शुक्रवार, 27 मार्च 2009

भाग-1 - निसर्गोपचाराचे मर्म

अनुभवातला निसर्गोपचार
भाग-1 - निसर्गोपचाराचे मर्म
मंगळवार दि. 28 जानेवारी, 1997
दै. गांवकरी, नाशिक - लेखांक 2.
kept on son_denare_pakshi
निसर्गोपचार हा एकविसाव्या शतकातील काळाची गरज ठरणार आहे, आणि पर्यावरणाच्या प्रश्नाशी हा निगडीत राहणार आहे.
अगदी ढोबळ मानाने निसर्गोपचार म्हणजे काय याचे उत्तर असे की एखाद्या रोगावर औषध न घेता निसर्गात उपलब्ध असलेले पाणी, माती, सूर्यप्रकाश हे घटक वापरून व आहारात योग्य प्रकारे बदल करून केलेली चिकित्सा. पण निसर्गोपचाराचे खरे मर्म असे आहे की आधी रोग्याच्या विचारसरणीत योग्य तो बदल होणे गरजेचे असते.
याबाबत माझे दोन अनुभव सांगण्या सारखे आहेत. एका सुट्टीत माझ्या बहिणीची मुलगी वय 12 व भावाची मुलगी वय 5 आमच्याकडे रहायला आल्या. मोठ्या भाचीला कांहीतरी ऍलर्जी होती. मधूनच पित्ताच्या गाठी यायच्या. त्यावेळी डॉक्टर असलेली तिची आई कसलेसे इंजेक्शन देत असे. पण ही सोय माझ्या घरी कुठून असणार ? एक दिवस तिला पित्ताच्या गाठी आल्याच. हातावर, पाठीवर आणि तोंडावर. तिने रडून आत्ताच्या आत्ता ते इंजेक्शन शोधून मला दे असा धोशा लावला. तेंव्हा तिला समजावलं आणि सध्या तात्पुरता माझा उपाय कर, तो पर्यंन्त मी कोणीतरी डॉक्टर बघते - पण त्याला अर्धा तास लागेल अस सांगितलं. तिला झोपवल आणि माझा उपाय म्हणजे खूपसे रूमाल पाण्यात ओले करून तिच्या गाठींवर ठेवून दर पाच मिनिटाला रूमाल बदलून पुन: पाण्यांत पिळून घ्यायला सांगितला. इकडे तिच्या नेहमीच्या इंजेक्शनची माहिती पण घेतली. मात्र पंधरा मिनिटात तिचा त्रास खूपच कमी झाला होता. मग इंजेक्शन द्यावेच लागले नाही. यानंतर एकदा छोट्या भाचीला पण तशाच गाठी उठल्या तेंव्हा मी तिला चक्क ओल्या चादरीत गुडाळून वर ब्लँकेट पांघरूण घालून झोपायला सांगितले. आधीचा प्रयोग पाहिलेला असल्याने ती तयार झाली आणि बरी पण झाली. पुढे माझ्या मोठ्या भाचीला तिच्या घरी दोन वेळा हाच त्रास झाला तेंव्हा तिने इंजेक्शन न घेता थंड पाण्याचा हाच उपाय केला आणि आता गेल्या चार वर्षात तिला हा त्रास झालेला नाही.

या प्रयोगात दोन तीन महत्वाचे मुद्दे होते. झालेल्या गाठी पित्ताच्याच असून एखाद्या मोठ्या गंभीर आजाराच्या नाहीत हे मला ओळखता येत होते - त्यावरचा पाण्याचा हा प्रयोग आधी अनुभवलेला नव्हता पण माहीत होता. मात्र थंड पाण्याने इतर बरेचदा गुणकारी प्रत्यय दिले होते, ते अनुभवातले होते. त्या मुलींना माझ्याबद्दल बराच विश्वास होता. धाकट्या भाचीच्या तर डोळ्यांसमोरच उदाहरण घडल्यामुळें प्रयोग करून बघायला ती पटकन तयार झाली होती. आता माझ्या बहिणीने देखील निसर्गोपचाराची बैठक समजावून घेतलेली आहे. आणि मुळात डॉक्टरच असल्याने ती या ज्ञानाचा माझ्यापेक्षाही खूप चांगला वापर तिच्या व्यवसायात करून घेऊ शकते.
दुसरे उदाहरण मी राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान पुणे या निसर्गोपचार संस्थेत डायरेक्टर असतानाचे आहे. आम्ही पुण्यातील सुमारे 25 ते 30 मधुमेहाचे रोगी घेऊन त्यांच्यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला. दर बुधवारी 2 तास असा 12 आठवड्याचा एक कोर्स ठेवला. यामधे मुख्य कार्यक्रम असायचा रोग्यांची आपापसात चर्चा व अनुभवांची देवाण - घेवाण. शिवाय कांही तज्ञ मंडळींची लेक्चर्स असायची. काय करा, काय टाळा ही चर्चा असायची आणि प्रत्येकाने आपण घेत असलेला इन्सुलिनचा डोस अगदी हळू हळू गतीने पण निश्चितपणे कसा कमी करता येईल हे उद्दिष्ट होते. डोस कधी कसा किती कमी करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे होते. कांही इमर्जन्सी आलीच तर रात्री बेरात्री पण जे धावून येऊन मदत करतील अशा चार डॉक्टरांची यादी तयार ठेवली होती. त्यापैकी फक्त एकाला एका रात्री फोन करून सल्ला विचारावा लागला यापेक्षा वाईट कांही झाल नाही, यावरून सर्व रोगी किती सावकाशीने व संयमाने प्रयोग करीत होते ते कळते. पहिल्या तीन आठवड्यात झपाट्याने बदल व सुधारणा दिसू लागल्या होत्या व तीन महिन्यानंतर हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाल्याचे त्या रोग्यांनी सांगितले. या काळात आम्ही डायेबेटिस या रोगाचा सर्व बाजूंनी उहापोह केला - मेडिसिन कांय कांय, कॉम्लीकेशन मुळे काय सर्जिकल प्राब्लेम्स येतात, आयुर्वेदातील पथ्यापथ्य, योगासनांची प्रॅक्टीस करून घेणे, चालण्याचा व्यायाम, त्यांत लवकर उठून व मौन ठेऊन चालण्याची गरज, उपवास कसा करावा व करतांना त्यांत कांय टाळावे, फलाहार, शाकभाज्यांचा आहार, थंड पाण्याचे व मातीचे विविध उपचार, मनोवृत्ती, विपश्यना, अँक्युप्रेशर, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करण्याची गरज, त्या मागील विचारसरणी इ. खूप मुद्यांची चर्चा झाली. आहारात देखील मधुमेह कण्ट्रोल करणारे खूप घटक असतात उदा. - मेथी, साळीच्या लाह्या, ताक इत्यादि - त्याच बरोबर घरबसल्या ब्लड किंवा युरिन शुगर टेस्टिंगची बाजारात आलेली नवी उपकरण, त्यांच्या किंमती हे पण चर्चेचे विषय होते. या कार्यक्रमात सहभागी होणा-या व लाभ झालेल्या मंडळींची एक प्रतिक्रिया खूप महत्त्वाची होती - आता आम्हाला कळलं की आमचा मधुमेह आणि ब्लड प्रेशर दोन्ही काबूत कस ठेवायच - एखादे वेळी आम्ही वागण्यात, खाण्यापिण्यात अतिरेक केला, तर तुम्ही सांगितलेली माहिती वापरून नेमकं काय करून आम्ही रोग पुन: काबूत आणू शकतो हे कळलं.
या रोग्यांना मी एक प्रश्न हमखास विचारीत असे - गोळ्या खाऊनही तुमचा रोग काबूत रहातो व हे सगळे आहार विहारांतील संयम पाळूनही तुम्ही तो काबूत ठेऊ शकता. मग पहिला मार्गचं जास्त सोपा, सुटसुटीत नाही कां? प्रत्येकाने नाही असचं उत्तर दिल. त्याची कारणं अशी -

1. गोळ्या खाल्ल्या तरी थकवा, निरूत्साह, सुस्ती, निगेटिव्ह ऍटिट्यूड टू लाइफ जात नाही.
2. आहार - विहार व विचारातील फरक व संयमामुळे रोग काबूत ठेवतांना आपण या रोगापेक्षा श्रेष्ठ आहोत, जेते आहोत ही आत्मविश्वासाची भावना वाढते.
3. किती संयम व किती औषध यांचा balance कसा बसवायचा ते गणित आम्ही स्वत:च्या अनुभवातून स्वत:चे स्वत:साठी बसवून घेतले आहे - हे गणित प्रत्येकाचे वेगळे असणार प्रत्येकाने ते स्वत:साठी सिध्द करून घ्यावे लागते. इतर रोग्यांपेक्षा आमचा फायदा असा की आमचा तो अनुभव सिध्द झालेला आहे. त्याचा आम्हाला इतर वेळी फायदा होऊ शकतो.
4. निसर्गोपचारातील जे उपाय आम्ही मधुमेह कमी करण्यासाठी वापरले त्याने इतर ब-याच किरकोळ तक्रारी संपल्या वगैरे, वगैरे.
तर सांगायचा मुख्य मुद्दा हा की निसर्गोपचारांचा विचार करतांना पहिली आपली विचारसरणीय बदलावी लागेल. डोळे उघडे ठेवा, मन उघडे ठेवा, नवा विचार समजावून घ्या, प्रयोगाला घाबरू नका. सुरूवातीला थोडा धोका पत्कारून कां होईना पण प्रयोग करून बघा - करा, केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे ! निसर्गोपचार समजून घेण्यासाठी पहिली अट म्हणजे करून बघण्याची तयारी ! हेच निसर्गोपचाराचे मर्म.

--- XXX ---
दै. गांवकरी, नाशिक, दि.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें