सोमवार, 28 जुलाई 2008

09- शरीरातल्या ‘कच-याची’ विल्हेवाट लावण्यासाठी...-- For disposing the waste and toxins

शरीरातल्या ‘कच-याची’ विल्हेवाट लावण्यासाठी...
मंगळवार दि. 1 एप्रिल, 1997 गावकरी लेखांक 9.

शरीरातील कचरा जेव्हा मलमूत्र, घाम व उच्छवास यावाटे कार्यक्षमतेने निघून जात नाही तेव्हा काय होते ? शरीर स्वत:च जाणीवपूर्वक काही वेगळे उपाय शोधू लागते. यामुळे अनुक्रमे जुलाब व उलटी, ताप येणे, त्वचेचे रोग, श्र्वासाचे रोग इत्यादी होऊ लागतात. अशा प्रक्रिययेला थांबवण्याचा किंवा दमन करायचा प्रयत्न करण्याऐवजी वेगळे पर्याय आहेत. होमियापॅथीचा पर्याय असा की शरीराने देहशुद्घीचा निवडलेला नवा मार्ग बरोबर असून त्याच मार्गाने पूर्ण निचरा होऊन जाऊ द्या. यासाठी जे औषध देण्यात येते त्याने सुरूवातीला मूळ रोगाची लक्षणे वाढू लागतात व मगच थांबतात असे आपण बघतो.

निसर्गोपचारात देखील लक्षण - विरोधी औषध दिले जात नाही पण नैसर्गिक प्रक्रिया मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो. आयुर्वेदातील शमन चिकित्सेत लक्षणांविरूद्घ अतिशय सौम्य व बहुधा आपल्या मसाल्यांतील गोष्टी किंवा घराभोवतालच्या क्षुल्लक वनस्पतींचा वापर केला जातो. बाराक्षार चिकित्सा पद्घतीत लक्षणावरून शरीराची क्षारांची गरज ओळखून तेवढेच क्षार सूक्ष्मप्रमाणात दिले जाते. याउलट ऍलोपथी किंवा आयुर्वेदातील दमन चिकित्सेमध्ये लक्षणांवर तात्काळ दाबून टाकणारे औषध आधी दिले जाते. याचा अर्थ शरीराला जो कचरा बाहेर काढायचा होता तो निघण्याचा मार्ग आपण तात्पुरता थांबवला. ही झाली इमर्जन्सी मॅनेजमेंट. खरे तर ती तशी करण्याची गरज आहे काय हेही जाणीवपूर्वक ठरवायला हवे. यासाठी रोगी व डॉक्टर यांच्यामध्ये सुसंवादही हवा. पण यामुळे रोग बरा झाला असे समजून आपण शरीरात दाबून टाकलेला कचरा निघून जाण्यासाठी पुढे काहीच केले नाही व शरीरालाही ते नैसर्गिक प्रक्रियेतून जमले नाही, तर हे दाबून ठेवलेले रोग पुढे इतर उग्र रोगात बदलतात. यासाठी तसेच दमन चिकित्सेतील उग्र औषधांचं इतर दुष्पपरिणाम कमी करण्यासाठी आयुर्वेदात पथ्य योजना करावी लागते म्हणून पुन्हा ती चिकित्सा किचकट व सामान्यांच्या आवाक्याबाहेरची ठरते.

...2/-

- 2 -
शरीरात साठलेल्या कच-यातून टॉक्सिसिटी किंवा सूक्ष्म कच-यांची निर्मिती होऊन दीर्घकालीन आजार, उदाहरणार्थ संधिवात, स्पाण्डिलायसिस दमा, डायबेटिस इत्यादी होतात असा निसर्गोपचाराचा सिध्दांत आहे. तर मग हा साठलेला सूक्ष्म कचरा केमिकल ऍनॅलिसिस करून दाखवा किंवा जसा टप्प्याटप्प्याने हा साठत गेला त्याच्या मधल्या स्टेजचे केमिकल ऍनॅलिसिस करून दाखवा, असा प्रश्न विचारला तर असले काही प्रयोग कुणी निसर्गोपचारक करून दाखवू शकणार नाहीख् मात्र कचरा काढायचे उपाय करत राहिल्याने हे रोग बरे होतात असा निष्कर्ष कित्येक ब-या केलेल्या रोग्यांच्या आधारे निघू शकतो. त्यामुळे मी वर केलेल्या एकूण सैद्घान्तिक विवेचनाच्या जोडीला रोग्याबाबतची केस हिस्टरी ठेवून व शास्त्रशुद्घ रीतीने प्रयोग करून काय निष्कर्ष निघतात ते तपासण्याची गरज आहे. असे शास्त्रशुद्घ प्रयोग करणे त्यांची हिस्टरी ठेवणे, त्यांच्या निष्कर्षाची चर्चा व देवाण घेवाण करणे, थोडक्यात ज्याला रिसर्च मेथोडॉलॉजीचे शास्त्र म्हणतात ते शास्त्र शिकून घेणे हेही आयुर्वेद किंवा निसर्गोपचाराच्या दृष्टीने गरजेचे आहे. तसेच देहशुद्घीचे निसर्गोपचारात प्रत्यक्ष केले जाणारे उपाय आयुर्वेदाचे चिकित्सक कधीच वापरून बघत नाहीत. फक्त त्यांच्या ग्रंथात या उपायांची माहिती किती चांगली, किती सुसूत्र व किती प्रदीर्घ मांडली आहे ते उतारे वाचून दाखवतात. त्यामुळे आयुर्वेद व निसर्गोपचार यात माझ्या मते फरक असा की निसर्गोपचार - स्वस्थवृत्त व शमन चिकित्सेपैकी थोडक्यात उपायांचे पुस्तकही ज्ञान पण प्रत्यक्ष वापर शंभर टक्के.

आयुर्वेद - स्वस्थवृत्त व शमन चिकित्सेचे भरपूर पुस्तकी ज्ञान पण प्रत्यक्ष वापर आणि अनुभव सिध्दी शून्य, त्याऐवजी दमन चिकित्सेवर भर ! मात्र आयुर्वेदातील फक्त शमन चिकित्सेचा शास्त्रोक्त वापर अतिशय कौशल्याने करणारे सुमारे हजार खाटांचे पुदुकोट्टई (केरळ) येथील पंचकर्म चिहकित्सालय मात्र मेडिकलच्या सर्वच शास्त्रांच्या जिज्ञासूंनी पहाण्यासारखे आहे, अशी माझी खास शिफारस आहे.

--- XXX ---

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें