर फूटसारखा एका प्रायव्हेट डॉक्टरने केलेला अनोखा आविष्कार वगळता आपल्या देशात एकही मोठा यशदायक आविष्कार घडलेला नाही. याचं अर्ध कारण आपल्यां निरक्षर, अज्ञानी समाजात आहे, कारण ही मंडळी स्वत:च्या आरोग्याबाबत विचार करू शकत नाहीत व पूर्णपणे परावलंबी असतात. त्यांच्यात शिकून घेणे ही प्रवृत्ती वाढवली तर त्यांना निसर्गोपचार व इतर आरोग्य पद्घती तारतम्याने कळूंन येतील.
--- XXX ---
kept mangal files on nity_leela

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें