शनिवार, 27 सितंबर 2008

02- शमन आणि दमन - The preventive VS curative methods in treatment

शमन आणि दमन
मंगळवार दि. 4 फेब्रुवारी, 1997
गांवकरी - लेखांक 2.

प्रयोगः शमयेद्व्याधिं योऽन्यमन्यमुदीरयेत् / 


नासौ विशुद्धः शुद्धस्तु शमयेद्यो न कोपयेत् //



caraka samhita nidana sthana 8 apasmara  nidana

निसर्गोपचाराचे मर्म भाग २
४ फेब्रु. १९९७ दे. गावकरी मधील माझा लेख
निसर्गोपचार ही जर उपचाराची एक पद्धत आहे तर तिचा आयुर्वेदाशी काय संबंध आहे? किंबहुना उपचारांच्या इतर सर्व पद्धतींशी तिचा काय संबंध अथवा त्यांचा आपापसात काय संबंध? असे प्रश्न साहजिकच आहेत. उपचारांच्या प्रचलित पद्धती आहेत आयुर्वेद, ऍलोपॅथी, होमिओपॅथी, निसर्गोपचार, बाराक्षार पद्धती, योग, चुम्बक चिकित्सा, ऍक्युपंक्चर, ऍक्युप्रेशर इ.
यापैकी आयुर्वेदाचे नाव मी सर्वात आधी घेते कारण आयुर्वेद सोडून इतर सर्व उपचारांच्या पद्धती आहेत. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यानंतर घडणाऱ्या गोष्टींबाबत आहेत. आयुर्वेद हे मात्र आयुष्यमान वाढवण्याचे, निरोगी राहण्याचे, आरोग्य टिकवून ठेवण्याचे व रोग झाला तर उपचार करण्याचे असे सर्वसमावेशक शास्त्र आहे. आयुर्वेदाचे तीन भाग आपण करू शकतो. रोग न होऊ देणे, शरीराचा कणखरपणा व बल वाढवणे याबाबत सांगितलेले सर्व उपाय स्वस्थवृत्त या विभागात मोडतात. रोग झाल्यानंतर करायचे उपाय चिकित्सा या विभागात मोडतील, पण त्यातही मला दोन भेद दिसतात. रोग झाला तर त्याला दूर करण्यासाठी शरीर स्वत:च काही उपाय योजना करीत असते. या उपायांना बळकटी देणारा व औषधांचा अगदी सौम्य वापर करणारा, पण पथ्यावर जास्त भर देणारा असे चिकित्साप्रकार (ज्याला ढोबळ मानाने आपण शमन पद्धती म्हणू या.) मात्र रोगावर तीव्रतेने प्रभाव करून प्रसंगी शरीराला इतर बाबतीत थोडा त्रास देऊन रोग घालवण्यासाठी जी औषध योजना केली जाईल तिला दमन चिकित्सापद्धती म्हणायला हरकत नाही.
मी आयुर्वेदाचे असे तीन भाग पाडते. कारण त्यामुळे मला इतर चिकित्सा पद्धतींची विचार सरणी पटकन कळते. ऍलोपॅथी पूर्णपणे दमन चिकित्सा आहे. तर निसर्गोपचार हे स्वस्थवृत्त आणि शमन चिकित्सा पद्धती वापरणारे शास्त्र आहे. योग हे पूर्णपणे स्वस्थवृत्त वापरणारे शास्त्र आहे. तर इतर सर्व पद्धतीत आयुर्वेदाच्या शमन या विचारसरणी सारखाच विचार मांडलेला आहे. इथे मला हे नमूद करणे भाग आहे की आरोग्य किंंवा चिकित्सा पद्धतीचे प्रदीर्घ, विस्तृत व सैद्धांतिक विवेचन फक्त आयुर्वेद व ऍलोपॅथी मध्येच झालेले आहे. इतर चिकित्सा पद्धतींमध्ये ते थोडक्यातच मांडलेले आहे. त्यांची एकमेकांशी तुलना फारशी कोणी केलेली नाही. इतकेच नाही तर आयुर्वेदातही चिकित्सेमध्ये शमन आणि दमन हे दोन भाग जुन्या ग्रंथकारांनी पाडलेले नाहीत, पण मी तसे पाडते. ते तसे पाडले जाऊ शकतात कारण इतर कित्येक पद्धतींची विचारसरणी आणि आयुर्वेदातून शमनासाठी वापरलेल्या निरनिराळया उपायांमागची जी वैचारिक बैठक दिली आहे त्यात खूप साम्य आहे. त्यामुळे आयुर्वेदात विस्ताराने केलेले विवेचन ज्याने समजून घेतले असेल त्याला इतर पद्धतींचा कार्यकारणभाव पटकन समजून येईल.
हा कार्यकारणभाव असा की, आपल्या शरीराला नको असलेल्या गोष्टींचे म्हणजेच कचऱ्याचे उत्सर्जन, मल, मूत्र, घाम आणि उच्छ्वास या चार मार्गांनी होत असते. आपला कचरा या चार मार्गांनी बाहेर टाकला जातो. यापैकी उत्सर्जनाची एखादी पद्धत नीट काम करेनाशी झाली की काही तरी रोग होतात म्हणून सर्व प्रथम या पद्धती कशा तंदुरूस्त राहतील आणि आपले काम चोख करतील ते बघा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की रोग म्हणजे काय? तर शरीर आपल्याकडे अधिक आलेला कचरा उत्सर्जन करण्याचा प्रयत्न करीत असते. प्रत्येकाच्या शरीरप्रकृतीप्रमाणे उत्सर्जनाचा क्रम पण ठरलेला असतो. ताप येणे म्हणजेच त्वचेतून उत्सर्जन सुरू होणे ही पहिली पायरी. पुढच्या पायऱ्या म्हणजे वेगवेगळे त्वचारोग व श्वासाचे रोग. असे हे विवेचन बरेच पुढे नेता येईल. थोडक्यात शरीराचा खरा रोग म्हणजे कुठे तरी साठलेला कचरा. पण दृश्य रोग म्हणजे तो घालवायला शरीराने जी पध्दत अंमलात आणली तो. हे दृश्य रोग पटकन बरे करायचे असतील तर अॅलेपथीत ती दृश्य पद्धत थांबवणारी औषधे दिली जातात. मात्र आपण दुसरा विचारही करू शकतो. शरीराने कचरा घालवण्यासाठी जो रोग निर्माण केला तीच पद्धत जास्त प्रभावीपणे वापरा आणि सगळा कचरा पटकन बाहेर काढा. हा सिद्धांत होमिओपॅथीमध्ये प्रकर्षाने वापरला जातो.
या विवेचनावरून असे म्हणता येईल की, आरोग्याचे मूळ सूत्र म्हणजे अवांछित कचरा साठू देऊ नका. या संदर्भात स्वस्थवृत्तामधे हे करा आणि हे करू नका असे बरेच काही नियम सांगितलेले आहेत. तरी पण कचरा साठला गेला तर तो बाहेर काढण्याच्या नेहमीच्या चार पद्धती अधिक कार्यक्षम करा किंवा शरीराने जी नवी पद्धत वापरली असेल ती तरी जास्त प्रभावी करा. इथे एक लक्षात ठेवले पाहिजे की, ऍलोपॅथीतील इम्युनायझेशन किंवा बॅक्टेरियालॉजींमधील विवेचन यापेक्षा हे विवेचन थोडे वेगळे आहे.

--- XXX ---

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें