आरोग्याची चतु:सूत्री (लेखांक 10)
आरोग्य कायम ठेवण्याची चतु:सूत्री आहे - आहार, विहार, आचार आणि विचार. विचारांचा देखील अंतर्भाव यामधे होत असल्याने तत्त्वज्ञान व तत्त्वज्ञता हे आरोग्य रक्षणाचा कणा आहेत असे मला वाटते.
आपले विचार कसे असतात, आपले आचरण त्याप्रमाणे असते की नसते यावर आपले आरोग्य अवलंबून आहे. विचार आणि आचार यांच्यामध्ये फरक पडल्याने मोठे ताण तणाव निर्माण होतात. त्यामुळे रक्तदाब, दमा, ह्दयरोग इतकेच नाही तर कॅन्सर सारखे रोगही होऊ शकतात असं आता अत्याधुनिक शास्त्रज्ञ मानू लागले आहेत. आयुर्वेदात मन या संकल्पनेवर बराच विचार केला असून स्मृति, बुध्दि, मेधा, प्रज्ञा, ज्ञान, विवेक या प्रत्येक भावनेचे स्वरूप वेगवेगळे ठरवले आहे - त्यांची कामे देखील वेगवेगळी ठरवली आहेत. ते ते काम न झाल्याने मनावर नेमका विपरीत परिणाम काय होतो व रोग उत्पत्ति कशी होते याचाही उहापोह भारतीय दर्शन शास्त्र, बुध्द व महावीर कालीन ग्रंथ तयेच आयुर्वेद यामधे - ठिकठिकाणी केला आहे. या दृष्टिने भगवान बुद्घांची कहाणी अत्यंत मनोहारी आहे. रोग, जरा (म्हातारपणा) आणि मरण यांच्या क्लेशातून माणसाला मुक्ति कशी मिळेल हे शोधायला निघालेले कुमार गौतम मुक्तिचा शोध पूर्ण करतात त्याच क्षणी त्यांना बोधिसत्त्व पद प्राप्त होते. नंतर ही मुक्ति व हे बोधिसत्वपद इतरांना कसे मिळू शकेल याची चर्चा करतांना भगवाना बुद्घांनी शील या संकल्पनेवर भर दिला आहे. त्यात मन, वाचा व कर्म यामधे समशील राखण्याचे महत्त्व सांगितले आहे. मनाने वाईट विचार करणार नाही, चांगले विचार करीन हे मनाचे शील, वाचेने कुणाचे वाईट बोलणार नाही किंवा कुणाला दुखावणार नाही हे वाचेचे शील, विचारांप्रमाणेच वागेन हे कर्माचे शील, असे मनसा, वाचा, कर्मणा एकच शील ठेवणे ही रोग आणि दु:खापासून मुक्ति मिळण्याची पहिली पायरी आहे असे भगवान बुद्घ सांगतात. जग कसेही वागत असेल, माझ्याकडे बघत असेल अगर नसेल परंतू माझे शील अबाधित ठेवण्याची जबाबदारी माझी आहे कारण माझ्या रोग-दु:ख-मुक्तिसाठी, माझ्या बोधिसाठी ते आवश्यक आहे. सत्यावर दृढ रहावे असे सर्वच धर्म सांगतात. परंतू त्याची मन, बुद्घि, कर्म अशा वेगवेगळ्या पातळीवर फोड करून, त्याला शील हा वेगळा शब्द वापरून त्याचा आपल्या रोगी - निरोगीपणाशी संबंध कसा आहे याचे खोलवर विवेचन भगवान बुद्घांनी केले आहे.
याठिकाणी मला फिजिक्सच्या एका सिद्घान्ताची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. हा सिद्घान्त अस सांगतो की कोणतीही सिस्टम एका स्थितीकडून दुस-या स्थितीकडे जात असतांना ज्या मार्गावर सिस्टम मधील ऊर्जेचा व्यय कमीत कमी असेल त्याच मार्गाचा सिस्टम स्वीकार करील. थोडक्यांत ऊर्जेचा व्यय कमीत कमी ठेवणे ही निसर्ग-प्रवृत्ति आहे. ????? आपण विचाराने एक असेल असे मला वाटत नाही. ????? म्हणूनच कैवल्याची अवस्था वर्णन करतांना आनंदाचे डोही आनंद तरंग असे त्याचे वर्णन केले आहे.
असे समाधान लाभण्यासाठी उदार व क्षमाशील मन, ऋजु - मृदू वाणी आणि निर्वैर भाव याही गुणांची आवश्यकता आहे.
एकूणच विचार आणि आचार या दोन बाबींना आरोग्य रक्षणासाठी फार महत्त्वाचे मानले आहे. दुदैवाने ही वैचारिकता आरोग्य किंवा आयुर्वेद या सदराखालून बाजूला निघून धार्मिकता या सदराखाली आली. पुढे धर्म व तत्त्वज्ञान हे देखील आचरणाची बाब न रहाता फक्त पोथी व चर्चेतील बाबी झाल्या. त्याही पुढील काळात धार्मिकता या मूळच्या उदात्त कल्पनेला जे क्षुद्रत्चाचे कंगोरे जोडले गेले, त्यामुळे धर्म या मूल्यवान संकल्पनेचे मूल्यच हरवून बसले आणि त्याचा आपल्या आरोग्याशी कांही संबंध असू शकेल हेच आपल्याला आज तर्कसंगत वाटत नाही.
प्रसन्नचित्तता व विशाल अंत:करण यावे यासाठी महात्मा गांधीनी त्यांच्या निसर्गोपचारावरील पुस्तकात एक अगदी सोपा उपाय सांगितला आहे व त्याची प्रचीतीही मी घेतलेली आहे. जमेल तेंव्हा घरातल्या बंद खोलीत न झोपता मोकळ्या आकाशाखाली झोपावे हा तो उपाय. अवश्य करून पहावा असा माझा अनुभव सांगतो.
बोलण्यात दुसरे व आचरणात तिसरे असे जेंव्हा करतो तेंव्हा एकाच मुद्दावर आपल्या मेंदूची तिप्पट ऊर्जा आपण वापरीत असतो. त्याऐवजी समशीलता ठेऊन वागल्यास मेंदूला प्रत्येक वेळी वेगळा आदेश, वेगळी पूर्तता व वेगळी ऊर्जा पुरवठा करण्याची गरज रहाणार नाही व ऊर्जेचा व्यय कमीत कमी होईल. त्यामुळे रोग होण्याला कमीत कमी वाव राहील.
म्हणून निसर्गोपचाराचा मार्ग पत्करून ज्याला रोगमुक्ति हवी त्याने खरेपणाने बोलले व वागले पाहिजे अन्यथा रोगमुक्ति अशक्य आहे असे माझे ठाम मत आहे.
निरोगीपणासाठी आचार - विचाराला आणखीन एक मनोगुण आवश्यक आहे तो म्हणजे प्रसन्नचित्त असणे. मी एकदा एका तणाव-मुक्ति शिबीराचे माहिती पत्रक पाहिले. त्यावर लिहिले होते –
“जर तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी असे घडत असेल की,
1. एक मिनिटभर तरी तुम्ही खळखळून हसू शकलात आणि
2. एक क्षण तरी असा आला जेंव्हा तुम्हाला वाटल की या क्षणी मी पूर्ण समाधानी, तृप्त व आनंदी आहे
तर तुम्हाला आमच्या शिबिरात येण्याची गरज उरली नाही असे खुशाल समजा”
तणाव मुक्तिचा एवढा अचूक मार्ग इतर कोणता?
--- XXX ---
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें