रविवार, 17 अगस्त 2008

*** आरोग्यासाठी पाचच मिनिटे आपण काढतो का ?

आरोग्यासाठी पाचच मिनिटे आपण काढतो का ?
-- निसर्गशोभा, दिवाळी अंक, पुणे, 1992
(हा लेख निसर्गशोभा मधील विस्तृत प्रमाणे नसून सारांशित केलेला आहे -- लेखाच्या शेवटी मूळ विस्तृत लेखाची चित्र-प्रत जोडली आहे.

कळते पण कळत नाही ही उक्ती ब-याच जणांना लागू होते. त्याचे एक उदाहरण म्हणजे आरोग्याबाबत आपण दाखवतो तो आळशीपणा. रोज आसने करावीत, व्यायाम करावा, फिरायला जावे वगैरे आपण वाचतो, मनाशी ठरवतो पण त्याप्रमाणे वागत मात्र नाही. माझा स्वत:चा याबाबतचा अनुभव अतिशय वाईट आहे. नियमित अर्धा तास व्यायाम करायला मला जमत नाही. मग माझ्यासारख्या माणसांना ‘गती’ काय?
यावर मी स्वत:साठी जे काही उपाय करते ते इतर कित्येकांना उपयोगी पडतील असे वाटते. यात मी असे गृहित धरले आहे की, मला दिवसाकाठी फक्त पाचच मिनिटे मिळणार व तीही तुटकपणे सलग नाही, पण आशा सोडायची नाही, म्हणून एक मिनिट मिळाला तर काय आणि दहा - पंधरा मिनिटे मिळाली तर काय हे दोन्ही कार्यक्रम मनाशी आाखून ठेवले आहेत.
घराच्या दर्शनी भिंतीवर एक वर्षभराचे कॅलेंडर मी चिकटवून ठेवते, अशी इयर प्लॅनर्स बाजारात मिळतात. नाही तर आपले साधे मासिक कॅलेंडर असतेच. पाच मिनिटे - व्यायाम केला तर त्या दिवसावर खुण करायची. अशा त-हेने किमान एक चतुर्थांश तरी कॅलेंडर रंगलं तर ते वर्ष ‘यशस्वी’ म्हणायचं. (मात्र अयशस्वी वर्षाबद्दल निराशा बाळगायची नाही हा पहिला नियम) कॅलेंडरवरील खुणांमुळे फक्त एक ‘संख्याशास्त्र’ म्हणून बघायचे ! त्यामुळे आपण चांगले की वाईट अशी नीतीमूल्य त्याला चिकटवायची नाहीत !
सर्व आसनापैकी ताडासन हे मला खूप उपयुक्त वाटते. आहोत त्याच जागेवर उभ्यानेच हे आसन करायचे असते. यामध्ये हातपाय व संपूर्ण शरीर ताणले जाऊन सर्व अवयवांचा शीण जातो. याचा सर्वात जास्त फायदा पाठीच्या मणक्यांना होतो व आपल्या मेरूदंडामध्ये नाड्यांची वेगवेगळी जाळी व केंद्र असल्याने त्या सर्वांना फायदा होतो. लहान वयात उंची वाढवण्यासाठी व उतार वयात पाठीत व गुडघ्यात येणारा बाक न यावा म्हणून हे आसन खूप उपयोगी आहे.

आसन करताना वेळ मोजण्याआधी मी घड्याळ वापरत नाही. त्याऐवजी स्वत:च्या श्र्वासोच्छवास मोजायचा. आपले दहा श्र्वास अशी सुरूवात करून ते पन्नास ते शंभरपर्यंत वाढवत न्यायचे. याचे पण खूप फायदे आहेत. आपल्या शरीराचे सर्व व्यवहार त्यांच्या लयीने पार पडत असतात. हृदयाची लय वेगळी, पोटाची लय वेगळी, मेंदूची लय वेगळी. आपल्या सभोवतालच्या वातावरणाची लयसुद्घा वेगळी असते. या सर्वांना एकत्र आणणारा दुवा म्हणजे आपल्या श्र्वासांची लय. आसने करताना झलकही यातून मिळते. साधारणपणे आपण मिनिटाला पंधरा वेळा श्र्वास घेतो. यावरून वेळेचा अंदाज येतोच.
जागच्या जागी कदमताल किंवा स्टॅटिक जॉगिंग किंवा दोरीवरच्या उड्या हा मी निवडलेला दुसरा प्रकार. पोट गच्च भरलेले असल्याची वेळ सोडून इतर वेळा कधीही शंभर उड्या मारायला दोन मिनिटे पुरतात. शिवाय कोणतीही पूर्व तयारी, साधने इत्यादी जुळवावी लागत नाहीत. फक्त मनाची तयारी असली की पुरे. ऍरोवॉटिक्सचे कोणीही शिक्षक म्हणतील की अशा जॉगिंगचा काही उपयोग नाही. त्याने शरीरातील कॅलरीज बर्न व्हायला सुरूवातसुद्घा होत नाही. मात्र आपणं जसं एखादं वाहन वापरायचं नसेल तेव्हा त्याला पाच मिनिटे रनिंग देऊन आणतो. जेणे करून बॅटरी, टायर्स, इंजिन हे वॉर्मअप होऊन सुस्थितीत राहतात. त्यासाठी माझं जॉगिंगचं तंत्र मला उपयोगी पडतं.
डोळ्यांसाठी मी तीन प्रकारच्या व्यायामाची निवड केली आहे. सुर्योदय किंवा सूर्यास्त समयी सूर्याचे बिंब लालसर असताना तो प्रकाश डोळ्यांवर घेणे. तसेच डोळ्यांची बाहुली संथ गोलाकार गतीने एकदा उजवीकडून डावीकडे तर एकदा डावीकडून उजवीकडे फिरवणे असे सर्व व्यायाम जमेल तसे करता येतात. डोळ्यांचा तिसरा व्यायाम म्हणजे पामिंग. तळहात डोळ्यांवर अशा त-हेने ठेवायचे की त्यातील मध्यभागाचा स्पर्श पापण्यांना व्हावा. हातावरील इतर सर्व उंचवट्यांचा दबाव डोळ्यांच्या अवतीभवती पडत असतो. उदाहरणार्थ गालफडांवर खालचे उंचवटे किंवा भुवयांवर वरील उंचवटे ! तळहातांच्या दोन्ही कडा देखील घट्ट ठेवायच्या जेणे करून बाहेरचा उजेड ज्यात येऊ नये. पापण्यांवर मात्र दाब पडू द्यायचा नाही. त्यांना फक्त तळहाताची ऊब द्यायची. आपली पापणी उघडता येणार नाही पण उभी आडवी फिरवता येईल अशी ही अवस्था असते. याही व्यायामासाठी 1-2 मिनिटे पुरतात. वेळ मोजायला पुन्हा श्र्वासाचे घड्याळ आहेच.

याशिवाय डोळ्यांच्या स्वास्थासाठी चांदीच्या भांड्यातील पाण्याने डोळे धुणे आणि योग्य प्रकारे आहार नियमन हे उपाय करणे चांगले ठरते.
ऑफिसात ज्यांना फक्त बैठं काम करावं लागतं त्यांना स्पॉण्डिलायटिसचा त्रास सुरू होतो. लांबचे दौरे करतांना गर्दीतून दुचाकी वाहन चालवताना खांदा, पाठ, मान आणि कंबर अशा ठिकाणी अनुक्रमे सुया टोचल्यासारखा त्रास होऊ लागतो. कार्यालयात एअर कंडिशनर असेल किंवा फार जोराने चालणारे पंखे असतील तरीही हा त्रास होतो. अशा वेळी किंवा हे होऊ नये म्हणून मानेचा एक चांगला व्यायाम आहे. हनुवटीला मानेच्या खड्डयात अडकवून 5-10 वेळा दीर्घ श्र्वसन करावे हा जालंधर बंधाच्या हा एकूण प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग आहे. या नंतर मान व खालचे धड यांचा संपर्क न तुटू देता मान हळूहळू उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे फिरवून पुन्हा समोर आणायची. अशी 3-4 चक्रे पूर्ण झाल्यावर हीच क्रिया उलट्या दिशेने 3-4 वेळा करायची. यामध्ये आपली मान अनुक्रमे समोरील मानेचा खड्डा, नंतर उजवे कॉलर बोन, उजवा खांदा, पाठीचे उजवीकडील त्रिकोणी हाड, पाठीवरील कॉलरची जागा, डावीकडील त्रिकोणी हाड, डावा खांदा, डावे कॉलर बोन व पुन: समोरील मानेचा खड्डा असा प्रवास करीत असते. इडली पात्रातील वरवंठ्याचा दगड फिरताना जसा त्याचा व दगडी पातेल्याचा संपर्क तुटत नाही. तसेच मानेचा संपर्क तुटता कामा नये. हाही एक मिनिटात स्पाण्डिलायटिसच्या सुरूवातीला तोंड देऊ शकणारा व्यायाम आहे.
अर्धा ते एक मिनिट नळाच्या थंड पाण्याखाली डोक्याला हातांनी मालिश करणे. तसेच गरम पाण्याची आंघोळ असली तरीही शरीरावर अर्धा मिनिटं नळाचं थंड पाणी घेणे हा उत्साह व तरतरी टिकवण्याचा एक प्रत्ययकारी उपाय आहे. एक दोन मिनिटांच्या आवश्यक व्यायामांचे प्रकार इथेच संपत नाहीत. अशाच काही इतर आवश्यक व्यायामांची माहिती आपण पुढल्या लेखात पाहू या.

--- XXX ---

आरोग्यासाठी पाचच मिनिटं आपण काढतो कां?

     सध्याच्या धावपळीच्या युगांत आयुष्यातील पहिली वीस ते पंचवीस वर्ष शिक्षणांत घालवल्यानंतर आपण आपल्या नोकरीत किंवा उद्योगव्यवसायांत स्थिरावून एकदाचं जे हुश्श करतो ते आता थेट निवृत्त होईपर्यत विचार करायला नको या भावनेने. पण तिशी, चाळिशी उलटल्यावर लक्षांत येत की लहान वयात जे आरोग्य आपण गृहीत धरलेले असत ते मोठया वयांत टिकून राहिलेले नसत. वयाची पंचवीस ते तीस वर्ष आपल्या शरीरांतली वाढ चालू असते. त्यामुळे आरोग्याच्या कित्येक बाबतीत आपल्या सभोवताली योग्य परिस्थिति
नसून सुद्धा आपल आरोग्य टिकून रहात. त्यानंतर मात्र आपण प्रयत्नपूर्वकच आरोग्य टिकवाव लागत. मग अस लक्षांत येत की निरोगी कस रहाव याच शास्त्रशुद्ध तर सोडाच पण प्राथमिक शिक्षण देखील आपल्याला मिळालेल नाही. तसच ठरल्यावेळी कामावर जाणे ठरल्यावेळी परत येणे याखेरीज इतर कामात आपण 
फारशी शिस्त पाळत नाही. त्यामुळे आरोग्यासाठी नेमाने कांही करायच म्हटल तर एक प्रकारची मानसिक 
शिथिलता आपल्याला आडवी येते.


     गेल्या वर्षाभरांत दोन गोष्टी झपाटयाने घडत आहेत त्यांचा परिणाम समजून ध्यायलाच हवा. आपल्याकडे आर्थिक सुधारणा घडत असतांना ज्या कित्येक मुद्यापोटी देशावर दबाव टाकला जात आहे त्यामधे आपल्या देशांतल्या औषधांना लागू असलेला पेटंट चा कायदा बदलून अमेरिकेच्या सोईचा पेटंट कायदा आणावा असा प्रयत्न होते आहे. तसे झाल्यास आपल्याकडे मिळणाया औषधांच्या किंमती खूप वाढणार आहेत. कुठलाही रिसर्च झाला त्यावरून एखादे उत्पादन करायचे झाले तर आपल्या देशांत फक्त पहिल्या सात वर्षापर्यंतच पेटंट कायदा लागू होतो. त्यानंतर कोणीही त्या रिसर्चचा वापर करून त्या प्रकारचे उत्पादन करू शकतो. अमेरिकेत मात्र हा कायदा २० वर्षाचा आहे. आपल्या देशात बरेच औषध उत्पदक अमेरिकेत सात वर्षापूर्वी घडलेल्या रिसर्चचा वापर करून औषधे बनवतात. डेंकल रिपोर्ट प्रमाणे आपला कायदा बदलला तर आपल्या औषध कंपन्यांना औषध बनवण्यासाठी भारी रॉयल्टी द्यावी लागेल. त्यामुळे आपल्याकडील औषधांच्या किंमती तीस ते चाळीस पटींनी पण वाढू शकतात.

     दुसरी गोष्ट घटत आहे ती जाहिरातीच्या क्षेत्रात. आज कित्येक औषध कंपन्या जाहिरातींच्या माध्यमातून असे चित्र निर्माण करतात कि बऱ्याच आजारांतून किंवा वेदनातून चुटकी सरशी सुटका होऊ शकते त्यासाठी डॉक्टरकडे जाव लागत नाही, स्वतःच्या आरोग्याबद्दल कांही समजून ध्याव लागत नाही कि इतर कांही त्रास नाही. फक्त एक किंवा दोन गोळया घेतल्या कि आजार छू! त्यामुळे आपल्या आजारपणाबद्दल आपण कांही समजून घेण्याची गरज नाही असा एक भ्रम निर्माण केला जात आहे.

     याशिवाय आजच्या सामान्य माणसाला अशी पण काळजी लागून आहे कि त्याच्या आजारांत डॉक्टर त्याला नीट तपासत नाही, कधी डॉक्टर त्याला विश्वासात घेऊन त्याला नक्की कांय झाले ते सांगत नाहीत, किंवा पुष्कळदा डॉक्टर भरमसाठ टेस्ट करायला लावतात, किंवा त्यांच्या औषधाचा फारसा फायदा होत नाही.

     या शिवाय आजचा कोणताही सेन्सीटिव्ह डॉक्टर स्वतःच काळजीत असतो,  कारण ऍलोपॅथिक औषधांचे तीन महत्वाचे दुष्परिणाम जागोजागी दिसू लागले आहेत.  एक तर या औषधांचे भरपूर साइड इफेक्टस्‌ होत असतात. बऱ्याच औषधांची ऍलर्जिक रिऍक्शन होते. तिसरे म्हणजे पुष्कळशा क्रॉनिक आजारांवर ऍलोपथीतील औषधे उपयोगी पडत नाहीत. उदाहरणार्थ आर्थरायटिस.


     औषधांच्या क्षेत्रात आपल्या सभोवताली जे कांही घडत आहे त्याची चर्चा करण्याचा उद्देश हा की आपल्या आरोग्याबद्दल थोडासा विचार करण्याची गरज का आहे त्याचा अंदाज यावा. परंतू स्वस्थपणे बसून विचार करायला आपल्याला वेळ कुठे मिळतो असा प्रश्न पुष्कळांना पडेल. तसेच किती वेळ विचार करायचा कांय विचार करायचा हा पण प्रश्न पडेल. आपण आरोग्यासाठी कांही वेळ काढू शकलो तर त्या वेळांत नेमके कांय केले म्हणजे आपल्याला बरे रिझल्ट्स मिळतील?

     कांही छोटी छोटी उदाहरण आपण घेऊ या. ऑफिसमध्ये बैठी कामे करताना बरेचदा मान आखडते.
आपल्याला स्पाण्डिलायटिस होणार कांय अशी भिती वाटते. अशावेळी मानेचा एक छोटा व्यायाम करता येईल. पहिल्यांदा मान खाली घालून मानेच्या खड्डयांत आपली हनुवटी चिकटवून दीर्घ श्वास सोडावा. त्यानंतर श्वास घेत घेत मान उजवीकडून मागे, डावीकडे पुनः पहिल्या स्थितीत आणून पुनः श्वास सोडावा. हे करत असतांना मानेचा भाग कायमपणे उजव्या खांद्याला किंवा मानेच्या मागच्या बाजूला किंवा डाव्या खांद्याला चिकटलेला असला पाहिजे. म्हणजे जसा इडली मिक्स्चर वाटायचा दगड कायमपणे त्याच्या पाटयाला चिकटलेला असतो त्याप्रमाणे, यामुळे मानेच्या प्रत्येक भागाला व्यायाम मिळून आखडलेली मान मोकळी होते. किंवा ऑफिसमधे एका जागेवरून दुस-या जागेवर जातांना सहजगत्या अर्ध्या मिनिटासाठी ताडासन करून दोनतीन वेळा दीर्घ श्वसन केले तर आपण तत्काल ताजेतवाने होतो. एक दुसरं उदाहरण घेऊ या. मुलांचे शाळेचे डबे कुणाला तयार करावे लागत नाहीत? पोळी भाजी बरोबर सिझनचे फळ किंवा मोड आलेल कडधान्य किंवा कच्च्या भाज्यांचे छोटे छोटे काप आपण देत गेलो तर मुलांना योग्य आहार मिळू शकतो. पण या गोष्टीबद्दल विचार करायला आपल्याला वेळ नसतो.

     जर आपल्याला थोडा सा वेळ काढता आला तर आरोग्याच्या दृष्टीने काय करता येईल? करण्यासारखे बरेच कांही असले तरी नेमके कांय कसे करावे? आपल्याला निसर्गोपचार पद्धतीची थोडीशी माहिती असेल तर या वेळेचा सदुपयोग जास्त करता येईल, म्हणून पहिल्यांदा निसर्गोपचार पद्धतीचे महत्वाचे सिद्धान्त समजून घेऊ या.

     निसर्गोपचाराची कल्पना भारताला नवीन नाही. आयुर्वेदाची सुरूवात निसर्गोपचारापासून झाली. वैदिक काळातच पाणी, हवा, सूर्य, माती इत्यादीचा वापर करून आरोग्य रक्षण केले जात होते याची उदाहरणे जागोजागी मिळतात. हळू हळू यामधे औषधांचा समावेश होत गेला. असे असूनही आजही आयुर्वेदातले पहिले सूत्र लंघनम् परम् औषधम्‌ असेच आहे. याचा अर्थ आपण समजून घेऊ या.

     निसर्गोपचार आयुर्वेदाच्या मान्यतेप्रमाणे शरीरांत मलसंचय झाल्याने आजार होतो. मलसंचयामुळे आपल्या शरीरात कफ, वात पित्त यांच्यामधील संतुलन बिघडते आपण आजारी पडतो. पाश्चिमात्य जगात देखील औषधोपचाराचा सिस्टेमॅटिक अभ्यास सुरू झाला तो याच आधारावर.  परंतु मागच्या शतकात लुई पाश्चरने बॅक्टीरियाचा शोध लावला. हे बॅक्टीरिया शरीरावर आक्रमण करून आजारपण निर्माण करतात. बॅक्टीरियांचा नाश होऊन आजार बरा होतो. त्यामुळे ऍलोपथीमधे आजार बरा करण्यासाठी आजाराच्या लक्षणांप्रमाणे औषधे दिली जातात. ती लक्षणे दाबून टाकून बरी केली जातात. परंतू निसर्गोपचार, आयुर्वेद किंवा होमियोपॅथी च्या पद्धतीमधे फरक आहे. रोगाची जी लक्षणे निर्माण होतात ती मलसंचयामुळे, त्यातून पुढे क्रॉनिक आजार निर्माण होऊ शकतात. पण त्याआधी शरीर प्रयत्नपूर्वक हा मल बाहेर टकाण्याचा प्रयत्न करत असतो. आपण खाल्लेले अन्न पचल्यानंतर शरीराला आवश्यक पोषक तत्व ठेऊन घेतल्यानंतर उरलेली
अनावश्यक तत्वे साधारणपणे मल, मूत्र, घाम उच्छावासामधून बाहेर फेकली जातात. पण जेव्हा ही संस्थाने व्यवस्थितपणे काम करू शकत नाहीत, किंवा आपणच खाण्यातून किंवा इतर माध्यमातून जादा बोजा शरीरावर टाकत जातो तेंव्हा  मलसंचय होतो, उदाहरणार्थ ट्रॅफिक सिग्नलवर आपल्या शरीरात जाणाऱ्या पेट्रोल धुरामुळे श्वासाचे इतर आजार होतात. अशावेळी हा मल बाहेर काढण्यासाठी किंवा जाळण्यासाठी शरीरात मोठया प्रमाणावर हालचाली सुरू होतात. सर्दी खोकला, त्वचेचे आजारश्वासाचे आजार ताप म्हणजेच ज्यांना आपण ऍक्यूट आजारपण म्हणू शकतो, अशा आजारांगधून हा मल बाहेर फेकला जातो. म्हणूनच होमियापथी मधे दिल्या जाणाया औषधांनी रोग लक्षणे बाढतात हा अनुभव बऱ्याच जणांनी घेतलेला असेल, कारण या औषधांमुळे शरीराची रोग बाहेर फेकण्याची क्रिया वाढते रोग जास्त वेगाने बाहेर फेकला जातो. निसर्गोपचार किंवा बाराक्षर औषधप्रणाली मधे शरीरातले सामान्य मलविसर्जन पुनः प्रस्थापित करण्याचा
प्रयत्न केला जातो. यासाठी वापरले जाणारे उपाय म्हणजे उपास, चादर स्नान किंवा वाष्प स्नानासारख्या पद्धतीने घाम आणणे, प्राणायामासारखे उपाय वापरून उच्छवासातून मल बाहेर टाकणे, किंवा पोटावर मातीच्या किंवा थंड पाण्याच्या पट्टया ठेऊन मलमूत्र विसर्जन नीट घडवून आणणे, योग्य व्यायाम आहारांत बदल करणे इत्यादी.

     लंघनम्  परम् औषधम्‌ असे म्हटले असले तरी लंघन म्हणजे फक्त उपवास नसून षटक्रियेतून शरीर स्वच्छता, पाणी, सूर्य हवा यांचा वापर करून शरीर शुद्धी, प्राणायम, व्यायाम, आहारशुद्धी उपास अशा दहा बाबींचा समन्वय म्हणजे लंघन असे चरकाने सांगितले आहे असो.

     आपल्या आजारपणाबाबत बरेचदा आपल्या चुकीच्या कल्पना असतात. रोगाबाबत डॉक्टरचा सल्ला घेता जाहीरातीत दाखवलेली औषधे वेदना किंवा आजार चुटकीसरशी जातो ही एक चुकीची समजूत. त्याचप्रमाणे डॉक्टरने दिलेली औषधे डोळे मिटून खावीत पण आपल्याला काय झाले आहे, कसे झाले आणि कोणत्या औषध योजनेने कशाप्रकारे आपण बरे होतो हे समजून घेण्याची गरज नाही ही आणखीन एक चुकीची समजूत आहे. पण आपला आजार समजून घेऊन आजारपण दूर ठेवण्याची आपलीच जबाबदारी हे आपण मान्य केले पाहिजे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण निदान पाच मिनिट तरी काढलीच पाहिजेत आणी नियमितपणे काढली पाहिजेत. त्या पाच मिनिटांचा पहिला उपयोग कांय व्हायला हवा? तर शांतपणे स्वस्थचित्ताने बसून आपल्या आरोग्याबाबत आपण कांय करत आहोत हा विचार करणे. आपण दिवसातला किती काळ प्रसन्नतेत घालवतो किती वेळा चिडतो किंवा चिंतेत बुडतो हा आपल्या आरोग्याचा एक मोठा मापदण्ड किंवा इंडिकेटर असतो. त्याचबरोबर आपण कितीवेळा आजारी पडतो, किंवा भविष्यकाळात आपल्याला कांयकांय आजार होण्याची शक्यता वाटते, म्हातारपण येतांना आपल्याला कांय कांय होऊ शकते? या दिशेने एक विचार करण्याची सवय लावून घेतली तर आतापासून भविष्यातले आजार टाळले जाऊ शकतात. पहिल्या पाच मिनिटांच्या पुढे आणखी किती वेळ आपल्याला काढता येईल हा ही विचार करायला हवा. विचारांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष करण्याजोगी पहिली गोष्ट म्हणजे कित्येक तहेची योगासन, कांही प्राणायामाचे प्रकार डोळयांचे व्यायाम. यामध्ये ते मिनिटे ताडासन, नाडीशुद्धी नावाचा प्राणायम आणि डोळयांचे तीन व्यायाम चंचला, त्राटक आणि दृष्टीकूप हा गट पहिल्या क्रमावर येईल, डोळयांच्या व्यायामांची माहिती आपण थोडी पुढे पाहू या. थोडा जास्त वेळ काढता येत असेल तर सूर्यनमस्कार, पोटाचे कांही व्यायाम आणि सांध्यांचे कांही व्यायाम यांचा गट दुसया क्रमावर येईल. शवासनाची सवय करायला थोडे दिवस लागतात परंतु एकदा त्यातल्या कांही खुबी कळल्या कि बसल्या बसल्या किंवा कोणाशी चिडून भांडत असतांना सुद्धा त्यांतल्या कांही खुबी वापरून माणूस स्वतःला चटकन रिलॅक्स करू शकतो.


     आजारपणांत आपण कांय करतो? खर तर छोटया छोटया आजारपणांत, विशेषतः सर्दी, खोकला, टॉन्सिल्स किंवा गळयाचे आजार, थोडाफार ताप या गोष्टी आपण स्वतःच हाताळू शकतो. खरतर आपण तेच करतही असतो कधी गवती चहा, हळद पाणी घेऊन, तर कधी ऍस्परीन च्या गोळया घेऊन. गवती चहा सारख्या घरगुती औषधंमुळे दुष्परिणाम होत नाहीत. कारण अशा औषधातले बरेच घटक आपले मलोत्सर्जनाचे काम सुचारू ठेवणारे असतात. पुष्कळशी औषधे आपल्या रोजच्या अन्नापैकी असतात, आपण नेमके कांय खात आहोत हे आपल्याला माहित असते. या उलट रेडिमेड औषधांचा परिणाम अत्यन्त तीव्र असतो, इतका की ती तीव्रताच कधीकधी वाईट ठरू शकते. शिवाय जर त्यांचा परिणाम आपली सिस्टम दुरूस्त करण्यासाठी नसेल तर शरीरांतले मलसंचय कायम रहाते म्हणजेच रोग होण्याचे मूळकारण तसेच राहते. पण एक रोग बरा होऊन दुसरा सुरू होतो. याचसाठी आपल्या आजारपणाचा थोडा विचार करण्याची,
त्या बाबत थोडे वाचन करण्याची पण गरज आहे तसेच प्रसंग आला असता थोडे नैसर्गिक उपाय वापरण्याबद्दल मनाची तयारी असणे हे ही आवश्यक आहे.

     एवढे सर्व असेल तर निसर्गोपचारांत प्रमामुख्याने कांय उपाय वापरले जातात या प्रश्नाकडे आपण वळू शकतो. यापैकी मुख्य उपाय आहेत उपास, पाणी, माती, सूर्यप्रकाश हवेचे उपाय, व्यायाम, आहार आणि योग्य मनःशांति राखणे. निसर्गोपचाराचा कुठल्याही उपाययोजनेत या सर्व बाबींचा समावेश व्हायला पाहिजे, तरी पण या एकेकटया उपायांचा काय उपयोग होतो तो आपण पाहू या.

     उपासः उपासामुळे शरीराच्या पंचन संस्थेला विश्रांति मिळून, जास्त मलविसर्जनाचे काम चांगले करण्यासाठी वापरले जाते. बरेचना आपल्या शरीरांतले मलविसर्जन महीनोन महिने नीट पार पडल्यामुळे शरीरांत टोविसन्सव निर्माण होऊन आपल्या शरीरात साचून राहतात शिवाय आपण खालेल्या अन्नातून निर्माण झालेली द्रव्ये ज्यांची शरीराला ताबडतोब गरज नसते पण नंतर गरज लागणार असते ती द्रव्ये पण शरीरांत साठवली जातात.

     उपवासाच्या काळांत शरीरांतील साठलेली फॅट बाहेर काढून तिचा वापर पोषणसाठी केला जात असतांना ही साचलेली मलद्रव्ये देखील बाहेर निधू लागतात त्यांचे मलविसर्जन होऊन शरीर निरोगी राहण्यांस मदत होते.

     पाण्याचा एक छोटासा उपयोग आपण पाहू या. बरेचदा पडस खोकला हे आजार एकत्र येतात. या आजारात प्रसंगी ताप असेल तरी सुद्धा घोट घोट साध पाणी सारख घेत राहील तर पडस खोकला थांबतो किंवा लवकर आटोक्यांत येतो. हे एकदा करून बघून आपल्याला इतर पाण्याचे उपाय शिकता येतील.

     आपण मुरूम, पुळया इत्यादीसाठी भरमसाठ औष्ज्ञध घेतो. ब्यूटी पार्लर मध्ये फेशियल करून घेणे हाही असाच खर्चिक प्रकार त्याऐवजी योग्य अशा मातीचा लेप दहा ते पंधरा मिनिटे तोडाला लावून सतेज त्वचा करून घेणारे लोक केरळमध्ये पुष्कळ आढळतात. हा ही निसगोपचारच. मातीचा लेप ऍलर्जी, कीटक दंश यासारख्या गोष्टींवर उपयोगी तर असतोच पण मातीचा लेप रोज पोटावर लावला तर बद्धकोष्ट देखील बरा होतो. मागे सांगितलेले डोळयांचे व्यायाम असे करतात.
1.   डोळयांची बुबूळे वर, उजव्ला बाजूला, खाली डाव्या बाजूला अशी वर्तुळाकार फिरवावीत. तसेच उलटया दिशेन फिरवावी.


२.   फूट अंतरावर एखादी ठळक वस्तू निवडावी तसेच खूप लांब अंतरावरील ठळक वस्तू निवडावी. ही शक्यतो झाडे असावीत. एकदा जवळच्या वस्तूकडे पाहावे एकदा लांबच्या वस्तूकडे पाहावे. दर सेकंदाला एकदा या दृष्टीचा फोकस बदलावा प्रत्येक वेळी पापण्यांची अद्यडझाप करावी.
३.   ते फूट अंतरावर एखादे जाड बुंध्याचे झाड निवडावे तसेच लांब अंतरावरील एखादे झाड निवडावे. दोन्ही पायांत अंतर ठेऊन उभे रहावे. जवळील झाडाच्या उजव्या बाजूला झुकून लांब अंतरावरील झाडोकडे पहावे. यासाठी शरीर उजव्या बाजूकडे पहावे. असे एक मिनिटांत १५ ते २० वेळा करावे. प्रत्येक वेळी शरीर डावीकडून उजवीकडे आणतांना पापण्यांची उघडमिट करावी शरीराची हालचाल झोका
घेतल्याप्रमाणे करावी.
४.   ते फूटावरील एखादया छोटया वस्तूकडे टक लावून पाहावे. डोळयांत पाणी येई पर्यंत पहात रहावे. निरांजनाच्या ज्योतीवर टक लावल्यास जास्त चांगले.
५.   ज्योतीसमोर एका स्टूलावर बसून शरीराला कमरेपासून झोका देत आपले डोळे ज्योतीपासून दीड फूट अंतरावर आणावे लांब फूट अंतरापर्यत न्यावे. प्रत्येक वेळी मागून पुढे येताना किंवा पुढून मागे जाताना पापण्याची उघडमिट करावी. मिनिटात पंधरा ते वीस वेळा करावे.
६.   दृष्टीकूपः   याला इंग्लीशमध्ये पामिंग असे म्हणतात. दोन्ही तळहातांचा खोलगट खड्डा करून त्यांना डोळयांवर ठेवावेत. आतमध्ये पापण्याची उघडमिट करता यावी परंतू बाहेरील प्रकाश तर आत येणार नाही अशातहेने हात ठेवावेत. ते मिनिटानंतर हात काढावेत. त्यावेळी डोळयावर एकदम जास्त उजेड येऊ देऊ नये.
     पोटाच्या सांध्यांच्या व्यायामासाठी योग्य आसने, प्राणायाम इत्यादि गोष्टी एखाद्या चांगल्या योगासनाच्या पुस्तकावरून शिकता येतात.

     या व्यायामात आपण श्र्वास कसा घेतो कसा सोडतो हेही महत्वाचे असते. या दृष्टिने विवेकानंद केंद्र , बंगलौर या संस्थेची योगासन प्राणायमावरील पुस्तके फारच उपयुक्त आहेत.
    
     पाण्याचे मातीचे दोन छोटे वापर मागे सागितले. पण आरोग्यासाठी माती पाण्याचा वापर करण्याच्या नाना तहेच्या पद्धती आहेत. हीच गोष्ट आहाराबाबतची. यासाठी निसर्गोपचारावरील एखादे चांगले पुस्तक बाचून काही उपाय समजून घेणे फायद्याचे ठरेल. या संदर्भात डॉ. लक्ष्मण शर्मा, डॉ कुलरंजन मुखर्जी एस.जे.सिंग यांची पुस्तके अत्यंत उपयुक्त आहेत असे दिसून येते.

     दिवसाकाठी थोडासा वेळच आपल्या हाती लागत असला तरी देखील वरील प्रकारची पुस्तके वाचण्यात किंवा शरीराला आसन योग्य आहाराची सवय लावण्यासाठी त्या वेळेचा उपयोग करण्याने आपले आरोग्य बयाच अंशी आपल्या ताब्यातच राहू शकते.

..........................................न्..........................................
    














































































कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें