शुक्रवार, 1 मार्च 2013

शासकीय भूमिकेमुळे आयुर्वेदाची पीछेहाट


शासकीय भूमिकेमुळे आयुर्वेदाची पीछेहाट
Also on Navprabha from Goa http://www.navprabha.com/navprabha/node/7862
----- लीना मेहेंदळे
दीर्घायु,दिवाळी अंक, पुणे, 1994 
आयुर्वेद म्हणजे भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी, असे असूनही आज पश्चिमी देशांत आयुर्वेदाचे यश उदीत होत असतानाच भारतात मात्र आयुर्वेदाला अजूनही दुय्यम स्थान आहे. याला शासनाची भूमीका व आपल्या समाजाने स्वीकारलेला दृष्टिकोन हे जबाबदार आहेत. त्या दृष्टिकोनाचा उहापोह करणारा हा लेख.

पण त्याआधी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान  - सायन्स आणि टेक्नॉलॉजी आणि समाजाची प्रगती याबद्दल थोडी चर्चा करण्याची गरज आहे. विज्ञान म्हणजे कोणत्याही शास्त्राचे सैद्धांतिक विवेचन, त्या सिद्धांताची प्रयोगाबरोबर सांगड घालणे व ते सिद्धांत अधिक प्रगल्भ करणे. तर तंत्रज्ञान म्हणजे या विज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करून त्याच्याद्वारे जीवन सुलभ बनविणे व समाजाची प्रगती घडवून आणणे. प्रत्येक तंत्रज्ञानाच्या पाठीशी विज्ञानाची बैठक असावी लागते आणि विज्ञानाच्या वाढीसाठी लागणारा फिडबॅक तंत्रज्ञान वापरून मिळू शकतो. सामान्य जन व वैज्ञानिक यांच्या मधला दुवा साधणारा घटक म्हणजे तंत्रज्ञान. याचे ताजे उदाहरण आपण पाहू – पंजाबमधील कृषी विद्यापीठाने दर पंधरा दिवसांनी मिटींग ठरवून शेतकर्‍यांना विद्यापीठात बोलावून, किंवा पत्राने त्यांच्या अडचणी समजावून घेऊन तत्कळ उत्तरे शोधली आणि पंजाबात शेतकरी लवकर प्रगत झाला, तसे इतरत्र घडले नाही हा संदर्भ पंजाब कृषि विद्यपीठाचे पहीले कुलगूरू श्री. रंधावा यांच्याच तोंडून मी एकला आहे. असो...

भारतात ज्ञानाची समृद्धी व आयुर्वेदाची प्रगती यांचा इतिहास बघितल्यास असे दिसते की आयुर्वेद हे त्या काळातले तंत्रज्ञान व त्याला लागणारी सैद्धांतीक किंवा वैज्ञानिक बैठक भारतीय दर्शनशास्त्र, विशेशतः सांख्य, न्याय, वैशेषिक यासारख्या षड-दर्शन शास्त्रांमधून व वेदांमधून पक्की झालेली होती. आज पश्चिमी देशांमध्ये असे मानतात कि फिजिक्स, केमिस्ट्री, बायलॉजी यासारख्या विषयांचा मूळ उद्गाता म्हणजे एरिस्टोटल (ख्रिस्तपूर्व 200 ते 200 या काळात) किंवा त्याचे समकालीन इतर दार्शनिक. थोडक्यात ज्याला आज आपण बेसिक सायन्सेस म्हणतो त्याची सुरूवात दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीचीच आहे, असा दृष्टिकोण पश्चिमी देशांनी मांडला व पसरवला.

आपण मान्य करू की त्यांना भारतातील ज्ञान परंपरा, इतिहास व व्याप्ती माहित नव्हती, म्हणून त्यांनी भारतीय दर्शन शास्त्रामध्ये जे वैज्ञानिक विचार व संदर्भ आहेत त्यांचा मागोवा न घेताच विज्ञानाचा इतिहास लिहून काढला व तो लिहिताना विज्ञानाच्या वाढीत भारताचा काहीही सहभाग (कन्ट्रीब्यूशन) नाही, असे नमूद करून ठेवले. पण आपण तरी त्यांना कधी त्यांची चूक दाखवली का? किंबहूना ही त्यांची चूक आपल्याला कधी उमगली का? पाच सात हजार वर्षांपासून लिहिले जात असलेले आपले सांख्यादि ग्रंथ ही आद्य विज्ञानाची सुरुवात होती असे आपल्याला तरी कधी कळले किंवा पटले का ? आपण या सर्व दर्शनशास्त्राला आत्यंतिक आध्यात्माकडे नेणारे --- व्यवहारात शून्य उपयोग असणारे --- म्हणून अवैज्ञानिक ---- म्हणून टाकावू अशीच त्यांची संभावना केली. या सर्व ग्रंथांमधील तर्कशुद्धता, सिद्धांताची मांडणी, वैज्ञानिक दृष्टिकोन यांची दखल आपण घेतली नाही, या चुकीबद्दल पश्चिमी इतिहासकारांना दोष देण्यात अर्थ नाही. या ठिकाणी हे लक्षात ठेवायला हवे कि विज्ञानात सिद्धांत मांडताना तो तर्कशुद्ध असणे महत्वाचे असते --- पुढे मागे तो चुकीचा असल्याचे ठरले तरी त्याचे वैज्ञानिक महत्व कमी होत नाही. सतराव्या शतकात न्यूटनने सिद्धांत मांडला कि प्रकाश हा वेगाने जाणार्‍या कणांचा एक वाहता समूह असतो. त्याच्याच काळात हा सिद्धांत चुकीचा ठरवला जाऊन प्रकाश तरंगस्वरुपी असतो हे मान्य झाले. मात्र न्यूटनचे सर्व विवेचन तर्कशुद्ध होते याबाबत तेंव्हाही कुणाचे दुमत नव्हते. आता विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रकाशाचे तरंगस्वरुप असतेच पण त्याबरोबर त्याला कणाचेही स्वरुप असते असा सिद्धांत मान्य झाला आहे.

याच तर्कशुद्धतेच्या निकषातून पहिल्यास आपल्याला पटेल कि तीन-चार हजार वर्षापूर्वी ज्याला दर्शनशास्त्र म्हटले गेले त्यांत देखील आधुनिक फिजिक्स, कॅमेस्ट्री, बॉटनी यांची बीजे होतीच, त्या सिद्धांतातून प्रकट झालेले तंत्रज्ञान म्हणजेच अर्थशास्त्र, आयुर्वेद, धनुर्वेद, स्थापत्य, ज्योतिष यासारखी शास्त्र, यापैकी आयुर्वेदाची व्याप्ती आणि विस्तार सार्वात जास्त टिकून राहिला. तसेच उत्पादनावर भर असलेली एक अर्थव्यवस्था आपल्याकडे निर्माण झाली व तीही टिकून रहिली. या दोन्ही शास्त्रांच्या व्याप्तीचे सूत्र होते ---- लोकाभिमुखता आणि विकेंद्रिकरण. आयुर्वेदाची सामान्य सूत्रे ही आपल्या जीवन पद्धातीतील एक भाग बनून राहीली व टिकली तसेच आपली विकेंद्रित अर्थव्यवस्था पण टिकली व पसरली. ही शास्त्रे संपूर्णपणे विज्ञान किंवा तंत्रज्ञानाला अनुसरून होती हे जर भारतीयांनाच मनःपूर्वक पटले नाही, तर जग त्यांचा स्वीकार कसा करणार? आणि भारतीयांना हे पटण्यासाठी त्या त्या शास्त्रांचा जो काही अभ्यास आवश्यक आहे तो होऊ शकेल अशी आपली आजची शिक्षण व्यवस्था नाही.

आता आपण सुमारे 1700 सनापासून ते सन 2000 या 300 वार्षांच्या कालावधीतील घटनांचा व आयुर्वेदाच्या प्रगतीवर त्या घटनांचा कसा वाईट परीणाम झाला याचा थोडासा, ऐतिहासिक आढावा घेऊ. सन 1700 च्या आसपास ब्रिटनच्या दृष्टीने भारत हा व्यापारीदृष्या अत्यंत पुढारलेला देश. फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल इ. अनेक देशही व्यापार करण्यासाठी भारतात येत होते. संपूर्ण 17 व्या 18 व्या शतकात फ्रान्स, इंग्लंड आणि युरोप येथे युद्धे होत होती. 1757 मध्ये प्लासीची लढाई जिंकल्यानंतर इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर भारतात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवत केली. इंग्रजांच्या हे लक्षात येवून चूकले की त्यांची शस्त्रास्त्रे भारतीय शस्त्रास्त्रांपेक्षा खूपच वरच्या दर्जाची होती. तसेच भारतीयांमध्ये थोड्याशा पैशाच्या लालसेने घरातले भेदी शोधून घराघरात, जातिजातीत, भावाभावात फूट पाडणे सहज शक्य होते. इंग्रजांच्या असेही लक्षात आले की, या देशावर त्यांना राज्य करणे शक्य आहे व या ठिकाणी फक्त आक्रमक लुटेर्‍याची भूमिका न घेता जर राज्यकर्त्याची भूमिका घेतली तर त्याचा दीर्घकालीन उपयोग होऊ शकेल. अशा भूमिकेसाठी मात्र राजाला थोडी न्यायप्रियता, थोडी शिस्त दाखवावी लागते, त्याचे राज्य समाजाला पोषक आहे, असे चित्र निर्माण करावे लागते. इंग्रजांना हे चित्र निर्माण करण्यात यश मिळाले. त्यानंतर इंग्रजांच्या असेही  लक्षात आले की या देशाची एकूण आर्थिक व्यवस्था व उत्पादकता अतिशय जास्त आहे. इंग्लंडमध्ये 1750 ते 1800 या काळात जी एक औद्योगिक क्रांतीची चाहूल लागत होती, या चाहूलीच्या आधीचा इतिहास पाहिला तर भारतातील आर्थिक उत्पादकता ही इंग्लंडमधील आर्थिक उत्पादकतेपेक्षा जास्त होती. त्या काळची विकेंद्रीत उत्पादन स्थळे व कारागिरी शिकून घेण्याच्या परंपरागत पद्धती यांच्यामुळे भारतातील उत्पदनक्षमता जास्त होती. मात्र त्यामागील पाचशे ते हजार वार्षांचा काळ तरी निदान असा होता कि जेव्हा भारतात विज्ञानांत प्रगती झालेली नव्हती. एक प्रकारचे स्टॅग्नेशन आलेले होते व म्हणूनच आयूर्वेद किंवा अर्थशास्त्रत देखील नवे संदर्भ किंवा नवे शोध लागत नव्हते. याउलट इंग्रजांकडे ज्या औध्योगिक क्रांतीची चाहूल लागत होती, त्यात सायन्स चा भाग खूप मोठ्या प्रमाणावर होता. इंग्रजांकडे औद्योगिक क्रांती झाल्यानंतर त्यांना आपण जागतिक बाजारपेठ काबीज करावी आणि त्यासाठी भारतातील मूळ आर्थिक उत्पादकता कमी करणे गरजेचे आहे, असे वाटू लागले. यासाठी त्यांनी सर्व तर्‍हेचे उपाय केले. जुलाहींची बोटे कापण्यासारखे उपायही करतांना त्यानी मागेपूढे पाहीले नाही. हेतू हाच होता की येथील कुशल कामगारांचे परिवर्तन अकुशल कामगारांमध्ये व्हावे व त्यांनी आपापल्या गावी शेती करण्यासाठी परत जावे. याउलट ब्रिटिशांकडे जी नवीन औद्योगीक क्रांती उदयाला येत होती, नवीन समाजपद्धती निर्माण होत होती, त्यात “centralization of capital” आणि “Infrastructure for quick communication” हे दोन महत्वाचे भाग होते. अशाच पद्धतीची अर्थरचना, आर्थिक व्यवस्था भारतात देखील पुढेमागे निर्माण करता यावी या दृष्टीने ब्रिटिशांनी पावले उचलायला सुरूवात केली. त्यामध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर दळण-वळणाची साधने निर्माण करणे, लँण्ड अक्विझिशनचा कायदा  आणि मोठ्या प्रमाणावर “Universal Education” निर्माण करून त्याद्वारे राज्यशासनाच्या प्रशासकीय कामाला उपयोगी पडेल अशी एक clerical  व्यवस्था निर्माण करणे उपयोगी ठरणार होते. यासाठी जी शिक्षणाची व्यवस्था 1850 पासून भारतात निर्माण व्हायला सुरूवात झाली व त्या व्यवस्थेमध्ये इंग्रजांनी जाणीवपूर्वक जे काही विषय मागे ठेवले यात आयुर्वेद हा पहिला बळी ठरला. या देशातील आयुर्वेदला नाहीसे करून नवीन allopathy system जी त्यांच्या देशात जन्माला येत होती तिचाच educational वापर त्यांच्या दृष्टीने योग्य मानला गेला. ते शिक्षण घेणार्‍याला मानमरातब, सरकार दरबारी नोकरी, ग्रॅटस् असे नानाविध संकेत सुरू करून देशातील जास्तीत जास्त हुशार व्यक्तींचा कल allopathy कडे वळवण्यामध्ये इंग्रजांना यश मिळाले.

याचा अर्थ आयुर्वेदाचे जाणूनबुजून खच्चीकरण केले असाही होत नाही. कदाचित आयुर्वेदाबद्दल इंग्रजांना काहीही माहिती नव्हती. परंतु जे जे भारतीय ते ते अवैज्ञानिक, अंधश्रद्धा पोसणारं, म्हणून त्याज्य आहे असे लोकांच्या मनावर बिंबवा, इंग्लंडमधून आलेले ज्ञानच फक्त वैज्ञानिक दृट्ष्या बरोबर आहे अशी लोकांची समजूत निर्माण करून द्या ही त्यांची काम करण्याची पद्धत होती. त्यामुळे शैक्षणिक व्यवस्थेत आयुर्वेद या विषयाचा पद्धतशीर अभ्यास होऊच शकला नाही. पुढे लोकमान्य  टिळकांनी किंवा गुरूकुल कांगडीसारख्या संस्थेमधून या गोष्टीचा विचार करून आयुर्वेद college उघडण्यावर भर दिला. परंतु तोपर्यंत थोडेफार नुकसान होऊन गेले होते.

1950 नंतर म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने या शिक्षण पद्धतीत तसेच आयुर्वेद व ऍलोपथीबाबतच्या ब्रिटिशांनी ठरवून दिलेला मानदंडात काही बदल केला का ? याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल. ब्रिटीशांनी घालून दिलेली शिक्षणपद्धती सरकारने पुढे चालू ठेवली त्यामध्ये भारतीय प्रगती काय आहे त्याचा भारतीयांनी अभ्यास करावा यादृष्टीने काहीही जाणीवपूर्वक प्रयत्न किंवा उपाययोजना केली नाही. त्यामुळे साहजिक जी व्यक्ती शैक्षणिक संस्थांमधून बाहेर पडली आहे, शिक्षित आहे आणि जिचा दृष्टीकोन वैज्ञानिक आहे असे गृहीत धरले जाते किंवा जिला समाजात मान आणि आदर आहे या सगळ्या व्यक्तिच्या मनात allopathy ही scientific आणि आयुर्वेद हे unscientific हे तत्व संपूर्णपणे बिंबवले गेले आहे. देशातील हूशार विद्यार्थ्यांना आयुर्वेदचे आकर्षण वाटेल असा शिक्षणक्रम किंवा सन्मानाचा ओघ शासन दरबारी निर्माण करता आला नाही. त्यामुळे आयुर्वेदाचा अभ्यास करणारा विद्यार्थी कनिष्ठ तर आहेच शिवाय त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनही नाही असे मत निर्माण झाले आहे. इथेही हा गफलत झालेली आहेच. अवैज्ञानिकहा शेरा आपण नेमका कोणावर मारत आहोत? आयुर्वेद या समग्र चिंतनप्रणालीवर, आयुर्वेद या शास्त्रावर का आयुर्वेदाचा अभ्यास केलेल्या परंतु ऍलोपॅथिचे किंवा शाळा कॉलेजचे शिक्षण न घेतलेल्या व्यक्तिवर? याचा नेमका उलगडा अजूनही शासनाला, व समाजाला झालेला नाही. एखाद्या निष्णात ऍलोपॅथीक डॉक्टर आयुर्वेदाबद्दल अभ्यासपूर्ण असे काही बोलू लागला तर त्याची वाहवा होते. म्हणजेच आयुर्वेद अवैज्ञानिक नाही असे काही ऍलोपॉथिक डॉक्टर मानतात हे निश्चित. तर मग शासनाने आयुर्वेदाला अवैज्ञानिक मानण्याचे कारण काय? शिवाय असेही चित्र दिसून येते कि, आयुर्वेद विद्यार्थ्यांनी आयुर्वेदावर काहीही बोलावे, संस्कृतमधून वाक्य न् वाक्य, ग्रंथ न् ग्रंथ उद्ध्रृत करावे परंतु आजच्या आधुनिक युगातील विज्ञान-विषयाबद्दल एकही शब्द उच्चारू नये व तो उच्चारला तर ती त्याची अनधिकार चेष्टा असे समीकरण होऊन बसले. त्यामुळे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी B.P. चे उपकरण वापरले, ब्लड शुगर लेव्हल पाहिली की ब्रह्महत्या झाली असा एक समज झाला. परिणामी आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला. आपल्यला आधुनिक फिजिक्स, केमिस्ट्री मधून नवीन आलेल्या गोष्टी वापरायला प्रत्यवाय आहे म्हटल्यावर विद्यर्थ्यांना त्याचे आकलन होईनासे झाले. गम्मत पहा की MBBS BAMS या दोन्ही कोर्सेसकडे जाणारा विद्यार्थी बारावीपर्यंत सारखेच फिजिक्स, बायलॉजी व गणित शिकत असतो. पुढे देखिल तो शिकत असलेले Antomy, Physiology हे विषय सारखेच असतात, तर मग MBBS विद्यार्थ्यांचा वैज्ञानिकपणाआणि BAMS विद्यार्थ्यांचा अवैज्ञनिकपणाकशाच्या जोरावर ठरवला जातो?  आयुर्वेदातून ज्याने वनस्पतीजन्य औषधींचे तंत्र शिकून घेतले आहे, अशा विद्यार्थ्याने जर त्याचबरोबर Plant Pathology, Plant Genetic अशाही विषयांचा अभ्यास केला असता तर याचा भारतीय सामाजाला फार मोठा फायदा झाला असता. परंतु ज्याने आयुर्वेद शिकायाचा असेल त्याने आधुनिक विज्ञानामधून आलेल्या कोणत्याही तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा नाही हे शासनाच्या शिक्षण पद्धतीने घालून दिलेले बंधन आहे. म्हणून जे पाचशे वार्षांपूर्वीच्या आयुर्वेदात सांगितले तेच तुम्ही करायचे, मात्र त्याला पोषक नवे काही शोधायचे किंवा करायचे नाही आणि जुनाट म्हणून हिणवून घ्यायचे, दुय्यम स्थान पत्करायचे हा शासनानेच जणू दंडक घालून दिला. मला आश्चर्य असे वाटते की जर चरक, सुश्रुत, वाग्भट यांना नवी शल्य औजारे शोधायची किंवा वापरायची नाहीत, नवे लिखाण करायचे नाही, जुने तेच वापरायचे  असे बंधन त्यांच्या काळातील राज्य शासनाने किंवा समाज धुरीणांनी घातले असते तर आज आयुर्वेद कुठे असता?

वैज्ञानिक, संशोधन या शब्दांबद्दल शासनाची किती चुकीची समजूत व धोरणे आहेत तसेच शासनाच्या या धोरणांमुळे आयुर्वेदाची प्रगती कशी खुंटली ते लक्षात येण्यासाठी मी एक उदाहरण देते. समजा एका प्रवीण वैद्याने मधुमेहावर लागू पडणारे एक औषध शोधून काढले आणि त्याला एक संशोधनाचा विषय सुचला कि आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे पित्त, वात व कफ प्रकृतीच्या माणसाला हे एक औषध कसे लागू पडते याबाबत आपण प्रयोग करावे, त्याप्रमाणे समजा त्याने प्रत्येक प्रकृतीचे 100 असे 300 रोगी घेऊन प्रत्येकाला हेच औषध दिले आहे. असे समजा की सर्व रोगी बरे झाले, कफ प्रवृत्तीच्या माणसाला बरे होताना लागणारा वेळ, त्या काळातील त्याची मनःस्थिती व त्या काळात त्याच्यावर होणारे side effects किंवा त्यासाठी द्यावे लागणारे पथ्य वेगळे होते. त्याप्रमाणे वात प्रवृत्तीच्या रोग्यांबाबत वेगवेगळे निष्कर्ष निघाले. (क्षणभर असे मानले की प्रकृतिनुरूप असे काही वेगवेगळे निष्कर्ष निघाले नाहीत तरी देखील ते एक प्रायोगिक फाइन्डिंग ठरेल व त्याला वैज्ञानिकमूल्य आहे.) आता वरील प्रयोग झाल्यावर एखादा पेपर लिहून तो प्रकाशित करावयाचा असल्यास किंवा हे औषध बाजारात आणावयाचे असल्यास आणि वेगवेगळ्या प्रकृतीसाठी या औषधाचे वेगवेगळे डोसेस सुचवायचे असल्यास शासनाच्या  Indian Council of Medical Research (ICMR) (भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद) या संस्थेची मान्यता घ्यावी लागते. अशी मान्यता देत असताना ICMR चा नेमका रोल काय या बाबत मी ICMRCCRAS (Central Council for Research in Ayurvedic Science ) या दोन्ही संस्थांकडे लेखी विचारणा केली असता त्यांचे उत्तर मिळाले नाही, पण तोंडी उत्तर मिळाले ते अपेक्षित असलेले उत्तर नव्हते, तसेच पटण्यासारखे नव्हते.

 

ICMR हि आपल्या देशातील medical research या विषयाबाबत तांत्रिक सल्ला देऊ शकणारी सर्वोच्च संस्था मानली जाते. ही संस्था दोन भूमिकांतून काम करते. एकीकडे शैक्षणिक संस्थांना संशोधन करण्यासाठी उत्तेजन देणे, त्यांच्या प्रयोगांची आखणी करणे, तांत्रिक सल्ला देणे, अर्थसहाय्य पुरविणे इत्यादी प्रोत्साहनपार भुमिका, तर दुसरीकडे कुठल्यही संस्थेने अगर व्यक्तिने केलेल्या प्रयोगाची सत्यता प्रमाणीत करणे व त्यावर शिक्कमोर्तब करणे, हि certifying agency ची भूमिका. ही संस्था केंद्रशासनाची असून या संस्थेला सर्वात मोठा दर्जा व सन्मान असावा यासाठी केंद्रशासन सर्व प्रयत्न करते. भल्यामोठ्या पगारावर मोठेमोठे तज्ञ या संस्थेत नेमले जातात. त्यांचा शब्द शेवटचा मानला जातो. मात्र संस्थेच्या स्थापनेनंतर इतक्या वर्षांनी आज असे दिसून येते की या संस्थने प्रोत्साहनपर भूमिका फक्त allopathy च्या संदर्भात पार पाडली. शासनानेही या बाबतीत कधी सखोल विचार केला नाही. केंद्रशासनाने प्रोत्साहनपर भूमिकेतून आयुर्वेदासाठी Central Council for Research in Ayurvedic Science (CCRAS) तर होमिओपॅथीसाठी Central Council for Research in Homoeopathy (CCRH), युनानीसाठी Central Council for Research in Unani Medicine (CCRUM) व निसर्गोपचारासाठी Central Council for Research in Toga & Naturopathy (CCRYN) अशा निरनिराळ्या संस्था स्थापन केल्या पण त्यांना दुय्यम दर्जा देवून सत्यता प्रमाणित करण्याची भूमिका मात्र ICMR कडे कायम ठेवली. यामुळे allopathy वगळता इतर सर्व प्रणाली मध्ये दुरावस्था होऊन बसली. ज्या संस्थेकडे आयुर्वेदातील नवीन संशोधनाचा विचार व मांडणी करण्याची पात्रता (expertise) असू शकते, ती संस्था प्रयोगांची सत्यता प्रमाणित करू शकत नाही व ज्या संस्थेकडे सत्यता प्रमाणित करण्याचे अधिकार दिलेले आहेत त्या संस्थेला आयुर्वेदातील संशोधन कसे असू शकते, किंवा मुळात आयुर्वेदात संशोधन असू शकते, याचाच पत्ता नाही. माझ्या मते सत्यता प्रमाणित करणारी देशात एकच संस्था असणे योग्य आहे परंतु त्याच संस्थेत निष्णात आयुर्वेद्यक देखील असले पाहीजेत. आज ते तिथे नसतील तर सरकारने तसे नेमले पाहीजेत. आजच्या आयुर्वेद्यकांना आधुनिक परिभाषेत बसणारे संशोधन म्हणजे काय ते कळत नाही अशी शासनाची तक्रार आहे, ती पुष्कळशी  बरोबर असू शकेल. पण मग त्यांना ते नेमके तंत्र अवगत व्हावे यासाठी शासनाने कोणते शिक्षणक्रम चालू केले का? एकीकडे त्यांना पूरक, पोषक असे शिक्षणक्रम करायचे नाहीत दुसरीकडे त्यांची क्षमता सुधारली नाही अशी तक्रार करायची असे घडू नये. थोडक्यात ICMR कडे अशा व्यक्ती असाव्यात ज्या आयुर्वेद ऍलोपॅथी या दोन्ही शास्त्रांत निपुण आहेत. मात्र ही निपुणता देखील फक्त पुस्तकी नसावी तर प्रत्यक्ष रोगावर रोग्यंवर उपचार करून आलेली असावी. अन्यथा अशा तथाकथित तज्ञांची अवस्था sample सोबतच्या pamphlet वर वाचून नवीन नवीन औषधे देणार्या Medical Representative सारखीच असते.

वरील प्रयोगाबाबत ICMR ची मान्यता का लागते याचे मला अपेक्षित उत्तर असे होते की सत्यता प्रमाणित करणारी तीच एकमेव एजन्सी आहे म्हणून. हे उत्तर मिळाल्यास ICMR या संस्थेतील तज्ञांबाबत काय सुधारणा आवश्यक आहे ते माझे वरील मत मांडले असते. परंतु प्रत्यक्ष मिळालेले उत्तर न पटण्यसारखे आहे, ते असे की, प्रस्तुत वैद्यकाने diabetes बरा झाल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी blood suger level  तपासली म्हणजेच ऍलोपॅथी पद्धतीचा वापर केला म्हणून त्याच्या प्रयोगाची सत्याता प्रमाणित कराण्याचा हक्क फक्त ICMR लाच असू शकतो. या उत्तरातील एक चूक जी उत्तर देणार्‍याला देखील खटकली नाही ती अशी की, मुळात या प्रयोगाची मांडणी, कफ, पित्त व वात प्रकृतीवर ठराविक औषधांची कशी भिन्न भिन्न प्रतिक्रिया होते ते ठरवीण्यासाठी होती. Blood Sugar  तपासणी यंत्र हे chemistry मधुन आलेले तंत्रज्ञान आहे. एखादा साधा Labलॅब असिस्टंट  देखील हे reports काढून देतो. उलट आयुर्वेदातील त्रिदोष सिद्धांत काय आहे, त्या त्या प्रकृतीचे पथ्यापथ्य काय आहे, शमन चिकित्सा चांगली कि शोधन चिकीत्सा या प्रश्नांचे आकलन, ICMR  मधे बसून सत्यता प्रमाणित करु पहाणार्‍या लोकांना झालेले नसते. अशा वेळी त्यांचा आयुर्वेदीय संशोधनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अपूर्ण व biased असतो. तसेच अशा व्यक्तींना आयुर्वेदीय संशोधनाबाबत आत्मीयता नसते आणि संशोधनासाठी त्यांच्याकडून काही मार्गदर्शन देखील होऊ शकत नाही. या उलट CCRAS मधील तथाकथित मार्गदर्शकांना Physics व Chemistry मधील नवनवीन प्रयोगांची आणि त्याच्या योगे वैद्यकीय तपासणीसाठी तयार झालेल्या तंत्रज्ञानाची माहीती नसते ही देखील वस्तुस्थिती आहे कारण तशी तज्ञता त्यांच्यात यावी या दृष्टीने त्यांच्या शिक्षणक्रमांत काहीही सुधारणा केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून देखील चांगले मार्गदर्शन होऊ शकत नाही.

सर्व जगात ऍलोपॅथी मध्ये जे संशोधन चालते त्याची माहिती तत्काळ ICMR  मध्ये उपलब्ध होते आणि त्यातुन ऍलोपथी चा विकास होत रहातो. आयुर्वेदात जर संशोधन करावयाचे असेल तर त्याला भारताइतका अनुकूल दुसरा देश नाही. असे असूनही आधुनिक संशोधन, आधुनिक बेसिक सायन्सेस, म्हणजे फिजिक्स, केमेस्ट्री, बॉटनी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायलॉजी, जेनेटिक्स आणि त्याच जोडीला आयुर्वेद व भारतीय दर्शनशास्त्र दोन्ही चांगल्या तर्‍हेने कळते अशा तज्ञ माणसांची फळी आपल्य देशात शासनाला किंवा समाजाला निर्माण करता आली नाही, त्यासाठी योग्य तो शिक्षणक्रम तयार करता आला नाही ही गेल्या 65 वर्षातील आयुर्वेदाची शोकांतिका. पण ते आताही होऊ शकेल अजून परिस्थिती हाताबाहेर गेली नाही.

भारतातील वैद्यानिक व तंत्रज्ञानाच्या विकासाकडे थोडेसे मागे वळून बघितले तर असे दिसून येते की, सांख्य व इतर दर्शनशास्त्रांत पुरुष (कोणताही चेतन प्राणी या अर्थाने) व प्रकृति कसे निर्माण झाले, दोघांत आपापसांत संबंध काय ? आजारपण, वृद्धत्व, मृत्यू म्हणजे काय? अशा प्रश्नांची सखोल चर्चा झाली होती. आधुनिक फिजिक्स व केमेस्ट्रीच्या वाढीची सुरुवात पण अशाच प्रश्नांमधून झाली. तीन-चार हजार वर्षांपूर्वी ही चर्चा करत असताना आपल्या ऋषि मुनींनी, दार्शनिकांनी वापरलेली भाषा किंवा त्यांनी केलेले प्रयोग हे सोळाव्या शतकातील न्यूटन किंवा विसाव्या शतकातील नारळीकरांच्या भाषेपेक्षा निश्चित वेगळे असणार. पण विज्ञानवाढीची बीजे त्यांत नक्की होती. बुद्ध व जैन धर्मातील तत्वज्ञान आपल्याला मानसशास्त्रातील बरेच कही सांगून जाते. प्रज्ञा, शील, अहिंसा, सत्यवादिता, अक्रोध, अभय यासारख्या बुद्ध व जैन धर्मात मांडलेल्य संकल्पना मानसशास्त्र व मानसोपचारांच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. गीतेत देखील अरोग्यासाठी पंचमहाभूतांबरोबर मन, बुद्धी व अहंकार यांतून प्रकृती ठरते असे विवेचन केले आहे. सन 930-1400 पर्यंत मानसशास्त्राप्रमाणे गणितात देखील भारताची मोठी प्रगती झाली. ज्या अर्थी कापड उद्योग भरभराटीला होता, त्या अर्थी धागा निर्मितीचे तंत्रज्ञान, कापड रंगविण्याचे तंत्रज्ञान देखिल मोठ्या प्रमाणात वाढले होते. ज्योतिष व स्थापत्यशास्त्रासारखे तंत्रज्ञान वाढले. मात्र Physics किंवा Chemistry सारख्या विषयात पुढे फारशी प्रगती झाली नाही.

आयुर्वेदाचा हा पाच हजार वर्षांचा  इतिहास विचारात घेतला तर असे वाटते की पुन्हा आधुनिक विज्ञान, रसायन, वनस्पती, जीवशास्त्रासारखे विषय आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात योग्य तर्‍हेने गुंफले गेले नाहीत, शास्त्रदपि शरदपिअशा दोन नितांत वेगळ्या शाखांमधल्या प्रवीण असलेल्या व्यक्ति निर्माण झाल्या नाहीत तर आयुर्वेदाला मोठी उडी घेता येणार नाही. त्य दिशेने शासनाची आजची भूमिका दिसून येत नाही. समाजातील इतर विचारवंत किंवा आयुर्वेद तज्ञ देखील अजून अशा भूमिकेप्रत आलेले नाहीत त्यामुळे त्यांच्याकडून शासनावर योग्य दबाव आणला जात नाही. या सगळ्यासाठी मुळात आयुर्वेदाचे पोटेन्शियल शासनाला व समाजधुरीणांना समजले पाहिजे. आयुर्वेदाचा काहीही अभ्यास न करता त्याला अंधश्रद्धा म्हणून हिणवणारे पुष्कळ तज्ञ समाजात सापडतील. परंतु सत्यशोधकाच्या भुमिकेतून त्याच्याकडे पाहणारे फार कमी. म्हणूनच असे चित्र दिसून येते की पश्चिमी देशांत आयुर्वेदातील मूलभूत सिद्धांत हे जीवन जगण्याची कला, निसर्गाशी समरसता साधण्याचे तंत्र, एक वैज्ञानिकदृष्ट्या तर्कशुद्ध शास्त्र म्हणून त्याचा अभ्यास केला जातो, त्यातील सिद्धांताची प्रचिती येऊन वाहवा केली जाते आणि असे ज्ञानपिपासू पश्चिमात्य स्वयंप्ररणेने आयुर्वेद शिकून आपल्या देशात येऊन आयुर्वेदावर नितांत सुंदर भाषणे देतात, लेखन करतात. असे जिज्ञासू आपल्या मेडिकल संस्थांमधून निर्माण व्हावेत हि इच्छाशक्ती देखील अजून शासनात आणि समाजात निर्माण होत नाही ही परिस्थिती तुम्ही आम्ही मिळून बदलली पाहिजे.
     पच्छिमी देशांत विज्ञानाच्या अभ्यासाची सुरूवात दोन ते अडीच हजार वर्षांपुर्वीची आहे. तीच विज्ञानाची सुरूवात असा दृष्टिकोण पश्चिमी देशांनी मांडला व पसलवला आपण मान्य करूया कि त्यांना भारताती ज्ञानाची परंपरा, इतिहास व व्यप्ति माहीत नव्हती, म्हणून त्यांनी भारतीय दर्शनशास्त्रांमधे जे वैज्ञानिक विचार व  संदर्भ आहेत त्यांचा मागोवा न घेताच विज्ञानाचा इतिहास लिहून काढला व तो लिहितांना विज्ञानाच्या वाढीत भारताचे कांहीही कन्टीब्यूशन नाही असे नमूद केले. पण फक्त त्यांनाच का दोष द्यायचा ? आपले सांख्यादि ग्रंथ हेच मुळात विज्ञानाची सुरूवात होती असे आपल्याला तरी कधी वाटले किंवा पटले कां ? आपण या सर्व दर्शन शास्त्राला आत्यंतिक अध्यात्माकडे नेणारे व्यवहारा शून्य उपयोग असणारे - म्हणून अवैज्ञानिक- म्हणून टाकऊ अशीच त्यांची संभावना केली. या सर्व ग्रंथामधील तर्कशुद्धता, सिद्धानांची मांडणी, वैज्ञानिक दृष्टिकोण यांची दखल आपण घेतली नाही, या चुकी बद्दल पश्चिमी इतिहासकारांनी दोष देण्यांत अर्थ नाही. या ठिकाणी हे लक्षंत ठेवायला हवे कि विज्ञानांत सिद्धांत मांडतांना तो तर्कशुद्ध असणे महत्वाचे असते- पुढे मागे तो चुकीचा असयाचे ठरले तरी त्याचे वैज्ञानिक महत्व कमी होत नाही. सतराव्या शतकांत न्यूटन ने सिद्धांत मांडला कि प्रकाश हा वेगाने जाणाप्या कणांचा एक वाहता समुह असतो. त्याच्याच काळांत हा सिद्धान्त चुकीचा ठरवला जाऊन प्रकाश तरंग-स्वरूपी असतो हे मान्य झाले. आता विसाव्या शतकात प्रकाशाचे तरंगस्वरूप असतेच पण त्याचबरोबर त्याला कणाचेही स्वरूप असते असा नवीन सिद्धात मान्य झाला आहे. यावरून न्यूटनने केलेली तर्कशुद्ध मांडणी फारशी चुकीची नव्हती हे कळते.

       याच दृष्टिकोणातून प्हिल्यास आपल्याला असे पटेल कि तीन-चार हजार वर्षांपूर्वी ज्याला दर्शन शास्त्र म्हटले गेले त्यांत देखील आधुनिक फिजिक्स, केमिस्ट्री बॉटनी यांची बीजे होतीच. विज्ञानाची तर्कशुद्धता देखील होती. त्या सिद्धान्तांतून प्रकट झालेले तंत्रज्ञान म्हणजेच अर्थशास्त्र, आयुर्वेद, धनुर्वेद, योग, स्थापत्य, ज्योतिष या सारखी शास्त्र. यापैकी आयुर्वेदाची व्यप्ति आणि विस्तार सर्वांत जास्त होता आणि आपल्या शतकापर्यंत देखील टिकून राहिला. तसेच आपली विकेंद्रिते उत्पादनावर भर असलेली अर्थव्यवस्था होती ती देखील टिकून राहिली. या दोन्हीं शास्त्रांच्या व्याप्तिचे सूत्र होते-लोकाभिमुखता आणि विकेंद्रीकरण आयुर्वेदाची सामान्य सूत्रे ही आपल्या जीवन पद्धतीतात एक भाग बनून राहिली व टिकली तसेच आपली विकेंद्रित अर्थव्यवस्था पण टिकली व पसरती. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला नाही तर विज्ञानाच्या इतिहासात तसेच आरोग्यशास्त्राच्या इतिहासात भारताचे महत्वाचे कन्ट्रिब्यूशन होते हे आपण ठामपणे सांगू शकणार नाही. तोपर्यंत आयुर्वेदाची पीछेहाट थांबवता येणार नाही.
     पच्छिमी देशांत विज्ञानाच्या अभ्यासाची सुरूवात दोन ते अडीच हजार वर्षांपुर्वीची आहे. तीच विज्ञानाची सुरूवात असा दृष्टिकोण पश्चिमी देशांनी मांडला व पसलवला आपण मान्य करूया कि त्यांना भारताती ज्ञानाची परंपरा, इतिहास व व्यप्ति माहीत नव्हती, म्हणून त्यांनी भारतीय दर्शनशास्त्रांमधे जे वैज्ञानिक विचार व  संदर्भ आहेत त्यांचा मागोवा न घेताच विज्ञानाचा इतिहास लिहून काढला व तो लिहितांना विज्ञानाच्या वाढीत भारताचे कांहीही कन्टीब्यूशन नाही असे नमूद केले. पण फक्त त्यांनाच का दोष द्यायचा ? आपले सांख्यादि ग्रंथ हेच मुळात विज्ञानाची सुरूवात होती असे आपल्याला तरी कधी वाटले किंवा पटले कां ? आपण या सर्व दर्शन शास्त्राला आत्यंतिक अध्यात्माकडे नेणारे व्यवहारा शून्य उपयोग असणारे - म्हणून अवैज्ञानिक- म्हणून टाकऊ अशीच त्यांची संभावना केली. या सर्व ग्रंथामधील तर्कशुद्धता, सिद्धानांची मांडणी, वैज्ञानिक दृष्टिकोण यांची दखल आपण घेतली नाही, या चुकी बद्दल पश्चिमी इतिहासकारांनी दोष देण्यांत अर्थ नाही. या ठिकाणी हे लक्षंत ठेवायला हवे कि विज्ञानांत सिद्धांत मांडतांना तो तर्कशुद्ध असणे महत्वाचे असते- पुढे मागे तो चुकीचा असयाचे ठरले तरी त्याचे वैज्ञानिक महत्व कमी होत नाही. सतराव्या शतकांत न्यूटन ने सिद्धांत मांडला कि प्रकाश हा वेगाने जाणाप्या कणांचा एक वाहता समुह असतो. त्याच्याच काळांत हा सिद्धान्त चुकीचा ठरवला जाऊन प्रकाश तरंग-स्वरूपी असतो हे मान्य झाले. आता विसाव्या शतकात प्रकाशाचे तरंगस्वरूप असतेच पण त्याचबरोबर त्याला कणाचेही स्वरूप असते असा नवीन सिद्धात मान्य झाला आहे. यावरून न्यूटनने केलेली तर्कशुद्ध मांडणी फारशी चुकीची नव्हती हे कळते.

       याच दृष्टिकोणातून पाहिल्यास आपल्याला असे पटेल कि तीन-चार हजार वर्षांपूर्वी ज्याला दर्शन शास्त्र म्हटले गेले त्यांत देखील आधुनिक फिजिक्स, केमिस्ट्री बॉटनी यांची बीजे होतीच. विज्ञानाची तर्कशुद्धता देखील होती. त्या सिद्धान्तांतून प्रकट झालेले तंत्रज्ञान म्हणजेच अर्थशास्त्र, आयुर्वेद, धनुर्वेद, योग, स्थापत्य, ज्योतिष या सारखी शास्त्र. यापैकी आयुर्वेदाची व्यप्ति आणि विस्तार सर्वांत जास्त होता आणि आपल्या शतकापर्यंत देखील टिकून राहिला. तसेच आपली विकेंद्रिते उत्पादनावर भर असलेली अर्थव्यवस्था होती ती देखील टिकून राहिली. या दोन्हीं शास्त्रांच्या व्याप्तिचे सूत्र होते-लोकाभिमुखता आणि विकेंद्रीकरण आयुर्वेदाची सामान्य सूत्रे ही आपल्या जीवन पद्धतीतात एक भाग बनून राहिली व टिकली तसेच आपली विकेंद्रित अर्थव्यवस्था पण टिकली व पसरती. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला नाही तर विज्ञानाच्या इतिहासात तसेच आरोग्यशास्त्राच्या इतिहासात भारताचे महत्वाचे कन्ट्रिब्यूशन होते हे आपण ठामपणे सांगू शकणार नाही. तोपर्यंत आयुर्वेदाची पीछेहाट थांबवता येणार नाही.
 ======================================================

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें