गुरुवार, 23 अप्रैल 2009

भाग-? कांही अनुभव व ठोकताळे (लेखांक 5 perhaps)

भाग-? कांही अनुभव व ठोकताळे
बरेचदा आजारपण असतांना एखाद्या पुस्तकी उपायाऐवजी मी वेळोवेळी अनुभव घेतलेले कांही सोपे सोपे उपाय करते. हे उपाय करून बघतांना मी एक तंत्र वापरते ते असे - आपल्याला नेमकं कांय होतय हे आधी चांगल्या डॉक्टर कडून समजून घ्यायचे. त्यात पुढील दोन दिवसात काय काय कॉम्प्लीकेशन होणार आहेत. दोन दिवसात रोग कमी झाला नाही तर काय करायचे हे सर्व डॉक्टर बरोबर आधी बोलून ठेवायचे. मग सुरूवातीचा थोडासा त्रास सोसायची मनाची तयारी ठेवायची आणि हे असले सोपे-सोपे उपाय करून बघायचे.
यातून अनुभव जसा जसा वाढत जातो तशी तुमची औषधांची गरज कमी होऊन तुम्ही आपल्या रोगाला हँडल करू शकता. अस छोट्या छोट्या अनुभवातून निसर्गोपचाराचे ज्ञान समृध्द करता येतं. मिळालेल्या थोड्या थोड्या ज्ञानाचा वापर करता येतो. एम्‌.बी.बी.एस्‌ सारखं चार साडेचार - पाच वर्ष थांबून रहावा लागत नाही. मात्र डिग्रीपण मिळत नाही. पण स्वत:ला बरं करण्यासाठी डिग्री कशाला लागते ? हे आपलं माझं माझ्यापुरतं तत्वज्ञान.
एकदा मला खूप खोकला होऊन घसा खूप दुखू लागला. थंडीचे दिवस - मी दिल्लीत रेस्ट हाऊस मधे - आणि जवळ औषध काही नाही. मग गरम पाण्यात टॉवेल बुडवून गळ्याभोवती लपेटला आणि त्यावर दोन कोरडे टॉवेल लपटले. दहा पंधरा मिनिटात आराम पडला. हेच तीन चार तासांनी करत राहिल्यावर दुस-या रात्री पर्यंत खोकलाच थांबला होता.
सर्दी पडस्‌ किंवा ताप आल्यावर तर हटकून मी एक करते. दर पांच दहा मिनिटांनी घोट घोट पाणी पीत रहाणे. एरवी औषध न घेतले तर सात दिवसांत आणि औषध घेतल तर एकाच आठवड्यांत बरी होणारी सर्दी माझी दोन दिवसांत बरी होते. शिवाय वारंवार सर्दी होण्याची फ्रिक्वेन्सी कमी होते ते वेगळेच. किरकोळ तापात देखील मला याच्या पलीकडे जास्त औषध घ्यावं लागत नाही की रजा काढावी लागत नाही.
आपल्या खाण्यांत कांही उलट सुलट झालं किंवा कधी परक्या गांवी जाऊन पाणी बदलल की आपल्याला डिसेंट्री होते. अशावेळी मी भरपूर पाणी पिते. फारच त्रास असेल तर भरपूर बडीशोप पण खाते. हे मी पंधरा वीस वर्षे अनुभवले. आता तर डिसेंट्रीत मीठ-साखर-पाणी घ्या, पाण्याचा इनटेक वाढवा, अस नेहमीच सांगितलेलं आपण ऐकतो.
--- XXX ---
दै. गांवकरी नाशिक,
मंगळवार दि. ???

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें