सोमवार, 28 जुलाई 2008

04- जलचिकित्सा

जलचिकित्सा
मंगळवार दि.18 फेब्रुवारी 1997
लेखांक 4.
This article was published in Gaokari, Nashik on 18 Feb 1997
Also see my Video on जलचिकित्सा -- Water therapy -- Video -- Hindi

निसर्गोपचारातील सुमारे तीस टक्के चिकित्सा पाण्याच्या वापरावर आधारित आहे. ब-याच जणांना यातील काही उपाय ऐकून माहीत असतील, ते म्हणजे पगस्नान, कटिस्नान, मणक्याचे स्नान, बाष्प स्नान, चादर स्नान, इत्यादी.

आपल्या जठरात जठराग्नी निर्माण होत असतो असे आयुर्वेदात म्हटले आहे तसेच योगावरील ग्रंथामध्ये शरीरात सहा ठिकाणी चक्रे असून प्रत्येक चक्रात थोडीफार ऊर्जा निर्माण होत असते असेही म्हटले आहे. पण आपण जाणतो की कोणत्याही मशीनमध्ये निर्माण होणारी उष्णता वापरण्यासाठी वेगवेगळ्या भागात गेली पाहिजे तसेच अनावश्यक उष्णतेचा निचरा देखील होत राहिला पाहिजे. तरच पुढची ऊर्जा निर्मितीची क्रिया नीट चालू राहू शकते. हीच उपमा शरीराला लागू आहे. निसर्गोपचारातील पाण्याचे उपचार हे उष्णतेचे नियमन करायला उपयोगी पडतात.

कटिस्नानासाठी एखादे घंगाळ किंवा टब घेऊन त्यात कमरेपासून मांड्यापर्यंतचा भाग पाण्यात राहील असे बसावे व हातांनी पोटावर सारखे पाणी उडवून चोळत रहावे ही क्रिया सांगितली आहे. ताप आला नसेल अशा व्यक्तीला दर तीन दिवसातून एकदा कटिस्नान दिले तर लठ्ठपणा, हायब्लड प्रेशर, बद्घकोष्ठता हृदयविकार, किडनीचा त्रास इत्यादी रोगावर आराम मिळतो.

पगस्नान म्हणजे थंड पाण्यात पाय किंवा कधी कधी हात बुडवून ठेवणे. आपले तळहात व तळपाय अतिशय संवेदनक्षम असून त्यांच्यावाटे शरीरातील उष्णता पटकन निघून जाऊ शकते. विशेषत: मेंदूतील निचरा न झालेली उष्णता कमी करण्यासाठी पगस्नान उत्तम आहे. म्हणून आपण बाहेरून आल्यावर किंवा झोपण्यापूर्वी हात पाय धुतो. त्यावेळी फक्त अर्धा एक मिनिट पाण्याचा स्पर्श करण्याऐवजी पाच सात मिनिटे हात पाय पाण्यात बुडवून ठेवले तर मेंदूला चांगला तरतरीतपणा येतो व टेन्शन किंवा तणावामुळे होणारे विकार टाळता येतात. जेवणाआधी हात पाय धुतल्याने तात्काळ पोटातील उष्णता त्यांच्या वाटे बाहेर जाऊ लागल्यामुळे भूक चांगली लागणे व अन्नाचे चांगले पचन होणे सुरू होते. यात महत्त्वाचा मुद्दा असा की लठ्ठपणा येण्याचे खरे कारण खाल्लेले अन्न नीट न पचणे किंवा शरीराला त्याची गरज नसणे हे असते. अन्न पचन व्यवस्थित होऊ लागल्यास जास्त खाण्याची प्रवृत्ती पण कमी होते.

बरेचदा थकवा जाण्यासाठी आपण गरम पाण्यात पाय बुडवून ठेवतो. अशा वेळी एक काळजी आवश्य घ्यावी. गरम पाण्याचा किंवा इतरही गरम उपचारांचा उपयोग थकवा घालवण्यासाठी फार चांगला होतो. उदाहरणार्थ बाष्पस्नान किंवा सोना-बाथ म्हणजे गरम हवेचे स्नान. मात्र अशावेळी डोक्यावर व कपाळावर एखादी थंड पाण्याची पट्टी अवश्य ठेवावी. अन्यथा मेंदूत पटकन उष्णता जाऊन डोके शिणून जाते. तसेच गरम पाण्याचा वापर करून कोणताही उपाय केल्यानंतर दहा-पंधरा मिनिटापासून दोन तासापर्यंत झोप अवश्य घ्यावी नाहीतर विनाकारण कृशता व दुबळेपणा निर्माण होतो.

मणका स्नान म्हणजे मणक्याच्या हाडाला थंडावा देण्यासाठी केलेला उपाय. एका लांब टब मधे उथळ पाण्यात पाठीवर झोपावे किंवा लाकडी बाकावर ओली चादर पसरून त्यावर झोपावे. दम्याच्या रोग्यांना याचा विशेष उपयोग होतो.

चादर स्नान, सोना बाथ किंवा बाष्प स्नान तसेच सूर्य स्नान यामागचा सिद्घांन्त थोडा वेगळा आहे. आपल्या शरीरातला कचरा ब-याचदा इतक्या सूक्ष्म स्वरूपात शरीरात साठून रहातो की, साधारण उपायांनी तो निघत नाही. आपल्या त्वचेवर असंख्य लोमकूप किंवा भोक असतात. याच्यातून घामाव्दारे काही कचरा बाहेर निघत असतो. याच क्रियेला जास्त प्रभावी करण्यासाठी चादर स्नान हा उपाय केला जातो. यामध्ये एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे ओल्या चादरीत गुंडाळायचे नंतर त्यावर दोन तीन गरम घोंगड्या गुंडाळून थंडी किंवा वारा बाधणार नाही अशा बेताने झेपावून ठेवायचे. सुमारे तीस चाळीस मिनिटात चांगला घाम येतो. तो पुसून काढून कोरडे कपडे घालावेत. मात्र घाम येण्याऐवजी झोप लागली तर झोप संपल्यानंतर कोरडे कपडे घालावेत. या प्रकारामुळे मेंदुला अत्यंत शांतपणा मिळून तरतरी येते. त्वचेचे कित्येक रोग बरे होतात. ऍलर्जीवर तर हे फार परिणामकारक ठरते. तसेच किडनीच्या रोगांवरही उपयोगी आहे. गांधीजींनी निसर्गोपचाराचे बरेच प्रयोग स्वत:वर करून पाहिले. त्यात मुलाचा मोठा विषमज्वर चादर स्नानाने कमी झाला व नंतर पूर्ण बरा झाला असा अनुभव त्यांनी लिहून ठेवला आहे.

आपणही ताप आला की घाम येऊन ताप उतरावा यासाठी इतर उपाय करतोच. त्यामध्ये दोन-तीन चादरी लपेटून पडून राहणे, पारिजात आणि तुळशीची पाने एकत्र करून खाणे, गवती चहाचा काढा घेणे, ऍनल्जिन किंवा त्रिभुवन कीर्ती सारखी औषधे घेणे इत्यादी प्रयोग आपण करतोच. त्यापेक्षा चादर स्नानाचे महत्त्व जास्त अशासाठी की पाण्याच्या धुवून काढण्याच्या गुणांमुळे संपूर्ण शरीरातील लोमकूप जास्त चांगले मोकळे होऊन सूक्ष्म कचरा जास्त चांगल्या प्रकारे बाहेर पडतो. तरीही आपल्याला ऐन तापात चादर स्नान नको असे वाटत असेल तर एरवीच दर महिन्यातून एकदा चादर स्नान घेत रहायला हरकत नसते.

या चादर स्नानाऐवजी सूर्यस्नान म्हणजे याच प्रकारे अंगावर काळी घोंगडी लपेटून सकाळच्या कोवळ्या उन्हात अर्धातास निजून रहाणे, किंवा सोना बाथ म्हणजे जिथली हवा खूप गरम केलेली आहे अशा खोलीत अर्धा तास बसणे किंवा बाष्पस्नान म्हणजे वाफ भरलेल्या खोलीत बसून रहाणे किंवा माती स्नान म्हणजे सर्वांगावर मातीचा लेप देऊन अर्धा तास कोवळ्या उन्हात निजून रहाणे, असे बरेचसे गरम उपाय पण करता येतात. पण या सगळ्यापूर्वी एक महत्त्वाची काळजी घ्यावी ती ही की आधी तीन चार पेले पाणी प्यावे तसेच डोक्याला साध्या पाण्याने गच्च ओला केलेला टॉवेल गुंडाळून शिवाय गरज पडल्यास त्यावर पाण्याची धार ओतत रहावी. यापैकी माती स्नानाने त्वचेवर एक विशेष प्रकारची कांती येते. मातीस्नानात सुद्घा लाल मातीचे, काळ्या मातीचे, नदीकाठच्या मातीचे, पांढ-या मातीचे किंवा पिवळ्या मातीचे असे वेगवेगळे प्रकार केले जातात. आतातर अगदी ब्यूटीपार्लर मध्ये सुद्घा मातीचे फेशियल अगदी जाहिरात देऊन केले जाते. मात्र वेगवेगळ्या त-हेच्या मातीमुळे नेमका काय वेगळेपणा येतो याबद्दल विशेष लिहिले गेलेले नाही किंवा एकूणच रोगाच्या चिकित्सेमध्ये मातीचा नेमका कसा वापर करावा यावर फारशी पुस्तके नाहीत. मात्र महात्मा गांधींचे एक व ‘माती नव्हे सोने’ (लेखक : सरोदे, बीड) अशी दोन चांगली पुस्तके माझ्या वाचनात आली आहेत.

--- XXX ---
kept mangal files on nity_leela
javascript:void(0)
पोस्ट प्रकाशित करें

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें