उपवास
Also see my Video on उपवास -- fasting therapy -- Video -- Hindi
मंगळवार दि. 4 मार्च, 1997 गावकरी, लेखांक 6.
निसर्गोपचारातील उपाय वापरण्याचे माझे ठोकताळे आहेत. यात पाण्याच्या उपचारांबरोबरच उपवास, आहार व नैसगिक आहार याचा जाणीवपूर्वक उपयोग केल्यास फार फायदा होतो. उपवासाचा उपयोग नेमका कसा होतो याबद्दल काही अनुभव सांगते.
आपण खाल्लेल्या अन्नातून शरीराला पोषक द्रव्य शोधून घेतल्यानंतर उरलेला कचरा शरीरातून बाहेर टाकला जातो. पण ही क्रिया पूर्ण कार्यक्षमपणे कधीच पार पाडली जात नाही. थोडा फार स्थूल कचरा आतड्यांमध्ये साठून राहतोच. कालांतराने तो कुजतही जातो. त्यातून इतर विषारी द्रव्यांची किंवा सूक्ष्म कच-याची निर्मिती होऊन ते देखील शरीरात पसरतात व कुठेही साचूनही राहतात. सूक्ष्म कच-याच्या साठण्याच्या जागा म्हणजे रक्तात हाडांच्या संधीच्या ठिकाणी त्वचेच्या खाली इत्यादी पण त्यातूनही सूक्ष्मतम कचरा निर्माण होऊन तो आपले मन बुध्दी व स्वभाव यांच्यावर परिणाम करु लागतो. यामुळे हार्मोनल व शरीरातील बरेचसे दीर्घ मुदतीचे रोग होतात. यामध्ये कोष्ठबध्दता, अस्थमा, रक्तदाब. हृदयरोग, मनोविकार, डायबिटिस, संधिवात, स्थ्ूलपणा, पाठदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, अर्धशिशी अशी बरीच नावे आपण ऐकतो.
शरीराचे काम करण्याचे जे नियम ठरलेले आहेत त्यामध्ये अन्नपचनाला सर्वात जास्त प्राधान्य व तातडीचा क्रमांक दिला आहे. आपण जितक्यांदा अन्नग्रहण करतो तितक्यांदा उर्जेचा प्रवाह पाचनसंस्थेकडे वळवला जाऊन शरीराच्या इतर व्यवहारांना कमी ऊर्जेचा साठा मिळतो. तसेच अन्नात शरीराला निरुपयोगी घटक जितके जास्त तितकी ऊर्जा अन्नपचनाऐवजी मल विसर्जनाकडे जास्त वळवावी लागते. भूक नसतांना खाणे किंवा गरजेपेक्षा जास्त खाण्याने पण हेच होते. पचनसंस्थेसाठी मिळालेल्या एकूण ऊर्जेपैकी प्रत्यक्ष पचन व शरीरात त्याचे ग्रहण होणे यासाठी ऊर्जा मिळते व जास्त ऊर्जा मलविसर्जनासाठी वाया जाते. यावरुन हेही लक्षात येईल की आपण जे काही खातो त्याचे पचन किती चांगले झाले व त्यातून निर्माण झालेल्या रसांचे ग्रहण शरीरात किती चांगले झाले यावर आपले आरोग्य जास्त अवलंबून असते.
एकदा ससूनमधील एक सर्जन आपला अनुभव सांगत होते. त्यांना चामड्याचे बरेच विकार होऊ लागले. इतर सर्व प्रकारच्या औषधांना वैतागून शेवटी ते दहा दिवस उरळी कांचनच्या निसर्गोचार आश्रमात जाऊन राहिले. कडक इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी दहा दिवस उपवार आणि तिथले निसर्गवैद्य सांगतील तसे सर्व काही केले. या काळात त्यांना चार वेळा एनिमा पण देण्यात आला. शेवटच्या म्हणजे दहाव्या दिवशी दिलेल्या एनिमानंतर पोटातून बरीच काळी उग्र वासाची घाण बाहेर पडली. त्यांचेच शब्द सांगायचे तर दहा दिवस उपवास करून एवढी घाण पोटात राहिलेली असू शकते हेच आधी कुणाला पटलं नसतं. यानंतर त्यांचे चामड्याचे विकार जादूसारखे नाहीसे झाले. अतिशय शांत झोप येऊ लागली. विद्यार्थी काळापासून अभ्यासात जे धडे समजले नव्हते ते आठवून आठवून त्यांची उत्तरं सुचायला लागली. माईल्ड डोकेदुखी असायची ती पूर्ण बंद झाली वगैरे मात्र तेवढी पोटातली घाण बाहेर पडून जाण्यासाठी दहा दिवस उपास करून अन्नपचनाची लागणारी शरीराची पूर्ण ऊर्जा या एका कामाकडे वळवावी लागली.
दिल्लीतील माझ्या माहितीच्या एका वृध्द निसर्ग-वैद्यांचा मी पाहिलेला अनुभव. त्यांना स्कूटर ऍक्सीडेंट होऊन पायाला जबर जखम झाली. तिस-या दिवशी मी त्यांना भेटायला गेले. जखमेवर फक्त ओल्या पाण्याच्या घड्या ठेवल्या होत्या. ते त्या घड्या अर्ध्या तासाने बदलत होते. मात्र जखमेत पू वगैरे काही झालेला दिसत नव्हता. त्यांनी ऍक्सीडेंट झाल्यापासून लगेचच उपवास सुरू केला होता. हेतू हा की अन्नपचनासाठी शरीराची ऊर्जा वापरली जाऊ नये. त्या ऊर्जेचा प्रवाह जखमेकडे वळून जखम नीट व्हावी. त्यांनी हा उपवार दहा दिवस ठेवला होता व औषधाविना आणि सेप्टिक न होता जखम बरी झाली.
आपण खूप बडबड करून पण आपली शक्ती दवडत असतो. मी दहा दिवस विपश्यना आश्रमात गेले तिथला अनुभव पण महत्व्वाचा आहे. तिथे सकाळ संध्याकाळ नाश्ता व दुपारी मोजके जेवण एवढेच देतात. संपूर्ण मौन पाळायला सांगतात. पहिले तीन दिवस आनपान हा प्रकार शिकवून चौथ्या दिवशी ध्यान शिकवायला सुरूवात केली. त्याबरोबर माझी भूक थांबली. दिवसभरात एक चमचा मुरमुरे व दोन घोट पाणी हेही अन्न मला जास्त वाटू लागले. यावरून असे लक्षात येते की आपण गरजेपेक्षा ख्ूपच जास्त अन्न खात असतो ते खाऊ नये.
निसर्गोपचारात उपचार करताना खूप पाणी प्या असे सांगतात. माझा अनुभव असा आहे की पाणी पिऊन उपास व निर्जल उपवास याचे परिणाम वेगवेगळे होतात. जर्मनीत निर्जल उपवासाबद्दल फक्त स्क्रॉच या जर्मन वैद्याने काही अनुभव लिहून ठेवले आहेत. आपल्याकडे निर्जला उपवासांची पध्दत आहेच. त्यावरून दिशा घेऊन मी हे प्रयोग करुन बघितले. माझा निष्कर्ष असा की ताप, डिसेंट्री, उलट्या इत्यादीसाठी पाणी भरपूर प्यावे मात्र साचलेल्या रोगांसाठी उपास करीत असल्यास सुरुवातीचे काही वास किंवा दिवस वगळता एरवी पाणी देखील वर्ज्य करावे. मात्र या पध्दतीने या उपायांना दाद देत असते असे वेगवेगळे अनुभव कुणीतरी संकलित करुन ठेवल्यास त्यातून इतरांना उत्तम मार्गदर्शन होऊ शकते.
निसर्गोपचार करण्यासाठी प्रॅक्टीसला महत्व आहे. आपल्याला कार चालवायची असेल तेव्हा गियर, ब्रेक, क्लच इत्यादींचे सैध्दान्तिक ज्ञान डोक्यात असून उपयोग नसतो. मेंदूने विचार करू लागण्याआधीच आपल्या हातापायांनी ब्रेक, क्लच, गियर, हॉर्न इत्यादी वापरले तरच ते मुरलेला ड्रायव्हर. अशीच प्रॅक्टीस निसर्गोपचार करण्यासाठीसुध्दा लागते. खरं तर जीवनात सगळ्यात बाबीत हा सहजपणा येणं महत्वाचं असतं.
-----------------------------------------------------------------------------------------
सोमवार, 28 जुलाई 2008
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें