पाणी पिण्याच्या विविध पद्घती
मंगळवार दि. 15 एप्रिल, 1997 गावकरी लेखांक 11.
   पाणी पिणे ही तशी साधी गोष्ट.  पण आपण त्याच्याबद्दल जाणीव ठेवली तर यामधूनही आपल्याला एक तंत्र किंवा पद्घत निर्माण करता येते.
   ताप येणे ही सध्या कोणत्याही मोठ्या शहरात सातत्याने होणारी गोष्ट होऊन बसली आहे. एक साथसदृश्य परिस्थिती आहे त्याचे निदान ‘व्हायरल फिवर’ असे केले जाते. खूप लोकांना एकदम ताप येतो. पहिल्याच दिवसापासून ऍन्टिबायोटिक द्यायला डॉक्टर सुद्घा तयार नसतात.
   अशा वेळी घोटा-घोटाने तीन-चार पेले पाणी पीत राहिल्याने निश्चित फायदा होतो.  शिवाय ज्यांना बाराक्षार औषधांची माहिती आहे त्यांनी हेही करून पहावे.
   फेरम फॉस (ताप कमी होण्यासाठी ), नेट्रम सल्फ (छातीतील कफ बाहेर काढण्यासाठी), नेट्रम मूर (अंगदुखी कमी करण्यासाठी), काली मूर (टोनिंगसाठी) व काली फॉस (शांत झोप किंवा मन शांत होण्यासाठी) या सर्वांच्या 6x पोटेन्सीच्या दहा दहा गोळ्या पेलाभर कढत पाण्यात टाकून ते मिश्रण थंड करून घोट-घोट प्यायचे.  (वरील गोळ्यांचे प्रमाण कमी-जास्त करता यावे म्हणून अशा तापाच्या संदर्भातले त्याचे नेमके कार्य वर सांगितले आहे.  एरवी इतर खूप रोगात त्यांचा वापर करतातच.) याशिवाय पारिजातकाची दोन पाने, तुळशीची दहा पाने, थोडे ओले खोबरे आणि खडीसाखर असा विडा लावून दर तीन / चार तासांनी एकदा खाणे हाही माझा ठेवणीतला उपाय आहे.  ज्यांना पानं शोधणं कटकट वाटते ते म्हणतील सरळ पारिजातवटी का नाही घेत ?  पण मी तसे करत नाही एवढे खरे !
तुळशीच्या पानांचा अनुभव...
   आता पुन: पाण्याकडे वळू या.  आयुर्वेदात सूक्ष्म वनस्पतीशास्त्र असा एक प्रकार आहे.  त्याबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील एक वैद्य श्री. परांजपे यांनी बराच अभ्यास केला.  (त्यांचे एक पुस्तकही आहे ‘संजीवनी चिकित्सा’) हे शास्त्र असे सांगते की शरीराला बरे करण्यासाठी वनस्पतींची फार मोठी मात्रा आवश्यक नसून अत्यंत सूक्ष्म अवस्थेत व फार थोडी मात्रा देऊन चालते. याची प्रचिती घेण्यासाठी मी एक प्रयोग केला की औषध म्हणून तुळशींची पाने खावी, असे ज्याप्रसंगी वाटत होते त्यावेळी तुळशीची पाने दोन तास पेलाभर पाण्यात बुडवून मग ते पाणी प्यायचे.  याने पण अपेक्षित फायदा झाला.  पण हे तंत्र वारंवार वापरून, त्याच्या नोंदी ठेवून, चर्चा करून मगच त्याचा शास्त्र म्हणून उपयोग करता येईल.  असाच एक प्रयोग दूर्वांबाबत केला.  दूर्वेचे पोषण-मूल्य खूप असते.  अन्न मिळत नाही अशावेळी काही आदिवासी दूर्वेची मुळं खातात, असे ऐकल्यावरून आपणही अन्न न खाता दूर्वा खायच्या असे ठरवले.  पण त्या अतिशय चरबरीत लागतात व जीभ सोलली जाऊ शकते.  म्हणून थोडेसे ठेचून मऊ केलेली दुर्वांची एक जुडी वापरली.  ती दोन तास पाण्यात ठेवायची व नंतर दुस-या पेल्यात टाकून ते पाणी तयार करायला घ्यायचे, व तोपर्यंत पहिले पाणी प्यायचे.  यामुळे खरोखर दोन दिवस भूक लागली नाही.  पण हेही कुणी मोठ्या प्रमाणावर करून पाहिले तर त्याला ‘सिद्घता’ येणार.
 
   आपल्या रोजच्या दिनक्रमात सकाळी उठून चूळ न भरताच पाणी प्यावे, ही आयुर्वेदात उष:पान पद्घत सांगितली आहे.  त्याचा खूप फायदा होतो.  पण किती पाणी प्यावे याबाबत एकमत नाही.  भरपूर जुनी कोष्ठबद्घता असताना रोज तीन पेले पाणी पिण्याने पंधरा दिवसात ती बरी झाली, असा अनुभव मी नुकताच ऐकला. पण आता बरे झाल्यावर त्यांनी पाण्याची मात्रा कमी करून एक पेल्यावर आणावी काय?  कारण विनाकारण जास्त पाणी पिण्याने शरीराला त्याच्याही ‘पचनाची’ जबाबदारी पूर्ण करावीच लागते.  याहीबाबत चर्चा गरजेची आहे.
माठातलं... तांब्याच्या घागरीतलं... पाणी
  मी स्वत: रोज सकाळी पेलाभर पाणी पिते.  त्याने तरतरी येते असा अनुभव आहे.  विशेषत: रात्री बाराच्या पुढे जागरण झाले असेल तर दुपारपर्यंत फक्त साधे पाणी प्यावे व गरम चहा, कॉफी किंवा कोंबट पाणी अगर दूध कटाक्षाने टाळावे, यामुळे मेंदूची विश्रांतीची गरज लवकर भागते.  याशिवाय थंड पाण्याने आंघोळ किंवा निदान डोक्यावर तरी फक्त थंडच पाणी घेतल्याने सुद्घा जागरणाचा शीण पटकन जातो.  महाराष्ट्रात मुलींनी आठवड्यातून एकदाच डोके धुवायची पद्घत आहे.  त्याऐवजी डोके रोज धुवावे.  रोज शाम्पू, साबण, शिकेकाई लावू नये पण पाणी मात्र डोक्यावरून रोज घ्यावे, असा माझा अनुभव सांगतो.
   खूप लोक, विनाकारण अतिथंड पाणी पितात. पण त्याने लहान भागत नाही व त्यातून मिळणारी तृप्ती पण मिळत नाही.  उन्हाळ्यात मातीच्या माठातले पाणी चांगले. बरेच वेळी पिण्याचे पाणी शुद्घीकरणासाठी त्यांत ब्लिचिंग पावडर टाकलेली असते.  तो क्लोरिनचा वास लवकरात लवकर निघून जाण्यासाठी माठासारखा चांगला उपाय नाही.  तांब्याचा स्वत:च निर्जंतुकीकरणाचा गुण आहे.  शिवाय पाण्यातले ज्यादा व वास मारणारे क्लोरिन, सूक्ष्म गाळ इत्यादींना खाली बसवण्याचा गुण पण आहे.  त्यामुळे पाणी गाळा, उकळा असे उपाय रोजच्या रोज न करता फक्त शहरात मोठी साथ असेल व पाणी फार गढूळ येईल तेव्हाच आम्ही करतो.  नुकतेच पुणे विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींनी तपासणी करून शरीराची रोगप्रतिकारकता टिकवण्यासाठी मिनरल वॉटर, फिल्टर, उकळणे इत्यादी उपाय कुचकामी असल्याचा निष्कर्ष काढला आहे.  हा प्रयोग व निष्कर्ष लंडनच्या लॅन्सेट या आरोग्यावरील अधिकारी मासिकाने प्रसिद्घ केला असून तो मुळातून वाचण्यासारखा आहे.
   तांबे, पंचधातू, चांदी-सोन्याच्या भांड्यात रात्रभर पाणी ठेवून सकाळी उठताच ते पाणी प्यावे, असे आयुर्वेदात म्हटले आहे.  सोन्याचा उपयोग हृदयविकार, सांधिवात व नर्व्हस सिस्टमसाठी तर चांदीचा उपयोग डोळ्यांसाठी फार चांगला असे म्हणतात.  पैकी चांदीच्या भांड्यातील पाण्याची प्रचितो आम्ही कित्येकदा घेतली आहे.
  उन्हाळ्यात आपण माठातले किंवा फ्रिजचे थंड पाणी पितोच.  त्यात खायच्या कापराची वडी, वाळा किंवा दुर्वांची जुडी किंवा मोग-याचे एक फूल किंवा तुळस असे काही टाकून त्याची देखील चव वाढते व उन्हाळा बाधत नाही.
  निसर्गोपचाराचा भारतात ज्यांनी मोठा प्रचार केला त्या लक्ष्मणशास्त्री शर्मांचे प्राकृतिक चिकित्सेवर अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. पुण्यांतील राष्ट्रीय प्रकृतिक चिकित्सा संस्थानच्या संग्रहांत हे पुस्तक आहे. त्यांत घोट घोट पाणी पिण्याची पद्घत सांगितली आहे.  एक पेला पाणी पिण्याला अर्धा तास लावायचा.  एका वेळी फक्त अर्धा चमचा किंवा आचमनाच्या पळीएवढेच पाणी प्यायचे. असे दिवसात तीन वेळा करायचे.  ज्या कारणांसाठी आपण शंकराच्या मस्तकावर थेंब थेंब पाण्याची संततधार धरतो,  एकदम घागर उपडी करत नाही व संततधारेमुळे जसा हलाहलाचा दाह कमी होतो, तसा पोटातील दाह कमी होण्यासाठी हा उपाय असल्याने, आम्लपित व अल्सरचा त्रास असलेल्यांना याचा विशेष फायदा होतो.
  आणि थोडेसे पाणी न पिण्याबद्दल !  खूपदा आपल्याला तहान लागते पण जवळ पाणी नसते. विशेषत: मराठववाड्यामध्ये दौरे करताना, रेल्वे प्रवासात, राजस्थानातील ट्रिप्समध्ये व हिमालयातील ट्रेकिंगमध्ये मला हा अनुभव आला.  ट्रॅव्हल लाईटच्या नादामुळे पिण्याचे पाणी हे मी अनावश्यक सामान मानते व जवळ बाळगत नाही.  मिळेल त्या गावातले पाणी पिते. पण तेही मिळालेच नाही तर ?  यासाठी शीतली प्राणायम हा एक उत्तम उपाय आहे.  ओठांचा चंबू करून जिभेचे टोक वरच्या ओठाला लावायचे व हळूहळू हवा आत ओढत तोंडाने श्र्वास घ्यायचा.  नंतर लगेच ओठ मिटून नाकाने श्र्वास बाहेर सोडायचा.  असे दहापंधरा वेळा करायचे.  म्हणजे तहान भागते.  ही ट्रिक मी खूपदा वापरली.  असे म्हणतात की पक्ष्यांना उन्हाळ्यात दुपारी पाणी मिळत नाही; तेव्हा ते देखील हाच उपाय करतात.
--- XXX ---
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें